कराड मलकापूर नगर परिषदेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार
कराड मलकापूरच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढवणार
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची माहिती
कराड, दि. 8 : कराड व मलकापूर नगर परिषदेमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या विकासकामांच्या जोरावर महाविकास आघाडी दोन्ही नगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आज महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव, ओबीसी सेलचे भानुदास माळी, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, अल्पसंख्यांक विभागाचे झाकीर पठाण, शिवसेना (उबाठा गट) जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, शेतकरी कामगार पक्षाचे ॲड. समीर देसाई, आम आदमी पक्षाचे ॲड. धीरजसिंह जाधव, संजय तडाखे यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सातारा येथे नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणुका मा विकास आघाडीच्या वतीने एकत्र लढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार कराड व मलकापूर निवडणुका आम्ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर व एकजुटीने लढवणार असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. अमित जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असून महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाचे उमेदवार आपापल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड-मलकापूर परिसरात केलेली विकासकामेच आमची खरी ताकद असून, त्याच्या जोरावरच आम्हाला दोन्ही ठिकाणी यश मिळेल याची खात्री आहे.
गेल्या चार वर्षांपासून भाजप सरकारने नगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या नाहीत. त्यामुळे कराड आणि मलकापूर शहरांचा विकास थांबला. या विलंबाला जबाबदार कोण? याचा हिशेब आम्ही जनतेसमोर मांडणार असल्याचे भानुदास माळी यांनी सांगितले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विकासामुळेच मलकापूर शहराचा चेहरा बदलला आहे. काहीजण आम्हाला सोडून गेले असले तरी, अनेक नवे कार्यकर्ते आमच्याशी जोडले जात असल्याचे ही माळी यांनी सांगितले.
शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांच्या उपस्थितीत साताऱ्यात आघाडीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आम्ही निवडणुकीत उतरतो आहोत. सर्व घटक पक्ष एकदिलाने आणि पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे हर्षद कदम यांनी यावेळी सांगितले.
तसेच, पक्ष सोडून गेलेल्यांची दखल न घेता जनता आपल्यासोबत असल्याचे सांगत कराड आणि मलकापूरमध्ये चांगले यश येईल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Comments
Post a Comment