मसूर-उंब्रज रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले
मसूर-उंब्रज रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम शेतकऱ्यांनी बंद पाडले
मोबदल्यासाठी शिवडे ग्रामस्थ आक्रमक; 'बांधकाम'च्या अधिकाऱ्यांना घेराव
कराड, दि. 4 - मायणी–मल्हारपेठ राज्य मार्ग रुंदीकरणाच्या वादग्रस्त कामाविरोधात शिवडे (ता. कराड) येथील ग्रामस्थांनी बुधवारी (३ डिसेंबर) सकाळी मोठी आक्रमक भूमिका घेत थेट काम बंद पाडले. गेल्या काही महिन्यांपासून भूसंपादनानंतरही कोणताही मोबदला न मिळाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा अखेर संताप उसळला. रस्त्यालगतची झाडे, पिके, कुंपणे, तसेच शेतीची जमीन उद्ध्वस्त होत असताना संबंधित विभागाने निष्क्रियता दाखवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील आशुतोष माळी, संदीप घाडगे, प्रमोद साळुंखे, दीपक माळी, नामदेव घाडगे, हरिदास घाडगे, वैभव जगदाळे, विश्वास माळी यांसह अनेक शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष आडकाठी करत “मोबदला मिळेपर्यंत काम बंद” हा ठाम नारा दिला. शेतकऱ्यांच्या निर्धारापुढे ठेकेदार व कर्मचारी मागे हटले.
४८१ कोटींचा प्रकल्प; तरी शेतकऱ्यांना मोबदला शून्य
राज्यमार्गाचे रुंदीकरण गेल्या वर्षभरापासून सुरू असून सुमारे ४८१ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यात अतिरिक्त वाढही करण्यात आली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना एकाही रुपयाची नुकसानभरपाई न देता त्यांच्या पिकांवर आणि झाडांवर बुलडोझर फिरवला गेला, असा थेट आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
काही शेतकऱ्यांच्या शेतीतील नारळ, आंबा, उंबर, चिंच यांसारखी वृक्षसंपदा तोडण्यात आली, तर काहींची पिके निम्म्याहून अधिक उध्वस्त झाली. तरीही प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना, नोटीस किंवा पंचनामे न करता मनमानी पद्धतीने काम सुरू ठेवल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप आहे.
शेतकऱ्यांचा रोष शिगेला; अधिकाऱ्यांची धावपळ
बुधवारी अचानक सुरु झालेल्या या तीव्र आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धुमाळ तसेच सोनाई कन्स्ट्रक्शनचे कर्मचारी घटनास्थळी धावले. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना चोख सवाल करत “आमच्या जमिनीवर अतिक्रमण करून काम का? भूसंपादनाची कागदपत्रे कुठे आहेत? नुकसान भरपाई कुठे आहे?” असा जाब विचारला.
अधिकाऱ्यांकडे समाधानकारक कागदपत्रे नसल्याचे दिसताच ग्रामस्थांचा रोष वाढला. अनेकांनी कडक शब्दांत चेतावणी दिली की “मोबदला मिळाल्याशिवाय एकही मशीन रस्त्यावर चालू देणार नाही.”
यामुळे प्रशासन गोंधळलेल्या स्थितीत सापडले. अखेर कार्यकारी अभियंता धुमाळ यांनी संबंधित कागदपत्रे तपासूनच पुढील काम सुरू करू, असे आश्वासन देऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.
ग्रामस्थांची एकजूट, संघर्षाचे संकेत
गेल्या महिनाभरापासून शिवडे, वडोली भिकेश्वर, उंब्रज परिसरात विविध ठिकाणी शेतकरी आंदोलनाचे सत्र सुरूच आहे. अनेकांनी खासगी चर्चेत पिकांचे आणि वृक्षांचे मोठे नुकसान झाल्याची वेदना व्यक्त केली आहे. परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हे प्रश्न आता रस्त्यावर उतरले आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे, “ आम्ही रुंदीकरण करण्याच्या विरोधात नाही, पण आमच्या हक्काच्या मोबदल्याशिवाय आम्ही आमच्या जमिनी ताब्यात देणार नाही.”
प्रशासनापुढे मोठे आव्हान
या प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचा रोष वाढत असल्याने पुढील काही दिवसांत आंदोलनाचा स्वरूप आणखी तीव्र होऊ शकतो. पाटण–पंढरपूर हा महत्त्वाचा राज्य मार्ग असून वाहतुकीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांच्या मागण्या योग्य असल्याचे मत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले असून प्रशासनाने तातडीने व पारदर्शक पद्धतीने नुकसानभरपाईची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शिवडेतील बुधवारी झालेल्या तीव्र आंदोलनाने संपूर्ण कराड तालुक्यात खळबळ उडवली आहे. आता प्रशासनाची पुढील भूमिका काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Post a Comment