मनाने मोठी माणसेच माणुसकी जिवंत ठेवतात;प्रा.डॉ. भिमराव पाटील


मनाने मोठी माणसेच माणुसकी जिवंत ठेवतात;प्रा.डॉ. भिमराव पाटील

नगरपरिषदेच्या ९३ व्या शारदीय व्याख्यानमालेस उत्साहात प्रारंभ

कराड, दि. 24 - बुद्धीने चांगली माणसे स्वतःचा आधी विचार करतात, पण मनाने चांगली माणसे दुसऱ्याचा आधी विचार करतात. छत्रपती शिवाजी महाराजांसह कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा, सिंधुताई संकपाळ यांसारख्या थोर व्यक्तींनी कर्तृत्व, संस्कार आणि दातृत्वातून माणुसकी जिवंत ठेवली. आज प्रत्येकाने त्यांच्या वाटेवरून चालले, तरच खरी माणुसकी जिवंत राहील, असे प्रतिपादन प्रा.डॉ. भिमराव पाटील यांनी केले.

कराड नगरपरिषदेच्या सार्वजनिक वाचनालयामार्फत आयोजित ९३ व्या व्याख्यानमालेत ‘माणुसकी हरवतेय का?’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे होते. नगरपरिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, प्रशासकीय अधिकारी सुवर्णा विभुते, प्रा.बी.एस. खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पाटील म्हणाले, शहरी प्लॅट संस्कृतीपेक्षा ग्रामीण भागात अजूनही माणुसकी आणि माणूसपण जिवंत आहे. आज संवाद हरवत चालला आहे.

सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या समाजाने पुन्हा वाचनाकडे वळले पाहिजे. नैराश्य टाळायचे असेल, तर ग्रंथालयाच्या सान्निध्यात वेळ द्या. मंदिरांसह शाळा, ग्रंथालय, हॉस्पिटलसाठीही देणगी देणे, ही खरी माणुसकी आहे. कर्मवीरांनी धनिकांकडून नव्हे; तर सामान्य जनतेकडून एकेक रुपया गोळा करून एसजीएम महाविद्यालयासारखी ज्ञानमंदिरे उभारली. त्यांनी दाखवून दिलेली ही माणुसकी आजही आदर्श आहे.

पालकांना आवाहन करताना ते म्हणाले, इंग्रजी शाळांचा अट्टहास करू नका. मराठी शाळांचा दर्जा उंचावण्यावर भर द्या. कराड नगरपरिषदेची शाळा क्रमांक तीन हे याचे जिवंत उदाहरण आहे.

तसेच, गावागावात कटुता विसरून सहकार्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. काही गावांनी टीव्ही बंद ठेवून संवाद वाढवण्याचा घेतलेला निर्णय माणुसकी जपण्याचा अभिनव प्रयोग आहे. दरम्यान, घटस्थापनेचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी शेती, पेरणी व निसर्गसंवर्धन यांचा संबंध सांगून, परंपरा टिकवण्याचे आवाहन केले.

प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे म्हणाले, सांस्कृतिक आणि बौद्धिक मेजवानी असलेली व्याख्यानमाला ९३ वर्षे अखंड चालते, हेच मोठे यश आहे. यात श्रोत्यांचे योगदान फार मोठे आहे. सत्य, ज्ञान आणि संस्कारांचा हा दीप शतकानुशतके तेवत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

प्रास्ताविकात मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी वाचनालयाचा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास सांगताना एक लाखांपेक्षा अधिक पुस्तकांचा संग्रह व उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार हा कराडकरांचा अभिमान आहे. यामध्ये स्व.पी.डी. पाटील, सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी, प्रतिमापूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. परिचय सुवर्णा विभुते यांनी करून दिला, सूत्रसंचालन सुहास इनामदार यांनी केले. तर अनिल थोरात यांनी आभार मानले. यावेळी ग्रंथपाल महेंद्र लोखंडे, सेवानिवृत्त ग्रंथपाल संजय शिंदे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

फक्त शेतकरी, अडाण्यांनीच माणुसकी जपायची?

शेतमालाला योग्य भाव मिळाला, तरच शेतकरी आणि त्याचे कुटुंब सुखी होईल. व्यापाऱ्याऐवजी थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करा, ते नेहमी झुकते माप देतील. फक्त शेतकरी, अडाणी लोकांनीच माणुसकी जपायची का?, याचा सुशिक्षितांनी विचार करावा. ऊस दराऐवजी साखरेच्या दरवाढीसाठी आंदोलन झाले, तर शेतकऱ्यालाही आपोआप फायदा होईल, असे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक