सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्यावर ठाम 

कराड , दि. 19 : शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारांचे प्रामाणिक पालन करणारा पक्ष काँग्रेसच असल्याने हाताचं चिन्ह म्हणजेच काँग्रेसचा विचार असून तो जपण्याची आज नितांत गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले. सुपने-तांबवे जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा संवाद मिटिंग सुपने येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी कराड दक्षिण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील, इंद्रजीत चव्हाण, बलराज पाटील, जगदीश पाटील, अशोक पाटील, सतीश पानुगडे, सुहास पाटील, प्रदीपराव थोरात, बजरंग पाटील, दादाराम जाधव, विद्याधर पाटील, विजय देवकर, सौ. अक्षदा पवार, सौ. पूजा पवार, हिंदुराव पाटील, निवृत्ती माळी, आदिसह सुपने तांबवे जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

त्यामुळे आगामी निवडणुका काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावरच लढवाव्यात, यावर कार्यकर्ते ठाम असल्याचे स्पष्ट करण्यात आले. निवडणूक आयोगाच्या भोंगळ व निष्काळजी कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर बोगस मतदार नोंदणी झाली असून, निवडणूक नियोजनातही अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यामुळे लोकशाही प्रक्रियेलाच धोका निर्माण होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

देशातील सध्याची परिस्थिती पाहता सरकारच्या नाकर्तेपणामुळे तब्बल ८० टक्के जनतेला मोफत धान्य देण्याची वेळ आली आहे. हे सरकारच्या अपयशाचेच द्योतक असून, मोदी सरकारकडून केवळ घोषणा केल्या जात आहेत, मात्र त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याची टीकाही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

भाजपाकडे स्वतःचे असे काहीच नसून, देशात आज ज्या संस्था, यंत्रणा व नेतृत्व आहे, ते काँग्रेसनेच घडवलेले आहे. काँग्रेसने उभारलेल्या शासकीय संस्था विकण्याचा घाट सध्याचे भाजपा सरकार घालत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तसेच काँग्रेसने घडवलेले अनेक नेते दबाव व ब्लॅकमेलच्या माध्यमातून भाजपात घेतले गेले, मात्र भाजपाने स्वतः एकही मोठा नेता घडवलेला नाही, अगदी काहीच नेते प्रस्थापित आहेत. 

काँग्रेस हा केवळ पक्ष नसून तो एक विचार आहे. हा विचार जपण्याची जबाबदारी जनतेने घेतली पाहिजे. त्यासाठी वाचन संस्कृती वाढवणे आवश्यक असून, व्हॉट्सॲपवर येणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता पुस्तकांच्या व विश्वसनीय संदर्भांच्या आधारे इतिहास समजून घेतला पाहिजे. इतिहासाच्या पानांतूनच सत्य समोर येईल आणि ज्ञानात भर पडेल, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने पूर्ण ताकदीने व संघटितपणे लढवावा, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर केली. काँग्रेसची विचारधारा आणि संघटनशक्ती याच्या बळावरच निवडणूक लढवून यश संपादन करता येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक