लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकास सक्तमजुरीची शिक्षा
लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकास सक्तमजुरीची शिक्षा
कराड, दि. 6 - येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने कराड शहर पोलीस स्टेशनला काम केलेल्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भरत गोपाळ होळकर यांना सात हजार रुपये लाच स्वीकारल्याबद्दल विविध कलमान्वये 2 वर्ष सश्रम कारावास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या बाबत माहिती अशी की, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक भरत गोपाळ होळकर (वय 66) हे कराड शहर पोलीस स्टेशनला कार्यरत होते. त्यांनी 2014 मध्ये फिर्यादीच्या तक्रारीच्या अहवालासाठी 7 हजार रुपये लाच मागितली होती ती त्यानी पंचासमक्ष कचेरी नजीकच्या दर्शन हॉटेल समोर स्वीकारली होती. म्हणून भरत होळकर यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी 21 जुलै 2014 रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली पाटील यांनी करून, 30 डिसेंबर 2014 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी कराड येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश डी. बी. पतंगे यांच्यासमोर झाली. न्यायाधीश पतंगे यांनी खटल्यातील आरोपी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भरत होळकर यास दोषी धरून विविध कलमान्वये दोन वर्ष सश्रम कारावास व एकूण पंधरा हजार रुपये दंड ठोठावला.
या खटल्यात सहा. जिल्हा सरकारी वकील एम.व्ही. कुलकर्णी व आर.डी. परमाज यांनी सरकार पक्षातर्फे युक्तीवाद केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व उपअधीक्षक राजेश वाघमारे याच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.
या खटल्यात सरकार पक्षाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन अंकुश राऊत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश विरकर या पैरवी अधिकारी व पैरवी अंमलदार यांनी सहकार्य केले.

Comments
Post a Comment