राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात ‘कृष्णा’च्या ‘शुभमंगल सावधान’ची निवड
राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात ‘कृष्णा’च्या ‘शुभमंगल सावधान’ची निवड
पुणे येथे १२ व १३ डिसेंबरला आयोजन; कृष्णा विश्व विद्यापीठाची ‘हॅट्रिक’
कराड, दि. 6 : पुणे येथे होणाऱ्या १४ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठाच्या ‘शुभमंगल सावधान’ या लघुपटाची निवड झाली आहे. सलग तिसऱ्या वर्षी या महोत्सवासाठी कृष्णा विद्यापीठाच्या लघुपटाची निवड झाल्याने ‘हॅट्रिक’ झाली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी केले आहे.
आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील पी. एम. शाह फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी आरोग्य समस्यांवरील चित्रपटांच्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या १४ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी विविध भारतीय भाषांमधून अनेक विषयांवरचे हजारो लघुपट फाऊंडेशनकडे प्राप्त झाले होते. यामधून कृष्णा विश्व विद्यापीठाने तयार केलेल्या ‘शुभमंगल सावधान’ या लघुपटाची निवड यंदाच्या महोत्सवासाठी करण्यात आली आहे.
डॉ. बाळकृष्ण दामले यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात ‘थॅलेसेमिया’ विकारा विषयीची माहिती नाट्यपूर्णरित्या देण्यात आली आहे. सुखदा दामले यांनी लेखन केले असून, यामध्ये प्रमोद पाठक, वर्षा विसाळ, नियती विसाळ, अक्षय आठवले आणि प्रमोद एकबोटे यांनी भूमिका केल्या आहेत. राजू भोसले यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे.
पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात १२ व १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. रेमन मॅगसेसे ॲवॉर्ड विजेते पद्मश्री डॉ. रवी कन्नन यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका दफ्तरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे.
या यशाबद्दल कृष्ण विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिंगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी लघुपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.
‘कृष्णा’ची हॅट्रिक
गेल्या सलग ३ वर्षांपासून कृष्णा विश्व विद्यापीठाच्या लघुपटांची निवड या महोत्सवासाठी होत आहे. सन २०२३ साली ‘द फार्मसिस्ट’, २०२४ मध्ये ‘राईट टू क्लिन इन्व्हॉर्नमेंट’ आणि यंदा ‘शुभमंगल सावधान’ या लघुपटाची निवड झाल्याने, कृष्णा विद्यापीठाची ‘हॅट्रिक’ झाली आहे.

Comments
Post a Comment