कराड उपविभागीय अधिकारी, अव्वल कारकून यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी.

उपविभागीय अधिकारी, अव्वल कारकून यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी.

'त्या' नऊ मतदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा; गणेश पवार

8 ऑक्टोंबर पासून गणेश पवार यांचे आंदोलन

कराड, दि. 6 - संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांना निलंबीत करुन खातेनिहाय चौकशी करावी, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी दक्षिण विधानसभा मतदारसंघ यांचीही योग्य ती चौकशी करून कारवाई करावी, त्याचबरोबर कापील येथिल त्या नऊ मतदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा 8 ऑक्टोंबर पासून आंदोलन व उपोषण करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

अधिक माहिती देताना गणेश पवार म्हणाले की, कराड तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज वसंतराव पाटील यांचे तलाठी पदावरुन जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडील क्र. मह/२/आस्था/२/कावि.९२२/२०१३ दि.०१.१०.२०१३ आदेशान्वये पदोन्नतीने बदली मंडलाधिकारी, सैदापूर या पदावरती झाली होती. युवराज पाटील यांनी सैदापूर मंडल अधिकारी या पदावरती काम करीत असताना जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडून क्र. मह/२/आस्था/१/कावि. ७४० (४)/२०१८ या आदेशाने दि. २१.०५.२०१८ रोजी युवराज वसंतराव पाटील यांची सैदापूर मंडल अधिकारी या पदावरुन कराड तहसिल कार्यालयातील इंदिरा गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती बदली करण्यात आली. इंदिरा गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती युवराज पाटील यांनी ५ वर्ष काम केले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी, सातारा यांनी क्र. मह/२/आस्था/१/कावि.५२२(४)/२०२३ या आदेशाने दि. ३१.०५.२०२३ रोजी युवराज वसंतराव पाटील यांची कराड तहसिल कार्यालयातील इंदिरा गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरुन कराड तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती बदली करण्यात आली आहे.

युवराज वसंतराव पाटील यांची कराड तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती बदली झालेली असताना त्यांनी संजय गांधी योजनेचे काम करणे अपेक्षित असताना त्यांनी तिथे काम न करता ते निवडणूक शाखेमध्ये काम करीत आहे. 

मुळात युवराज पाटील हे तलाठी वर्गातून पदोन्नतीने मंडल धिकारी झालेले आहेत. तसेच नायब तहसिलदार संवर्गात पदोन्नती करीता मंडल अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाचा अनुभव येण्यासाठी त्यांनी कार्यालयामध्ये दोन वर्ष काम करण्याबाबत दि. २९.१०.२०२० चा शासन निर्णय आहे.

युवराज पाटील यांनी कराड तहसिल कार्यालयातील इंदिरा गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती ५ वर्ष काम केले आहे तसेच कराड तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती गेल्या २ वर्षापासून काम करीत आहेत. म्हणजे एकूण ७ वर्षे ते कराड तहसिल कार्याल्यातील इंदिरा गांधी व संजय गांधी योजनेच्या शाखेमध्ये काम करीत आहेत आणि ते अजून किती वर्षे कराड तहसिल कार्यालयात काम करणार आहेत. कारण, मंडल अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामाचा अनुभव येण्यासाठी त्यांनी २ वर्षे काम करणेबाबतचा हा शासन निर्णय असतानाही युवराज पाटील यांना तो लागू का केला गेला नाही याबाबत ही चौकशी होणे आवश्यक आहे.

युवराज वसंतराव पाटील यांची कराड तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती बदली झालेली आहे, परंतु ते संजय गांधी योजनेचे काम न करता त्यांनी तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेचे आदेश नसताना काम केले आहे. याबाबत कराड तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेमध्ये निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार हे पद रिक्त होते. यासाठी या रिक्त पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांच्या कार्यालयातून युवराज पाटील संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून यांचेकडे दि. ३१.०८.२०२३ रोजी देण्यात आला होता. या आदेशामध्ये उपरोक्त विषय संदभर्भीय पत्रांवर विनंती करण्यात आलेनुसार निवडणूक नायब तहसिलदार, तहसिल कार्यालय, कराड या रिक्त पदाचा कार्यभार श्री. युवराज पाटीला, संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून तहसिल कार्यालय, कराड यांचेकडे अतिरीक्त स्वरुपात सुपुर्द करण्यात आलेल्या आपले कार्यालयाच्या आदेशास यान्वये कार्योत्तर मंजूरी देण्यात येत आहे. असे नमूद आहे. या आदेशाच्या अनुषंगाने युवराज पाटील यांनी संजय गांधी योजनेचे काम करुन निवडणूक शाखेमध्येही काम करणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी संजय गांधी योजनेचे कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. त्यांनी पूर्णवेळ निवडणूक शाखेमध्ये  काम केलेले आहे. तसेच शासन निर्णय क्र. पदोन्न २०२४/प्र.क्र.०८ (भाग २)/ई ९ दि. १३ मार्च २०२४ च्या निर्णयानुसार हेमंतकुमार लक्ष्मण बेसके यांची निवडणूक नायब तहसिलदार कराड या पदावरती पदोन्नतीने बदली झाल्याने ते दि. १४.०३.२०२४ रोजी हजर झालेले आहेत.

हेमंतकुमार लक्ष्मण बेसके हे निवडणूक नायब तहसिलदार कराड या पदावर हजर झाल्यानंतर संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांचेकडे अतिरीक्त स्वरुपात रिक्त पदाचा कार्यभार देण्यात आला होता, तो संपला होता. त्यानंतर त्यांनी निवडणूक शाखेतून संजय गांधी योजनेच्या अव्वल कारकून या पदावरती येऊन काम करणे अपेक्षित होते, परंतु ते संजय गांधी योजनेचे काम न पाहता ते कोणाचाही आदेश नसताना ते कराड तहसिल कार्यालयाच्या निवडणूक शाखेमध्येच काम करीत आहेत.

तसेच कराड तहसिलदार यांनी दि. २३.०६.२०२५ रोजी दैनंदिन कामकाज विहित मुदतीत पार पाडणे कामे कर्मचारी यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने एक आदेश काढलेला आहे. यामध्ये त्यांनी पूर्वीच्या संकलनाचे नांव व या आदेशात देण्यात येणाऱ्या संकलनाचे नांव टाकून आदेश दिलेला आहे. या आदेशामध्ये युवराज पाटील निवडणूक सहाय्यक महसूल अधिकारी हे पूर्वीच्या संकलनामध्ये काम करीत आहेत, असे नमूद केले आहे. तसेच आदेशान्वये देण्यात येणारे संकलन निवडणूक सहाय्यक महसूल अधिकारी असे नमूद करुन आदेश दिलेला आहे.

यावरुन असे दिसून येत आहे की, जिल्हाधिकारी यांचेकडून दि. ३१.०८.२०२३ रोजी संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांचेकडे रिक्त पदाचा अतिरीक्त स्वरुपात कार्यभार दिला होता. तो संपलेला असतानाही संजय गांधी योजनेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांना कोणताही आदेश नसताना ते निवडणूक शाखेमध्ये काम करीत होते व संजय गांधी शाखेमध्ये हजर नसतानाही त्या पदाचा त्यांनी पगार घेतलेला आहे. तसेच कराड तालुक्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये बनावट आधार कार्ड तयार करुन बोगस मतदान वाढवणे, पूर्वींच्या मतदारसंघातून नांव कमी न करता कराड तालुक्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये नव्याने नांव वाढवणे या सर्व गोष्टींमध्ये युवराज वसंतराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन या सर्व गोष्टी केलेल्या आहेत.

त्यामुळे संजय गांधी शाखेचे अव्वल कारकून युवराज पाटील यांचे निलंबन करुन त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी.

त्यांचे निलंबन करुन खातेनिहाय चौकशी केली गेली नाही तर मी दि.०८.१०.२०२५ रोजीपासून काही दिवस धरणे आंदोलन, काही दिवस ठिय्या आंदोलन व नंतर आमरण उपोषण करणार आहे, असे तक्रारी अर्ज मा. विभागीय आयुक्त साो, पुणे व मा. जिल्हाधिकारी साो, सातारा यांना देण्यात आले होते, परंतु याबाबत त्यांनी कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मी दि.०८.१०.२०२५ रोजीपासून काही दिवस धरणे आंदोलन, काही दिवस ठिय्या आंदोलन व नंतर आमरण उपोषणास बसणार आहे. 

उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी; गणेश पवार 

आमच्या कापील गांवामध्ये प्रियांका श्रीकांत चव्हाण, रुथ माईकल काळे, स्वाती सुनिल मोरे, शितल सुरेश सावंत, किशोर जयवंत जाधव, सुरेश बबन मदने, मधुकर डिसले, सुनिता सुरेश जाधव, स्वाती हणमंत पाटील या सर्व व्यक्ती कापील गांवच्या रहिवासी नाहीत तसेच या लोकांची कापील गांवामध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या तसेच २०२४ च्या झालेल्या लोकसभेच्या मतदार यादीमध्ये या लोकांची नांवे नव्हती. या लोकांची नांवे २०२४ च्या विधानसभेला लागलेली आहेत तसेच या लोकांच्या नांवावरती कापील गांवामध्ये घर, जमीन, रेशनकार्ड नसताना या लोकांनी कापील गांवच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करुन कापील गांवामध्ये मतदान नोंदणी करुन मतदान केलेले आहे. त्यामुळे याबाबत उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ यांची योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ही गणेश पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.

गणेश पवार म्हणाले, या लोकांच्या पूर्वीच्या मतदार संघातील त्यांच्या गांवातील मतदार यादीतून त्यांची नांद कमी झालेली नाहीत तसेच या लोकांच्या घरातील इतर व्यक्तींची नांवे कापील गांवच्या मतदार यादीमध्ये नाहीत तसेच या लोकांच्या नांवावरती घर, जमीन, रेशनकार्ड नाही. असे असताना या लोकांनी कोणत्या कागदपत्राच्या आधारावरती आधार कार्ड वरती कापील गांवचा पत्ता बदललेला आहे, याची चौकशी करुन त्यांचेवरती फौजदारी दाखल करण्यासंदर्भात मी उपविभागीय अधिकारी, कराड व तहसिलदार साो, कराड यांचेकडे तक्रारी अर्ज दिले होते. या अर्जामध्ये या लोकांची नांवे कमी करण्यासंदर्भात मी कोणतीही मागणी केलेली नव्हती. या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, अशी माझी मागणी असल्याचे पवार यांनी सांगितले.

माझ्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तहसिलदार कराड यांनी मंडल अधिकारी मलकापूर यांना याबाबत योग्य ती चौकशी करुन अहवाल सादर करणेबाबतचे लेखी आदेश दिले होते. या आदेशाच्या अनुषंगाने मंडल अधिकारी मलकापूर, कापील गांवामध्ये तलाठी व ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष गांवामध्ये पहाणी केली. त्यानंतर त्यांनी हे लोक कापील गांवामध्य सध्या वास्तव्यास नाहीत तसेच या लोकांची पूर्वीच्या कापील ग्रामपंचायतीच्या व २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या मतदार यादीमध्ये या लोकांची नांवे नव्हती, परंतु २०२४ विधानसभेला या लोकांची नांवे मतदार यादीमध्ये कशी समाविष्ट झाली, याबाबत एकही ठोस पुरावा आढळून येत नसल्याचे पंचनाम्यात व अहवालात नमूद करुन मंडल अधिकारी यांनी तो अहवाल तहसिलदार कराड यांना सादर केलेला आहे.

या अहवालाच्या अनुषांगने तहसिलदार कराड यांनी या लोकांचे नांवे मतदार यादीतून कमी करण्यासाठी बी.एल.ओ. यांना ७ नंबरचा फॉर्म भरणे संदर्भात लेखी आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अनुषांगने बी.एल.ओ. यांनी ७ नंबरचे फॉर्म भरलेले आहेत. या भरलेल्या अर्जावरुन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी सुनावणी घेऊन या लोकांची नोंव कमी करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.

मुळात या लोकांच्या नांवावरती कापील गांवामध्ये घर, जमीन, रेशनकार्ड नसताना या लोकांची नव्याने कापील गांवच्या मतदार यादीमध्ये नांवे समाविष्ट करताना पूर्वीच्या त्यांच्या गांवातील मतदार यादीतील नांवे कमी झालेली आहेत की नाहीत, हे पहाणे आवश्यक असतानाही मतदान नोंदणी अधिकारी यांनी हे न पाहता या लोकांची नांवे कापील गांवच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट केलेली आहेत.

उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी यांनी या लोकांची पूर्वीच्या मतदार यादीतील नांवे कमी झालेली नसताना कापील गांवच्या मतदार यादीमध्ये नव्याने या लोकांची नांवे का समाविष्ट केली तसेच या लोकांनी मतदान केल्यानंतर माझ्या तक्रारी अर्जामध्ये या लोकांची नांवे कमी करणे संदर्भातील मागणी नसतानाही बी.एल.ओ. मार्फत ७ नंबरचे फॉर्म भरुन नांवे कमी करण्याचे आदेश का दिले, या सर्व गोष्टीची चौकशी करुन त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी.

उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी यांची याबाबत योग्य ती चौकशी करुन त्यांचेवरती कारवाई करावी याबाबत मा. जिल्हाधिकारी साो, सातारा यांना दि..०८.१०.२०२५ रोजी पासून प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयाच्या बाहेर काही दिवस धरणे आंदोलन, काही दिवस ठिय्या आंदोलन व नंतर आमरण उपोषण करणार आहे, असा अर्ज दिलेला होता, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मी दि.०८.१०.२०२५ रोजीपासून काही दिवस धरणे आंदोलन, काही दिवस ठिय्या आंदोलन व नंतर आमरण उपोषणास बसणार आहे.

त्या नऊ मतदारावर फौजदारी गुन्हा दाखल होणेबाबत..

प्रियांका श्रीकांत चव्हाण, रुथ माईकल काळे, स्वाती सुनिल मोरे, शितल सुरेश सावंत, किशोर जयवंत जाधव, सुरेश बबन मदने, मधुकर डिसले, सुनिता सुरेश जाधव, स्वाती हणमंत पाटील या सर्व व्यक्ती कापील गांवच्या रहिवासी नाहीत तसेच या लोकांची कापील व पाचवड वस्ती याठिकाणी घर, जमीन, रेशनकार्ड नसताना या लोकांनी कापील गांवच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करुन कापील गांवामध्ये मतदान नोंदणी करुन मतदान केलेले आहे. त्यामुळे वरील सर्वांच्या वर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही गणेश पवार यांनी केली आहे.

गणेश पवार म्हणाले, हे लोक कापील गांवामध्ये राहणेसाठी नाहीत तसेच पूर्वीच्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या व २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या मतदार यादीमध्ये या लोकांची नांवे नव्हती, परंतु २०२४ च्या विधानसभेला या लोकांची नांवे कशी काय समाविष्ट झाली, याबाबत काही एक ठोस पुरावा आढळून येत नसल्याबाबत तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी यांनी पंचनामा करुन अहवाल तहसिल कार्यालयामध्ये दिलेला आहे.

तसेच या लोकांची नांवे कमी करण्यासंदर्भात तहसिलदार यांनी बी.एल.ओ. काफील यांना आदेश देऊन ७ नंबरचा फॉर्म भरण्यास सांगितले होते. त्या ७ नंबरच्या भरलेल्या फॉर्म वरुन उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी यांनी सुनावणी घेऊन या लोकांची नांवे कमी करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत.

तसेच या लोकांनी कापील गांवातील काही लोकांचेकडून नोटराईज भाडेकरार केलेले आहेत.

तर एकाकडून १०० रुपयांच्या स्टॅप पेपरवरती भाडे करार केला आहे. ते त्यांनी सुनावणीवेळी मतदान नोंदणी अधिकारी यांचेसमोर हजर केलेले आहेत, परंतु यामध्ये लिहून देणार यांच्या नांवाचे स्टैंप पेपर नसून लिहून घेणार यांच्या नांवाचे स्टॅप पेपर वापरले आहेत तसेच काहींचे स्टैंप पेपर हे पुण्यातून आणल्याचे दिसून येत आहे तसेच ही नोटरी केलेले कागदपत्रे बनावट केल्याचे दिसून येत आहे.

त्याचबरोबर नोटरी केलेल्या भाडे कराराच्या कागदपत्रावरती आधार कार्डचा रहिवासी बाबतचा पत्ता बदलता येत नाही, मग या लोकांनी कोणती कागदपत्रे देऊन कापील गांवच्या पत्त्याचे आधार कार्ड तयार केले आहे. या सर्व बाबीची चौकशी होऊन या सगळ्यांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल व्हावे, ही विनंती.

या सर्वांची चौकशी करुन फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत म्हणून मा. जिल्हाधिकारी साो, सातारा यांना तक्रारी अर्ज दिलेले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मी दि.०८.१०.२०२५ रोजीपासून काही दिवस धरणे आंदोलन, काही दिवस ठिय्या आंदोलन व नंतर आमरण उपोषणास बसणार असल्याचे गणेश पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आधार कार्डवरती खोटा पत्ता दाखवून मतदार यादीत नांव; गणेश पवार यांची पोलिसात तक्रार

कपिल गावातील त्या नऊ मतदारांनी आधार कार्ड वरती खोटा पत्ता दाखवून मतदार यादीत नाव नोंदवले असल्यामुळे त्यांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती दिली.

या तक्रार अर्जात म्हटले आहे की, मी कापील गांवचा कायमचा रहिवासी असून, आपणास कळवू इच्छितो की, १) प्रियांका श्रीकांत चव्हाण, २) रुथ माईकल काळे, ३) स्वाती सुनिल मोरे, ४) शितल सुरेश सावंत, ५) किशोर जयवंत जाधव, ६) सुरेश बबन मदने, ७) मधुकर डिसले, ८) सुनिता सुरेश जाधव, ९) स्वाती हणमंत पाटील या व्यक्तींनी आमच्या गांवात जमीन, घर, रेशन कार्ड, लाईट बिल इ. कोणतेही कायदेशीर पुरावे नसताना खोट्या माहितीच्या आधारे आधार कार्डवर पत्ता बदल केला आहे. या खोट्या पत्त्याच्या आधारे त्यांनी आमच्या गांवाच्या मतदार यादीत आपले नांव नोंदवून घेतले आहे.

ही कृती कायदेशीर गुन्हा असून, Representation of the People Act, 1950 च्या कलम ३१ नुसार खोट्या माहितीच्या आधारे मतदार म्हणून नोंदणी करणे हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६५, ४७१ यानुार खोटे कागदपत्र तयार करुन वापरणे हा फौजदारी गुन्हा आहे.

तसेच यातील स्वाती सुनिल मोरे व प्रियांका सुभाष चवरे या दोघींची वेगवेगळ्या पत्त्याची आधार कार्ड पुरावा म्हणून देत आहे. तरी यांच्यावरती गुन्हा दाखल करुन बाकी या सर्व लोकांची चौकशी करुन संबंधित व्यक्तींवर कायदेशीर फौजदारी कारवाई करावी, ही नम्र विनंती.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक