कराड शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी : प्रमोद पाटील
कराड शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी : प्रमोद पाटील
कराड, दि. 12 - कराड शहरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे तात्काळ व कायमस्वरूपी उपाययोजनासह बुजवण्यात यावेत अशी मागणी 'दक्ष कराडकर'च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी कराड नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्याकडे केली आहे.
मुख्याधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीत म्हटले आहे की, पावसाळा संपून दोन महिने उलटूनही शहरातील अनेक प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांची स्थिती अत्यंत गंभीर असून अजूनही दुरुस्ती झाली नाही. विशेषत: दैत्य निवारणी मंदिर तसेच जुन्या कोयना पुलाकडे जाणारा रस्ता, अशोक चौक ते पोस्ट ऑफिस मार्ग, दर्गा मोहल्ला मेन रोड ते कन्या शाळा पुढे कृष्णा नाका सर्कल तसेच कार्वे नाका कडे जाणारा मुख्य मार्ग, तसेच शहरातील बऱ्याच रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत..
शहरातील हे रस्ते अत्यंत खराब स्थितीत आहेत. यापैकी दैत्य निवारणी मंदिर कडे जाणाऱ्या संपूर्ण रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे असून वाहनचालक व पादचारी यांच्या जीवाला स्पष्टपणे धोका निर्माण करीत आहेत. दररोज अपघातासारख्या परिस्थीती निर्माण होत असून सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. या मार्गांवरून शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, व्यापारी, प्रवासी तसेच आपत्कालीन सेवा देणारी वाहने सतत धोक्याच्या स्थितीतून मार्गक्रमण करीत आहेत.
शहरातील या सर्व रस्त्यांवरील खड्डे केवळ तात्पुरत्या उपायांनी नव्हे, तर तांत्रिकदृष्ट्या योग्य, गुणवत्तापूर्ण आणि दीर्घकालीन टिकणाऱ्या उपाययोजनांद्वारे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत, जेणेकरून पुनश्च खड्डे निर्माण होण्याची समस्या टळेल. कराड हे सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचे शहरी केंद्र आहे. कारण शहरात आजूबाजूच्या तालुक्यातून बरेच नागरिक खरेदीसाठी , नोकरीसाठी येत असतात. त्यामुळे येथे सुरक्षित, टिकाऊ आणि दर्जेदार रस्ते असणे अत्यावश्यक आहे.
आपण तातडीने आवश्यक निर्देश देऊन संबंधित विभागामार्फत रस्ते दुरुस्तीची कामे लवकरात लवकर, नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्वक करण्यात यावेत अशी मागणी निवेदनात शेवटी करण्यात आली आहे.

Comments
Post a Comment