स्वयंरोजगार प्रोत्साहन व बेरोजगारांसाठी विशेष कर्ज योजना राबविणार;अॅड. उदयसिंह पाटील
स्वयंरोजगार प्रोत्साहन व बेरोजगारांसाठी विशेष कर्ज योजना राबविणार;अॅड. उदयसिंह पाटील
कोयना सहकारी बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
कराड, दि. 9 : कोयना सहकारी बँक लि., कराडची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मार्केट यार्ड येथे चेअरमन कृष्णत (के. टी.) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बँकेचे संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील, संचालक व युवानेते अदिराज पाटील, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, प्रा. धनाजी काटकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, स्वा. शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेंवाळे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सी. ए. तानाजीराव जाधव यांच्यासह बँकेचे संचालक, मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीस लोकनेते स्व. विलासकाका पाटील (उंडाळकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ सहकारी नेते स्व. वसंतराव जगदाळे, देशातील सामाजिक, राजकीय, सहकारी, कला व क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बँकेचे संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील यांनी सहकार तत्त्वांचा अवलंब करून कोयना सहकारी बँक, कोयना दूध संघ, स्वा. शामराव पाटील पतसंस्था, कराड खरेदी विक्री संघ आणि रयत साखर कारखाना या संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. स्व. विलासकाकांनी सहकाराची पायाभरणी सामान्य माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली होती. त्यांच्या कार्यपद्धतीत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींनाही नेतृत्वाची संधी मिळाली. तसेच सहकार क्षेत्रात स्व. वसंतराव जगदाळे यांनी दिलेले पन्नास वर्षांचे योगदान अनुकरणीय असून, आजच्या सभेत त्यांना श्रद्धांजली वाहणे ही खरी कृतज्ञता असल्याचे ते म्हणाले.
रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार संचालकास मंडळास १० वर्षेनंतर थांबावे लागत आहे. नवीन संचालक मंडळाने अधुनिक बँकिंग बरोबरच मार्केटिंगमध्ये नवींन प्रोडकट्स काय आहे याची माहिती घेवून काम करावे असे आवाहन यावेळी केले.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन कृष्णत पाटील म्हणाले की, नवीन संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे ही बाब अत्यंत अभिमानास्पद असून, ही निवड म्हणजे सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास व प्रेमाचे प्रतीक आहे. बँकेच्या संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील (दादा) आणि युवा संचालक अदिराज पाटील (बाबा) यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली कोयना बँकेने सातत्याने प्रगती साधली आहे. मार्च २०२५ अखेर बँकेच्या ठेवी १८३ कोटी रुपये, कर्जवाटप १२८ कोटी रुपये, नफा ९० लाख रुपये, खेळते भांडवल २१४ कोटी रुपये, निधी १७ कोटी रुपये तर एकूण व्यवसाय ३११ कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले. ही आकडेवारी केवळ आर्थिक यशाची साक्ष देत नाही तर सर्व सभासद, हितचिंतक, अधिकारी व कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे द्योतक आहे.
आज बँकिंग क्षेत्र हे डिजिटल आणि ग्राहककेंद्रित सेवांवर आधारित झाले असून, कोयना बँकेने UPI, IMPS, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. सभासदांनी या आधुनिक सेवांचा पूर्ण लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेतून अनेक बेरोजगार तरुणांना तीन लाख रुपयांपर्यंत व्याज परताव्याचा लाभ मिळवून दिला आहे. याच धर्तीवर बँक येत्या काळात स्वयंरोजगार प्रोत्साहन योजना आणि सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी विशेष कर्ज योजना राबविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. या योजनांमुळे तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच कर्ज थकबाकी वसुलीला प्राधान्य देऊन वसुली शून्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. कर्जदार, शिफारसकर्ते, जामीनदार व सभासद यांनी या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सभेचे प्रास्ताविक बंक्केचे अधिकारी दिनकर रामिष्ठे यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने यांनी अहवाल वाचन केले. बँकेचे संचालक तुकाराम डूबल यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. बँकिंग तज्ञ प्रतापसिंह चव्हाण व आयटी तज्ञ सुनील बोटलवार यांनी सभासदांना मार्गदर्शन केले. सभेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष साहेबराव शेवाळे यांनी केले.


Comments
Post a Comment