कराड दक्षिण मतदारसंघातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 2 कोटी रुपयांचा निधी

              रेठरे बुद्रुक : पर्यटन विकास प्रकल्पाचे संकल्पचित्र

कराड दक्षिण मतदारसंघातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी 2 कोटी रुपयांचा निधी

कराड, दि. 28 : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असून, यामुळे कराड दक्षिण मतदारसंघातील धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनस्थळांच्या विकासाला नवसंजीवनी मिळणार आहे.

                   आटके : पर्यटन विकास प्रकल्पाचे संकल्पचित्र

कराड दक्षिण मतदारसंघात अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेली पर्यटनस्थळे आहेत. तसेच अनेक देवस्थाने, मठ, मंदिरे आणि सांस्कृतिक परंपरा आहेत. या ठिकाणांचा पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास करण्यासाठी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले विशेष प्रयत्नशील आहे. कराड दक्षिणमधील रेठरे बुद्रुक व आटके येथील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी त्यांनी राज्याचे पर्यटन मंत्री ना. शंभुराज देसाई यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याची दखल घेत राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीअंतर्गत कराड दक्षिणमधील रेठरे बुद्रुक व आटके येथील दोन प्रमुख पर्यटनस्थळांवर विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. रेठरे बुद्रुक येथील श्री महादेव मंदिर आणि श्री जोतिबा मंदिर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी दीड कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण, रस्ते व प्रवेशमार्ग दुरुस्ती, प्रकाश योजना, पार्किंग, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि पर्यटकांसाठी इतर सुविधा उभारल्या जाणार आहेत. तसेच आटके येथील श्री मुकुंद महाराज मठ परिसरात सभामंडप व सुविधा केंद्र बांधकामासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. धार्मिक वातावरणास पूरक अशा पद्धतीने हा परिसर विकसित केला जाणार असून, स्थानिक श्रद्धा आणि परंपरा जपण्यावर भर दिला जाणार आहे. 

या निधीमुळे कराड दक्षिणमधील धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांचे रूप पालटणार असून, ग्रामीण पर्यटनाच्या नव्या शक्यता निर्माण होणार आहेत. तसेच रेठरे बुद्रुक आणि आटके या ठिकाणांचा समावेश पुढील काळात राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे होईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे. आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या या निधीमुळे कराड दक्षिण मतदारसंघातील धार्मिक पर्यटनाला नवे बळ मिळणार असल्याने, रेठरे बुद्रुक व आटके ग्रामस्थांकडून महायुती सरकारचे व आ.डॉ. भोसले यांचे आभार मानले जात आहेत.

या निधीबद्दल बोलताना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले की, कराड दक्षिण मतदारसंघात धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा समृद्ध आहे. या ठिकाणांचा विकास करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि पर्यटन वाढवणे हे आमचे ध्येय आहे. पर्यटन सुविधा वाढल्यास स्थानिक लोकांसाठी रोजगारनिर्मिती, छोट्या व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि गावांचा सर्वांगीण विकास साधता येईल. येत्या काळात इतर गावांमधील पर्यटनस्थळांसाठीही भरघोस निधी आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे.



Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक