मलकापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : ना. मकरंद पाटील
मलकापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही : ना. मकरंद पाटील
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प – मलकापूरचे पालकत्व स्वीकारल्याची घोषणा
कराड, दि. 28 - मलकापूर शहराच्या विकासासाठी निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ठाम ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली. “विरोधक काहीही बोलोत, पण राज्याचे अर्थखाते आपल्या पक्षाकडे आहे. मलकापूरसाठी निधीचा पाऊस पाडू,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मलकापूरमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्याबरोबर शहराचे पालकत्व स्वतः घेत असल्याची घोषणा करून सभा दणाणून सोडली.
मलकापूर नगरपरिषद पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उबा ठा) आणि समविचारी पुरोगामी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या संयुक्त प्रचार सभेत ते बोलत होते.
सभेला उदयसिंह पाटील-उंडाळकर, डॉ. सुधीर जगताप, बाळासाहेब सोळसकर, राजेश पाटील- वाठारकर, सुनील पाटील, इंद्रजीत चव्हाण, अजित पाटील-चिखलीकर, संजय देशाई, प्रा. धनाजीराव काटकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षल कदम, प्रदीप पाटील, सविनय कांबळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. आर्यन कांबळे व पुरोगामी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते.
“मलकापूरची निवडणूक म्हणजे भवितव्याचा मार्ग” — ना. मकरंद पाटील
“ही निवडणूक फक्त नगरपालिका निवडणूक नाही, तर मलकापूरच्या भविष्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे,” असे पाटील म्हणाले. उच्चशिक्षित व चांगल्या प्रतिमेचा उमेदवार पुरोगामी आघाडीतून उभा असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, “यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, प्रेमिलाकाकी, विलासराव उंडाळकर यांची पुरोगामी परंपरा असलेल्या या भूमीत आज भिन्न विचार रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा सोडली तर युवा पिढीसमोर काय ठेवणार?”
“ही निवडणूक तत्त्वांची — पैशांची नाही” — उदयसिंह पाटील
उदयसिंह पाटील म्हणाले, “ही फक्त नगरपालिका निवडणूक नाही; ही तत्त्वांची लढाई आहे. दोन–तीन दिवसांत नोकर्या व पैशांचे अमिष दाखवले जाईल, पण मतदारांनी स्वाभिमानाने मतदान करावे. कराड दक्षिणेत रुजू पाहणारी चुकीची प्रवृत्ती थांबविण्याची वेळ आलेली आहे.”
हर्षल कदम : “सत्ताधाऱ्यांनी बाजार मांडला, लोकशाही धोक्यात” “सत्ताधारी पैशांचा व सत्तेचा उघड गैरवापर करत आहेत. मतदारांना गृहीत धरले जात आहे. हा बाजार रोखला पाहिजे,” असे हर्षल कदम म्हणाले.
डॉ. आर्यन कांबळे : “मलकापूरचे प्रश्न माझी जबाबदारी”
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. आर्यन कांबळे म्हणाले, “मलकापूरमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. सुख-दुःखात मलकापूरकरांच्या पाठीशी राहण्याचे वचन देतो.”
उपकाराची फेड अशी? — अजित पाटील-चिखलीकर यांचा मनोहर शिंदेंवर जोरदार हल्ला
“पृथ्वीराज चव्हाण यांनी मलकापूरसाठी तब्बल सोळाशे कोटींचा निधी दिला. दोन वेळा आमदारकी तुमच्या घरात दिली. अशा मोठ्या उपकारांची फेड त्यांनी विरोधकांच्या मांडीवर जाऊन बसून केली का?” असा थेट प्रश्न विचारत अजित पाटील-चिखलीकर यांनी मनोहर शिंदेंवर शब्दबाण सोडला.
“पृथ्वीराज बाबांचा हा अपमान धुवून काढण्यासाठी जनतेने त्यांना बाजूला करावे,” असे आवाहन त्यांनी केले. सभेला मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Comments
Post a Comment