कराडात स्वातंत्र्य सेनानी वीर माधवराव जाधव जन्मशताब्दी सोहळ्याच्या आयोजन
कराड - पत्रकार परिषदेत बोलताना सुनिता जाधव समवेत अमर जाधव, एड. संभाजीराव मोहिते, तनय जाधव
कराडात स्वातंत्र्य सेनानी वीर माधवराव जाधव जन्मशताब्दी सोहळ्याच्या आयोजन
कराड, दि. 12 : - कराडचे सुपुत्र, स्वातंत्र्य सेनानी वीर माधवराव जाधव (दादा) यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग व कराडच्या विकासात दिलेले योगदान व कार्य भावी पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांच्या स्नुषा सुनिता दिलीप जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, ॲड. संभाजीराव मोहिते,अर्बन बँकेचे चेअरमन समीर जोशी, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, स्वातंत्र्य सेनानी जाधव यांचे नातू अमर जाधव, तनय जाधव उपस्थित होते.
जाधव म्हणाल्या, वीर माधवराव यांचे स्वातंत्र लढ्यातील कार्य अव्दितीय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी केलेला भीम पराक्रम आणि स्वातंत्र्योत्तर काळात कराडसह राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. कराड शहर व परिसरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये जाधव यांचे योगदान मोठे असून, शिवाजी महाराज स्टेडियमची निर्मिती, सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी, रिमांड होम तसेच सह्याद्रि साखर कारखाना उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. यासह त्यांच्या संपूर्ण कार्यावर समितीकडून पुस्तक तयार करण्याचे काम चालू आहे. त्यांच्या कार्याची अनेक ठिकाणी दखल घेऊन इतिहास मांडण्याचा प्रयत्न झाला आहे तरीही अजूनही माहिती संकलित करून स्वतंत्र पुस्तिका तयार करण्यात येणार आहे असेही जाधव यांनी सांगितले.
स्वातंत्र्यलढ्यात माधवराव जाधव हे महात्मा गांधींच्या ‘चले जाव’ आंदोलनात अग्रस्थानी होते. ब्रिटिश सरकारविरुद्ध रेल्वे अडवणे, पोस्ट ऑफिस लुटणे, विद्युत तारा तोडणे, त्यांनी मारलेली ऐतिहासिक क्रांती उडी यांसारख्या अनेक क्रांतिकारक कृतींमुळे त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आल्याचे सांगून एडवोकेट संभाजीराव मोहिते म्हणाले, काही खटल्यामध्ये ते निर्दोष सुटले मात्र बहुतांशी खटल्यांमध्ये त्यांना 135 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. परंतु दुर्दैवाने त्यांचा इतिहास काळाच्या ओघात विस्मृतीत गेला असून, तो राष्ट्रीय पातळीवर उजेडात आणण्यासाठी हा जन्मशताब्दी सोहळा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
रविवार, दि. 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात जन्मशताब्दी सोहळा होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे माजी चेअरमन व संचालक सुभाषराव एरम, मोटर वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, तसेच बँकेचे चेअरमन समीर जोशी उपस्थित राहणार आहेत. जाधव कुटुंबियांसह मान्यवरांचे मनोगतही यावेळी व्यक्त होणार आहे. स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबीय, आजी-माजी सैनिक, नागरिक व युवकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीकडून करण्यात आले.
जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होणार
स्वा. सेनानी माधवराव जाधव यांनी दिलेले योगदान सर्वां पुढे यावे या उद्देशाने त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात समितीकडून वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून त्या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. 14 डिसेंबर रोजी रिमांड होममधील मुलांना विविध सोयी-सुविधा देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र संगणक कक्ष तयार करण्यात येणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांची दंत तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे.

Comments
Post a Comment