मलकापुरात समविचाऱ्यांच्या मदतीने विजय मिळवू; ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर

 

मलकापुरात समविचाऱ्यांच्या मदतीने विजय मिळवू; ॲड. उदयसिंह पाटील- उंडाळकर 

NCP चे नगराध्यक्षपदासह सोळा उमेदवार रिंगणात

कराड, दि. 21 - नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शेवटच्या क्षणी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे सर्व जागांवर उमेदवार देता आले नाहीत, त्यामुळे अपेक्षित आघाडी साधता आली नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे नगराध्यक्षपदासह 16 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले असून, या निवडणुकीत समविचारी पक्षांना सोबत घेऊन विजय मिळवू, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस संपताच राष्ट्रवादीने अधिकृतरित्या उमेदवार जाहीर केले. यावेळी रयत संघटनेचे प्रा. शरद काटकर, राजेश पाटील- वाठारकर, काँग्रेसचे अजितराव पाटील - चिखलीकर, इंद्रजीत चव्हाण, नामदेवराव पाटील, पाटणचे राजेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

समविचारी व नाराज कार्यकर्त्यांना घेऊन नवे राजकीय समीकरण उभे करण्याच्या टीकेवर उत्तर देताना उंडाळकर म्हणाले, लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ज्यांनी टीका केली, त्यांच्याच सोबत असलेले लोक नाराज का झाले, हा संशोधनाचा विषय आहे. काँग्रेससोबत आघाडी न झाल्याने काही ठिकाणी उमेदवार मिळवणे कठीण गेले, मात्र मलकापूरच्या विकासासाठी सक्षम व उमद्या चेहऱ्यांना संधी दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपविरोधात समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा राष्ट्रवादीने पुढाकार घेतला. त्याला काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तसेच इतर समविचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. शिव, शाहू, आंबेडकर विचार मानणाऱ्यांनाच आम्ही सोबत घेतले आहे, असे उंडाळकर यांनी सांगितले. 

नाराज लोकांना साथ दिली असली तरी, त्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मलकापूरात भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आल्याबाबत ते म्हणाले, त्या जागांवर इतर कोणत्याही पक्षाकडून उमेदवार उभे राहिले नाहीत, म्हणून त्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने आणखी एक जागा बिनविरोध झाली. इतर पक्षांना नगराध्यक्ष पदासाठी सोबत घेणार का, या प्रश्नावर याबाबत चर्चा सुरू असल्याचे उंडाळकर यांनी सांगितले. 

काँग्रेसचे अजित पाटील-चिखलीकर यांनी मनोहर शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर तीव्र टीका केली. त्यांचे नाव न घेता चिखलीकर म्हणाले, काँग्रेस पक्षाने त्यांच्या कुटुंबाला मोठे स्थान दिले. त्यांच्या वडिलांना दोन वेळा विधान परिषदेची आमदारकी दिली. तरीही त्यांना कोणती अडचण निर्माण झाली की, त्यांनी पक्ष सोडावा लागला? लोकसभा निवडणुकीनंतरपासून त्यांची हालचाल सुरू होती. याबाबतची कल्पना पृथ्वीराज चव्हाण यांना दिली होती, असे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेससाठी काम केले नाही, हे वास्तव आहे. मलकापुरात चार हजार मते कशी कमी पडली, याचे उत्तर त्यांनी द्यावे. यावेळी संक्रमणकाळ असला तरी आम्ही निष्ठावंत आहोत, कोणाच्याही वळचणीला जाणार नाही, असेही चिखलीकर यांनी नमूद केले.

तत्पूर्वी, राजेश देसाई यांनी, राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे घड्याळ चिन्हावर नगराध्यक्षपदासाठी आर्यन कांबळे यांच्यासह नगरसेवकपदासाठी 16 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. समविचारी लोकांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक