स्व. विलासरावकाका सहकारभाव जपणारे नेते;ना. बाबासाहेब पाटील
स्व. विलासरावकाका सहकारभाव जपणारे नेते;ना. बाबासाहेब पाटील
कराड, दि. 5 :“स्व. विलासराव पाटील उंडाळकर हे अत्यंत अभ्यासू, तळमळीचे आणि सहकारभाव जपणारे नेते होते. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे. त्यांच्या नेतृत्वाचा वारसा उदयसिंह पाटील उंडाळकर समर्थपणे पुढे नेत आहेत, हे पाहून समाधान वाटते,” अशा भावना राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केल्या.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी आलेल्या मंत्री पाटील यांनी कोयना सहकारी बँकेस भेट देऊन बँकेच्या प्रांगणातील लोकनेते स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “रिझर्व्ह बँक व सहकार खात्याच्या सर्व नियमांचे पालन करून कोयना सहकारी बँकेने केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. देशाच्या प्रगतीत सहकार आणि शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राची जगभर ओळख सहकारामुळे निर्माण झाली आहे. अनेक बँका अडचणीत असताना कोयना बँकेने शिस्त, पारदर्शकता आणि कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या धोरणामुळे प्रगती साधली आहे.”
ते पुढे म्हणाले, “विलासकाकांनी माझ्या कार्यकाळात दिलेले मार्गदर्शन मोलाचे होते. आज उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँक सक्षमपणे पुढे जात आहे. कराड तालुक्यातील त्यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी मी सहकार मंत्री म्हणून आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ठामपणे उभे राहू.
उदयसिंह पाटील उंडाळकर (चेअरमन, रयत सहकारी साखर कारखाना), शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेश पाटील वाठारकर, जिल्हा उपनिबंधक संजय सुद्रिक, अपर्णा यादव (कराड तालुका सहकारी संस्था), सतीश इंगवले (APMC), लक्ष्मण देसाई (कोयना दूध संघ), कृष्णा पाटील (कोयना सहकारी बँक चेअरमन), स्वातंत्र्यसैनिक शामराव पाटील, शहाजी शेवाळे, अनिल मोहिते, आप्पासाहेब गरुड, मोहनराव माने, हनुमंतराव चव्हाण, निवासराव निकम आदी मान्यवर व सभासद उपस्थित होते.
प्रास्ताविक राज्य बँकेचे निवृत्त अधिकारी प्रल्हाद चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. धनाजी काटकर यांनी मानले.
स्व. विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व इतर.

Comments
Post a Comment