संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते;प्रा.डॉ. विनोद बाबर

कराड - कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयातर्फे यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे आयोजित केलेल्या व्याखानमालेत बोलताना प्रा.डॉ. विनोद बाबर, समोर उपस्थित जनसमुदाय.

संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते

प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते प्रा.डॉ. विनोद बाबर यांच्या व्याख्यानाला कराडकरांचा प्रचंड प्रतिसाद

कराड - आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल, तर मोबाईलपासून दूर रहा, एखाद्याला माफ करा आणि कान भरणाऱ्यांपासून सावध राहा. संकटे त्यांच्या वाट्याला येतात, ज्यांची ती पेलायची ताकद असते. एक दार बंद झाले, तर शंभर दारे उघडतात. त्यामुळे संकटाच्या छाताडावर पाय द्या, यश तुमचेच आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. विनोद बाबर यांनी केले.

कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयातर्फे आयोजित 93 व्या व्याख्यानमालेतील तृतीय पुष्प गुंफताना ‘संकटे त्यांच्या वाटायला येतात, ज्यांची पेलायची ताकद असते' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे सेवानिवृत्त अभियंता ए.आर. पवार होते. यावेळी लेखापाल गंगाधर जाधव, प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव, प्रा. बी. एस. खोत उपस्थित होते.

मोबाईलने जग जवळ आणले असले, तरी माणसे मात्र दुरावली, असे सांगताना प्रा.डॉ. बाबर म्हणाले, मोबाईलने लोकांना मानसिकदृष्ट्या आजारी केले. मुलांच्या ऑनलाईन शिक्षणाचा हट्ट आणि गेम्समुळे पिढी भरकटली, तर ती पालकांची जबाबदारी आहे. एआयने तर आता कृत्रिम व्यक्ती आपल्या आयुष्यात शिरल्या आहेत. हसणं, रडणं, बोलणं सगळं कृत्रिम झालंय. पण खरी सोबत तंत्रज्ञान देऊ शकत नाही. खरी मैत्री तीच, जी संकटाच्या काळात धावून येते. सकाळी एकमेकांशी भांडलात, तरी संध्याकाळी एकत्र या. आपली माणसे दुखावली असतील, दुरावली असतील तर, मोठ्या मनाने त्यांची माफी मागा आणि त्यांनाही माफ करा, यामुळे मन व मेंदूवरील ताण कमी होईल. डोक्यात नेहमी सकारात्मक विचार ठेवा. सुख आलं की दुःखही येणार, जसं दिवसानंतर रात्र येते. पण प्रत्येक रात्रीनंतर नवी पहाट उगवते, म्हणून सूर्याप्रमाणे जगा. यश आलं तरी थांबू नका, अंतिम ध्येय साध्य होईपर्यंत वाटचाल सुरू ठेवा. घरच्या उंबऱ्यावर व्यवसायाच्या चिंता आणू नका, कुटुंबासाठी वेळ द्या. देवाने दिलेले शरीर खूप मौल्यवान असून, निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आहे, असे त्यांनी सांगितले.

देव सगळं माफ करतो, पण कर्माची फेड येथेच करावी लागते. त्यामुळे जादूटोणा, कर्मकांडात अडकू नका. देव कोणाचेही वाईट करत नाही. आपल्या कामात देव शोधा. संत सावता माळी यांनी कांदा, मुळा, भाजीमध्ये देव पाहिला, तुकोबांनी 'देवाच्या भेटीला गेलो देवाची झालो' या दोह्याच्या आधारे स्वतःमध्ये व आपल्या कामामध्ये देव पहा, असे सांगितले. आई-वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट सोसलेत, याची जाण ठेवा. आज मात्र आई-वडील वृद्धाश्रमात अन्‌‍ मुलं महागड्या शाळेत, ही शोकांतिका आपणच घडवतोय, याची जाणीव ठेवा, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रारंभी, प्रतिमापूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वागत अमोल जाधव यांनी, परिचय गंगाधर जाधव, सूत्रसंचालन सुहास इनामदार, तर अनिल थोरात यांनी मानपत्र वाचन करून आभार मानले. व्याख्यानास ग्रंथपाल महेंद्र लोखंडे, सेवानिवृत्त ग्रंथपाल संजय शिंदे, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

कराडकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

कराड नगरपरिषदेच्या नगरवाचनालयातर्फे यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे आयोजित केलेल्या व्याखानमालेत प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते व शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. डॉ. विनोद बाबर यांचे व्याखान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानास कराडकरांनी प्रचंड असा प्रतिसाद दिला. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनचा हॉल पूर्णपणे तुंडुब भरून नागरिकांनी जागा मिळेल तिथे उभे राहून व्याख्यान ऐकले.

शिवरायांचा आदर्श व कृष्णासारखा मित्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकटांतून उभ्या राहिलेल्या धैर्याचा आणि अफजलखान वधाचा दाखला देत प्रा. बाबर म्हणाले, नेपोलियन, अलेक्झांडर जगज्जेते होते. परंतु, नीतीमूल्ये आणि तत्वांमुळे शिवराय आजही प्रत्येकाच्या मनामनात जिवंत आहेत. त्यांच्याप्रमाणे संकटांना खिंडीत गाठून त्यांचा समूळ नायनाट करा. मनात जिंकायचं ठरवा, मग जगातील कुठलीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही. तसेच महाभारतातील कृष्णाप्रमाणे संकटकाळी मार्गदर्शक मित्र हवा. जो सुखदुःखात साथ देतो, तोच खरा मित्र ठरतो, असेही त्यांनी सांगितले.

जगासाठी प्रेरणादायी स्टेटस निर्माण करा

आपण कोणाच्या संगतीत राहतो, हे तपासा. त्यावरून आपलीही किंमत ठरते. चांगल्याची संगत धरा. आपल्या व इतरांच्या मोबाईलवरील स्टेटस आयुष्य ठरवत नाही. छत्रपती शिवरायांसारखे स्टेटस निर्माण करा, जे संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असेल. असेही त्यांनी सांगितले.


Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक