कराडच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी एआय टेक्नॉलॉजी...
कराडच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी एआय टेक्नॉलॉजी
कराड, दि. 10 - शेतकऱ्यांसाठी ‘एआय टेक्नॉलॉजी’ बाबत अत्याधुनिक माहिती आणि मार्गदर्शन हे यावर्षीच्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असून प्रदर्शनात शेतकऱ्यांसह बचत गटांसाठी 100 मोफत स्टॉल उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपसभापती नितीन ढापरे, संचालक प्रकाश पाटील, विजयकुमार कदम, संभाजी काकडे, गणपत पाटील, राजेंद्र चव्हाण, सर्जेराव गुरव यांच्यासह सचिव आबासाहेब पाटील व अधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट नजीक असणाऱ्या जनावरांच्या बाजार तळावर प्रति वर्षाप्रमाणे यंदाही 26 डिसेंबर पासून कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन भरवले जाणार असल्याचे सांगून इंगवले म्हणाले, कृषी प्रदर्शनाचे यंदा 20 वे वर्ष असून शासन कृषी विभागाच्या सर्वोतपरी सहकार्यातून हे प्रदर्शन होणार आहे. कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच पशुसंवर्धन विभागाचे याकामी मोठे सहकार्य लाभणार आहे. जनावरांच्या बाजार तळावर सहा विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पिलरलेस डोम असणार आहे. या प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, नव्या शेती पद्धती, पशुपालन क्षेत्रातील माहिती, तरुण शेतकऱ्यांसाठी स्टार्टअप मॉडेल्स अशा विविध विभागांचा समावेश असणार आहे.
कराड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्रदर्शनाच्या तयारीला सुरुवात झाली असून प्रदर्शनाचे मंडप पूजन तसेच प्रदर्शनाच्या उद्घाटनाला निमंत्रित करण्यात येणाऱ्या मान्यवरांची अंतिम नावे येथे काही दिवसात निश्चित केली जाणार असल्याचे सांगून सभापती इंगवले म्हणाले, या प्रदर्शनाबाबत मंगळवारी साताऱ्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे या बैठकीत कराड येथे होणाऱ्या या प्रदर्शनासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे गेलेले हे प्रदर्शन २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत भरवण्याचा निर्णय निश्चित झाला असून दरम्यानच्या कालावधीत प्रदर्शनाची तयारी जलदगतीने करण्यात येत असल्याचे उपसभापती नितीन ढापरे यांनी सांगितले. ते म्हणाले यंदाच्या प्रदर्शनात कराड तालुक्यातील एकूण १२ प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षीपासून उत्कृष्ट गुळ उत्पादक शेतकऱ्यांचाही पुरस्कारांमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी प्रदर्शनात पीक, फळे, भाजीपाला व पशुपक्षी प्रदर्शनाबरोबरच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याचीही माहिती सविस्तर देण्यात येणार आहे. .
कराड शेती उत्पन्न बाजार समिती आयोजित हे प्रदर्शन डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून करण्यात येणार असून प्रदर्शना ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, मोबाईल टॉयलेट, स्वच्छतेची प्रभावी व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी, शेतकरी गट, महिला बचत गट, उद्योग-व्यवसायातील विविध घटक यांनी या प्रदर्शनाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.


Comments
Post a Comment