जनकल्याण प्रतिष्ठानच्या क्षुधाशांती केंद्राने सलग २५ वर्ष लोकांचे अल्पदरात पोट भरले, ही अभिमानाची बाब आहे - सौ.मीना सुपनेकर
जनकल्याण प्रतिष्ठानच्या क्षुधाशांती केंद्राने सलग २५ वर्ष लोकांचे अल्पदरात पोट भरले, ही अभिमानाची बाब आहे - सौ.मीना सुपनेकर
कराड, दि. 20 - जनकल्याण प्रतिष्ठानच्या क्षुधाशांती केंद्राने सलग २५ वर्ष लोकांचे अल्पदरात पोट भरले, ही अभिमानाची बाब असल्याचे कौतुक सौ.मीना सुपनेकर यांनी केले.
जनकल्याण प्रतिष्ठान, कराडच्या ‘क्षुधाशांती केंद्र’ रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सौ सुपनकर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले होते.
१५ ऑगस्ट २००१ रोजी जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने कराड मधील नागरिकांना अल्प दरात भोजन व नाश्ता उपलब्ध व्हावा या हेतूने हे क्षुधाशांती केंद्र सुरु केले. २०२५-२६ क्षुधाशांती केंद्राचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले जात असून या निमित्त सातारा येथील प्रसिद्ध व्यावसायिक नितीनजी सुपनेकर व सौ.मीनाताई सुपनेकर यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले यांच्या हस्ते नितीनजी व मीनाताई यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व भेटवस्तू व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला.
सौ सुपनकर पुढे बोलताना म्हणाल्या, “ सलग २५ वर्ष अल्पदरात सात्विक भोजन देणे हे तत्व बाळगणे कठीण काम असून त्याची गुणवत्ता राखणे व टिकवणे त्याचबरोबर दीर्घकाळापासून सेवा देत असलेले कर्मचारी यांची काळजी घेत जनकल्याण प्रतिष्ठानच्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली क्षुधाशांती केंद्राने केलेली वाटचाल अभिमानास्पद असून हे इतरांना नक्कीच दिशादर्शक आहे.” अशा शब्दात सौ. निनाताई यांनी क्षुधाशांती केंद्राच्या कार्याचा गौरव केला. घरात लोकांसाठी भोजन करताना त्यातील भावना, कर्तव्य महत्वाचे असून भोजनाचा व्यवसाय करताना भावना, कर्तृत्व व गुणवत्ता व तत्व महत्त्वाचे असते आणि हेच क्षुधाशांती केंद्रात पहायला मिळाले असे जाणवल्याचे त्यांनी सांगितले.
क्षुधाशांती केंद्राच्या रौप्य महोत्सवी वाटचालीबाबत व कार्याबाबत नितीन सुपनेकर यांनी संस्था व कर्मचारी यांचे यावेळी बोलताना कौतुक केले.
जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष शिरीष गोडबोले आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने क्षुधाशांती केंद्र स्थापना उद्धेश व वाटचाल तसेच सेवा देणाऱ्या कर्मचारी यांचे कार्य महत्त्वाचे असून क्षुधाशांतीच्या या यशस्वी व रौप्य महोत्सवी वर्ष गाठत असताना कराडच्या नागरिकांनी - ग्राहकांनी केलेले सहकार्य, पाठींबा तसेच सुरुवातीच्या काळात प्रमुख म्हणून संतोष देशपांडे व सध्या हणमंत माने यांनी दिलेले योगदानही अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे आहे असे मत व्यक्त केले.
सचिव अनिल कुलकर्णी यांनी क्षुधाशांती केंद्राची २५ वर्षातील वाटचाल, वेळोवेळी करण्यात आलेले बदल व विविध शाखांची माहिती दिली.
क्षुधाशांतीचे नियमित ग्राहक असणारे व हितचिंतक श्री.सिद्धार्थ कुलकर्णी यांनी क्षुधाशांती मधील अल्पदरात मिळणारे भोजन व अल्पोपहार तसेच सेवा यांचे कौतुक करत सात्विक भोजनाचा आनंद दीर्घकाळ क्षुधाशांतीमुळे घेता आला असे मनोगतात मांडले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्री. नितीन व सौ.मीना सुपनेकर यांच्या हस्ते क्षुधाशांती मधील सर्व कर्मचारी यांचा भेटवस्तू देवून विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी जनकल्याण प्रतिष्ठानचे संचालक, गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे व श्री. विजय परीट (अधीक्षक शालेय पोषण आहार ), जनकल्याण पतसंस्था उपाध्यक्ष श्री.अभिजीत चाफेकर, रवळनाथ शेडे, विद्याधर भागवत, ए.आर.पवार, श्री. रामदुर्गकर, श्री. वेळापूरे, किरण थोरात व उदय थोरात, श्री.आटकर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त श्री.संतोष देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन विजय कुलकर्णी, प्रथमेश इमानदार, अश्विनी होनकळसे, महेंद्र जोशी, संजय आदवडे, राजू जाधव यांनी केले.




Comments
Post a Comment