जीव वाचवताना गमावलेला जवान; लोकन्यायालयातून कुटुंबाला दिलासा
जीव वाचवताना गमावलेला जवान; लोकन्यायालयातून कुटुंबाला दिलासा
कराड लोकन्यायालयात 1 कोटींची ऐतिहासिक तडजोड
कराड, दि. 14 - देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारा जवान, सुट्टीवर गावात आला असताना शेजारील युवकाचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतो… आणि त्या धावण्यातच स्वतःचा प्राण गमावतो. सीमा सुरक्षा दलातील जवान नितीन मोहन शेवाळे (वय 33, रा. शेवाळेवाडी, उंडाळे, ता. कराड) यांच्या बलिदानाची ही हृदयद्रावक कहाणी कराड लोकन्यायालयात अश्रूंना वाट करून देणारी ठरली.
सुट्टीवर आलेले जवान नितीन शेवाळे यांना बिबट्याच्या भीतीने झाडावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या युवकाची माहिती मिळाली. कोणताही विचार न करता, मानवतेच्या भावनेतून त्यांनी जखमी युवकाला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. स्वतः दुचाकीवरून, तर जखमी युवक चारचाकीतून रुग्णालयाकडे जात असताना पुणे–बेंगलोर महामार्गावर जखिणवाडी–नांदलापूर परिसरात टोयोटो करोला अल्टिस गाडीच्या धडकेत जवान नितीन शेवाळे यांचा अपघाती मृत्यू झाला.
हा अपघात केवळ एका कुटुंबावरच नाही, तर संपूर्ण समाजावर शोककळा पसरवणारा ठरला. पाठीमागे पत्नी पूजा, वडील मोहन शेवाळे आणि आई सुरेखा शेवाळे असा परिवार दुःखाच्या डोंगराखाली सापडला.
या प्रकरणी कराड न्यायालयात मोटार अपघात नुकसानभरपाई याचिका दाखल करण्यात आली होती. जवानांच्या कुटुंबातर्फे वकील नीरज फिरंगे, अजिंक्य डुबल, मच्छिंद्र पवार, ऋषिकेश यादव व यशवंत दत्तबेंद्रे यांनी प्रभावी बाजू मांडली, तर विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्डतर्फे वकील एस. एस. गोवेकर यांनी काम पाहिले.
कराड लोकन्यायालयात या प्रकरणावर सामंजस्याने तोडगा निघाला आणि जवान नितीन शेवाळे यांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली. हा केवळ आर्थिक न्याय नव्हता, तर एका कर्तव्यनिष्ठ जवानाच्या बलिदानाची समाजाकडून दिली गेलेली कृतज्ञतेची पावती होती.
या वेळी जिल्हा न्यायाधीश यू. एल. जोशी व दिलीप भा. पतंगे यांनी कुटुंबाला धीर देत, “न्यायालय फक्त कायद्याचा नाही, तर माणुसकीचाही आधार असतो,” असे भावनिक उद्गार काढले. न्यायाधीशांच्या शब्दांनी कुटुंबाच्या डोळ्यांतून अश्रू तरळले, तर उपस्थितांचे डोळेही पाणावले.
लोकांच्यातील तंटे-बखेडे सामंजस्याने मिटावेत, सर्वांनाच न्याय मिळाल्याची भावना निर्माण व्हावी आणि न्यायालयीन खर्च व वाद संपुष्टात यावेत, यासाठी राष्ट्रीय पातळीवर लोकन्यायालयाचे आयोजन केले जाते. कराड येथे झालेल्या लोकन्यायालयात एकूण 6 कोटी 97 लाख रुपयांच्या तडजोडी झाल्या. केवळ आर्थिक नव्हे, तर अनेक भावनिक वादही येथे मिटले. राग, द्वेष क्षणात प्रेमात बदलले आणि “आता न्यायालयाची पायरी चढायची नाही,” असा निर्धार अनेकांनी केला.
लोकन्यायालयात केवळ मोठ्या दाव्यांचाच नाही, तर घरातील नातेसंबंधांतील दुरावा मिटवण्याचेही माध्यम ठरले . सासपडे (ता. कराड) येथील ८२ वर्षीय मालन यशवंत चव्हाण या आजीचा आपल्या नातवांसोबत दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद लोकन्यायालयात सामंजस्याने मिटला. न्यायाधीश अतुल ए. उत्पात यांच्या संवेदनशील समुपदेशनामुळे आजी–नातवांमधील दुरावा क्षणात नाहीसा झाला. वाद मिटताच आजीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले, तर नातवांनीही “आता प्रेमाने एकत्र राहू,” असा शब्द दिला. हा प्रसंग पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले.
सद्यस्थितीत कराड न्यायालयात 18,152 केसेस प्रलंबित असून, त्यापैकी 3,390 केसेस लोकन्यायालयात ठेवण्यात आल्या होत्या. त्यातून 581 केसेस सामंजस्याने, तर 296 केसेस न्यायालयात येण्यापूर्वीच निकाली निघाल्या. अशा एकूण 877 केसेस लोकन्यायालयात मिटल्या.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी व दिलीप भा. पतंगे यांच्या नेतृत्वाखाली हे लोकन्यायालय यशस्वीपणे पार पडले. अपघात प्राधिकरण, धनादेश अनादर, तडजोडीपात्र खटले व दावे यांचा यात समावेश होता. कराड वकील संघटनेचे अध्यक्ष दीपक थोरात व सर्व वकील सदस्य, तसेच अधीक्षक दीप्ती सामक, न्यायालयीन अधिकारी व कायदा मदत केंद्राचे राजेंद्र भोपते व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
लोकन्यायालय हे केवळ कायदेशीर व्यासपीठ नसून, ते संवाद, समेट आणि माणुसकीचा उत्सव असल्याचे कराड लोकन्यायालयाने पुन्हा एकदा सिद्ध केले. जवान नितीन शेवाळे यांच्या बलिदानातून त्यांच्या कुटुंबाला मिळालेला न्याय हा लोकन्यायालयाच्या संवेदनशीलतेचा जिवंत पुरावा ठरला.
न्याय, संवाद आणि माणुसकीचा विजय - न्या. यु. एल. जोशी
लोकन्यायालय हे वादातून विश्वासाकडे जाणारे माध्यम असून लोकन्यायालयात न्यायाला मानवी स्पर्श दिला जातो त्यामुळे लोकन्यायालय हे न्याय, संवाद आणि माणुसकीचा विजय मिळवून देणारे व्यासपीठ ठरले असल्याचे मत कराड ज़िल्हा न्यायाधीश यु एल जोशी यांनी व्यक्त केले.

Comments
Post a Comment