कराड दक्षिण मधील 26 गावांतील पाणंद रस्त्यांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर
कराड दक्षिण मधील 26 गावांतील पाणंद रस्त्यांसाठी १२ कोटींचा निधी मंजूर
कराड, ता. १२ : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तब्बल २६ गावांमधील एकूण ६० किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणास महायुती शासनाने मंजुरी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या कामासाठी तब्बल १२ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी यंत्रसामुग्री शेतापर्यंत नेण्यासाठी व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल बाहेर काढण्यासाठी पाणंद रस्ते उपयोगी पडतात. पण कराड दक्षिणमधील अनेक गावांमधील पाणंद रस्त्यांने दीर्घकाळापासून मजबुतीकरण न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषत: सुगीच्या दिवसांत कृषी माल बाहेर काढून बाजारात पोहचविणे, शेतीअवजारे शेतापर्यंत पोहचविणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे या पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणाबाबत आग्रही भूमिका घेत, आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी गेल्यावर्षी महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमधील सुमारे २२७ किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणास मंजुरी मिळवून आणली होती. यात आता पुन्हा ६० किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांची भर पडली आहे.
आ.डॉ. भोसले यांनी याप्रश्नी राज्याचे रोजगार मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत महायुती सरकारने कराड दक्षिणमधील २६ गावांमधील एकूण ६० किलोमीटरच्या पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपाणंद योजनेतून मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांची रानातील वाट अधिक सुकर होणार आहे.
यामध्ये वाठार (२ किमी), कालवडे (५ किमी), भुरभुशी (१ किमी), शिंगणवाडी (१ किमी), गोवारे (६ किमी), कोळे (१ किमी), अंबवडे (२ किमी), येरवळे (३ किमी), वारुंजी (१ किमी), शेणोली (३ किमी), रेठरे बुद्रुक (४ किमी), नांदगाव (१ किमी), किरपे (६ किमी), विंग (५ किमी), काजरवाडी (१ किमी), विठोबाचीवाडी (१ किमी), बेलवडे बुद्रुक (४ किमी), शेरे (१ किमी), रेठरे खुर्द (१ किमी), गोटेवाडी (२ किमी), महारुगडेवाडी (१ किमी), मनव (१ किमी), सवादे (३ किमी), बांदेकरवाडी (२ किमी), शेवाळेवाडी - म्हासोली (१ किमी), म्हासोली (१ किमी) अशा एकूण २६ गावांमधील एकूण ६० किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांचे खडीकरण केले जाणार आहे. या निधीबद्दल आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे व महायुती सरकारचे सर्वस्तरातून आभार मानले जात आहेत.

Comments
Post a Comment