कृष्णाकाठचे भगीरथ : जयवंतराव भोसले (आप्पासाहेब)
कृष्णाकाठचे भगीरथ : जयवंतराव भोसले (आप्पासाहेब)
सहकार, आरोग्य, शिक्षण, राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रामध्ये कराड येथील कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यामुळेच त्यांना कृष्णाकाठचे भगीरथ म्हटले जाते.
आदरणीय आप्पासाहेबांचा जन्म २२ डिसेंबर १९२४ रोजी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावातील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता समाज हा सध्याच्या विकसनशीलतेच्या खूप मागे होता. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सुपीक जमीन, मुबलक पाणी या सर्व गोष्टी असूनही सामाजिक प्रगती झालेली नव्हती. याचे मुख्य कारण होते, योग्य मार्गदर्शन आणि नियोजनाचा अभाव! अशा प्रतिकूल परिस्थितीत आप्पांनी आपले शिक्षण पूर्ण केले. कायद्याचे शिक्षण घेतलेले असतानाही वकिली व्यवसाय न करता त्यांनी प्रगतशील शेतकरी होणे पसंत केले. म्हणतात ना डोक्यात नवनिर्मितीचे विचार असणारे व्यक्तिमत्त्व कधी शांत बसत नाही. त्यांनी १९५२ च्या दरम्यान सहकार चळवळीमध्ये सहभागी होऊन आपले आयुष्य हे सामाजिक कार्यासाठी झोकून देण्याचे जणू ठरवले.
आप्पांनी सन १९६० मध्ये आपले बंधू थोर विचारवंत यशवंतराव मोहिते (भाऊ) यांच्या साथीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली. आप्पासाहेब कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सलग ३० वर्षे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी विकासाच्या विविध योजना राबविल्या. कारखान्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृष्णा कारखान्याची आशिया खंडातील सर्वात मोठा आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व सक्षम अशी ओळख निर्माण केली. पश्चिम महाराष्ट्रात कृषी विकासाचा कृष्णा पॅटर्न राबविला.
कृष्णाकाठी पाणी आणि मुबलक जमीन ही नैसर्गिक देणगी लाभली आहे. आप्पांनी पाण्याचे योग्य नियोजन व्हावे, यासाठी सुमारे ७२,००० एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यामध्ये विविध १७ जलसिंचन योजनांची सुरवात कारखान्याच्या माध्यमातून केली.
आप्पांनी १९६२ साली शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिली ते पदवीपर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्यामध्ये छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालय, छत्रपती संभाजी विद्यालय प्राथमिक, सौ. ताराबाई माधवराव मोहिते विद्यालय, कृष्णा महाविद्यालय या शाळा व महाविद्यालयांचा नावलौकिक दूरवर पसरला आहे. आज हजारो विद्यार्थी या शाळा - महाविद्यालयांतून शिक्षण घेऊन उच्चविद्याविभूषित झाले. अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, उच्च दर्जाचे अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, शिक्षक झाले आहेत. आज शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वटवृक्षाखाली चार हजार विद्यार्थी घेण्याचे काम करत आहेत.
आप्पांनी १९७४ साली कराड येथे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. तसेच १९८२ मध्ये कृष्णा हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर १९८४ मध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षणाचे दालन निर्माण केले. कराडच्या आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी असलेले अद्ययावत कृष्णा हॉस्पिटल आज रुग्णांची उत्तम सेवा करत आहे. कोरानाच्या काळात कृष्णा हॉस्पिटलने हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत, हे समाज कधीही विसरू शकणार नाही.
आप्पासाहेबांनी आयुष्यात कोणाचा मत्सर केला नाही. कोणत्याही कामाचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही. प्रसिद्धीपेक्षा कामाकडे अधिक लक्ष दिले. काम करताना गुणवत्तेशी कधीच तडजोड केली नाही. त्यांचा प्रशासनावर वचक होता. जीवनाकडे ते सकारात्मक दृष्टीने बघत. तसेच प्रत्येकाचा उल्लेख माझा सहकारी असा करत. त्यांचे वाचन भरपूर होते. ते म्हणायचे, वाचनाने माणूस समृद्ध होतो. म्हणून अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा परिचय आजच्या पिढीसाठी आदर्श आहे. आप्पांचे संपूर्ण जीवन प्रत्येकासाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे. त्यांना 12 व्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन.


Comments
Post a Comment