अतुलबाबा नक्कीच कराडवर भाजपचा झेंडा फडकवतील;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


अतुलबाबा नक्कीच कराडवर भाजपचा झेंडा फडकवतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कराड, दि. 30 : - आ. अतुलबाबा भोसले हे विकासाचे व्हिजन असलेले युवा नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडे भविष्यातील मोठे नेतृत्व म्हणून पाहतो. त्यांची क्षमता पाहता त्यांना मोठमोठ्या नेत्यांकडून घेरण्याचे षडयंत्र आखले जात आहे. मात्र आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. हे चक्रव्यूह यशस्वीपणे भेदू, मी त्यांच्या पाठीशी आहे. अतुलबाबा नक्कीच कराडवर भाजपचा झेंडा फडकवतील, असा दृढ विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

येथील शिवतीर्थ दत्त चौकात भारतीय जनता पार्टीच्या कराड व मलकापूर नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेचे बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार अतुल बाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे, कृष्णा कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, नीता केळकर, भरत पाटील, मकरंद देशपांडे, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, सुहास जगताप, कराड नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनायक पावसकर व मलकापूरचे तेजस सोनवणे, शारदा जाधव, मनोहर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अतुलबाबांसारख्या तरुण नेतृत्वाला आशीर्वाद द्यायला हवे होते. मात्र त्यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांना घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. अतुलबाबांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत फडणवीस म्हणाले, देश स्वतंत्र झाल्यापासून 60 - 65 वर्ष गाव हे विकासाचे केंद्र होते, त्यामुळे काही प्रमाणात शहरांचा विकास रखडला. नरेंद्र मोदींनी शहरांच्या विकासासाठी 50 हजार कोटी रुपयांचा निधी दिला. आज झोपडपट्टी, प्रदूषण, कचरा, सांडपाणी यांपासून शहरांना मुक्ती देत कचऱ्यापासून गॅस, वीज आणि खत निर्मिती करून पैसा उभा केला. अतिक्रमणे हक्काच्या मालकीची करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराशेजारील झोपडपट्टीसह कराड शहरातील 11 आणि मलकापुरातील 3 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून कराड आणि मलकापूरला झोपडपट्टी मुक्त शहरं करू. तसेच आतापर्यंत महाराष्ट्राचा सुवर्णकलश आणणाऱ्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळाचे रिडेव्हलपमेंट करण्याचे स्वप्न अतुलबाबांनी पाहिले, ते प्राधान्याने पूर्ण करू. त्यांच्या मागणीनुसार अत्याधुनिक शिवाजी स्टेडियमच्या निर्मितीसाठी 96 कोटींचा निधी दिला आहे. खाशाबा जाधव स्मारकासाठी 25 कोटी, कराड - विटा महामार्ग, पंचायत समिती इमारत, रस्ते, जोडरस्त्यांसाठी तब्बल 400 कोटी, आंबेडकर वाचनालय, पाणीपुरवठा योजना यांसह अन्य विकासकामांच्या माध्यमांतून कराड शहरात मोठे परिवर्तन झालेले दिसेल. हे सर्व नगरपालिकेला जपणारे काम नाही. मात्र अतुल बाबा मोठे स्वप्न पाहणारे नेते आहेत, त्यांची सर्व स्वप्न मी पूर्ण करू, 

कराड ही छत्रपती शिवरायांचा इतिहास लाभलेली भूमी आहे. या ठिकाणी 2016 मध्ये मी कराडचा नगराध्यक्ष निवडून देण्याचे आवाहन केले होते, ते तुम्ही पूर्ण केले. सत्यकाळात अनेक विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. 

आता पुन्हा कराड आणि मलकापुरात नगराध्यक्ष आणि एक हाती सत्ता द्या, दोन्ही शहरं रोल मॉडेल बनवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कराडचे क्षेत्रफळ 10.51 किमी, रस्ते 77 किमी, बंदिस्त गटार 87 किमी आणि खुले गटार 75 किमी आहेत. यांसह शहरातील अन्य समस्या व विकासकामांबाबत आणि आमदारकीच्या एक वर्षात पूर्ण केलेल्या कामांंबाबत बोलताना आ. अतुलबाबा भोसले म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अत्याधुनिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसाठी 96 कोटींचा निधी दिला. त्याचे काम प्रगतीपथावर असून, येत्या दीड वर्षभरात त्याच्या उद्घाटनाला फडणवीस साहेबांना निमंत्रण देणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे या स्टेडियममध्ये अनेक खेळांच्या सोयी सुविधा असतील. विमानतळ विस्तार करण्यासाठी 220 कोटीच्या निधी त्यांनी दिला. जुन्या कोयना पुलाच्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून 50 कोटींचा नवीन पूल उभारण्यात येत आहे. नगरपालिका इमारतीसाठी आधीच साडेतीन कोटींचे निधी अशाप्रकारे एक वर्षात 259 कोटींचा निधी मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कराड शहरात गंगेप्रमाणे कृष्णा नदीची आरती व्हावी, यशवंतराव चव्हाण समाधी स्थळाचे रीड डेव्हलपमेंट व्हावे, पूर संरक्षण भिंत, नेकलेस रोड आधी मागण्यांचा त्यांनी पुनरुचार केला. 

निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वांना बरोबर घेऊन विरोध मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महायुतीतील माजी मुख्यमंत्री, अन्य मंत्री आणि पुढारी आमच्या विरोधात आहेत. ते पक्षाऐवजी आघाडीवर निवडणूक लढवतात, मग ते समविचारी कसे. आम्ही भाजप म्हणून निवडणूक रिंगणात आहोत, नव्या चेहऱ्याला संधी दिली दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मलकापूरमध्ये पाणीपुरवठा योजना विस्तारीकरण आणि बंदिस्त गटार योजनेसाठी निधीची मागणी केली. मलकापुरात आमच्या विरोधात निवडणूक लढायला विरोधकाने मानसी मिळाली नाहीत अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे. या ठिकाणी आधीच सहा जागा बिनविरोध करून भाजपने विजय मिळवला आहे. आणखी एक जागा न्यायालयीन प्रक्रियेत आहे. या ठिकाणी नक्कीच मी १२ - ० असा मोठा विजय मिळवू, असा विश्वास व्यक्त करत मलकापूर शहरालाही एक आदर्श शहर बनवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक