वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण
वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण
कराड, दि. 21 : वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा, असे स्पष्ट आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. गोटे (ता. कराड) येथे गोटे ग्राम सचिवालयाचे उद्घाटन, सुनंदा नामदेव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा तसेच वारुंजी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ॲड. उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास सौ. सत्वशीला चव्हाण, अजितराव पाटील – चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, सुनंदा पाटील, वारुंजीच्या सरपंच अमृता पाटील, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अमित जाधव, संजय तडाखे, कराडचे माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली जाधव, सौ. मंगल चव्हाण, शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक संभाजी चव्हाण, झाकीर पठाण, गोटेच्या सरपंच वहिदा शेख, उपसरपंच कोमल लादे, धोंडेवाडीचे सरपंच रमेश भोसले, जगन्नाथ भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेसचा विचार हा शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार आहे. काँग्रेसने सत्तेत असताना नेहमीच जनहितासाठी काम केले असून अनेक लोकोपयोगी संस्था उभारल्या आणि योजना राबविल्या. मात्र आज राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, लाखो तरुण बेरोजगार आहेत.
उपमुख्यमंत्र्यांच्या गावात ड्रग्जचा कारखाना सापडतो, त्यामागे कोणाचे आशीर्वाद आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. माणिकराव कोकाटे यांच्यासारखा भ्रष्टाचारी मंत्री सत्तेत आहे, राज्यावर दहा लाख कोटींचे कर्ज झाले असून जनतेची कररूपाने लूट सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभा राहणारे लोकोपयोगी लोकप्रतिनिधी निवडण्याची आज नितांत गरज आहे. नामदेव पाटील यांच्याकडे ती जाणीव आहे. त्यामुळेच त्यांच्या पत्नी सुनंदा पाटील यांना जिल्हा परिषदेत मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
नामदेव पाटील म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून वारुंजी जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात विकासनिधी पोहोचला आहे. पंचायत समिती सदस्य असताना बाबांच्या प्रतिमेला साजेसे काम केले. भाजप सरकारने बांधकाम कामगार कल्याण खात्याचा निधी मतांसाठी वापरला, तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मध्यान्ह भोजन योजना बंद करून भांडी वाटप योजना सुरू करण्यात आली, यामुळे मूळ बांधकाम कामगार सरकारी योजनांपासून वंचित राहिले, अशी टीका त्यांनी केली. शेतीमालाला हमीभाव आणि खतांवर सबसिडी देण्याची मागणीही त्यांनी केली.
प्रा. धनाजी काटकर म्हणाले की, नामदेव पाटील हे जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. त्यांच्या केलेल्या कामांची संख्या अगणित आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲड. उदयसिंह पाटील यांच्या साथीने वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेसला विजयी करूया, असे आवाहन त्यांनी केले.
अजितराव पाटील – चिखलीकर म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून जनता चूक झाली असल्याची कबुली देत आहे. ते मुख्यमंत्री असताना राज्याला शिस्त लागली आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला. मात्र सध्याचे लोकप्रतिनिधी हातभर काम आणि हातभर प्रसिद्धी करत असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे, अशी टीका त्यांनी केली.
कार्यक्रमात ॲड. साबीर मुल्ला, वैशाली जाधव यांची भाषणे झाली. बानुबी सय्यद, कोमल लादे, साबीर मुल्ला, नौशादबी पटेल, साजिद आगा, जमीर सय्यद, सलीम शेख, गंगाराम पवार यांनी स्वागत केले. प्राचार्य अन्वर मुल्ला यांनी प्रास्ताविक केले. विजय माने व शिवम डोंबे यांनी सूत्रसंचालन केले तर श्री. इनामदार यांनी आभार मानले.




Comments
Post a Comment