सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चालत जावून घेतला पन्हाळा ते पावनखिंड राजमार्गावरील ऐतिहासिक प्रवासाचा थरारक अनुभव...

 


सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चालत जावून घेतला पन्हाळा ते पावनखिंड राजमार्गावरील ऐतिहासिक प्रवासाचा थरारक अनुभव...

कराड, दि. 2 - जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालय कराड तर्फे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटना व प्रत्यक्ष घडलेला इतिहास अनुभवण्यासाठी शाळेच्या वतीने पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक अभ्यास पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनातील प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी विद्यालयाच्यावतीने नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले जातात. 

प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले, सचिव अनिल कुलकर्णी व मुख्याध्यापिका सोनाली जोशी यांच्या प्रेरणेने व समन्वयक विजय कुलकर्णी व स्वाती जाधव यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली या ऐतिहासिक अभ्यास मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा आणि बाका प्रसंग म्हणजे पन्हाळा वेढ्यातून विशाळगडाकडे करून घेतलेली सुटका व घोडखिंड मध्ये बाजीप्रभू / फुलाजी प्रभू व सिद्धीच्या सैन्यासोबत झालेला लढाईचा थरारक इतिहास, बाजीप्रभू व त्यांच्या सैन्यानी स्वराज्याचा राजा वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न व दिलेले बलिदान. हा इतिहास ऐकला, वाचला आणि चित्रपटात पहिला तरी आजही अंगावर शहरे येतात मात्र ही घटना ज्या मार्गाने घडली त्या मार्गाने जावून प्रत्यक्ष इतिहास विद्यार्थ्यांनी जगावा व ऐतिहासिक घटना कशी घडली असावी याचा अनुभव घ्यावा यासाठी पन्हाळा ते पावनखिंड ही ऐतिहासिक अभ्यास दोन दिवसीय पदभ्रमंती मोहीम आयोजित केली होती. 

पन्हाळा किल्याचा ऐतिहासिक संदर्भासह अभ्यास करून वीररत्न शिवा काशीद समाधी दर्शन व बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास वंदन करून या मोहिमेस प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज ज्या मार्गाने पन्हाळा किल्यातून बाहेर पडले त्या राजदिंडी मार्गावरून पायी चालत सुरुवात करण्यात आली. 

सलग दोन दिवस चालत विद्यार्थ्यांनी पन्हाळा ते पावनखिंड असा सूर्य किरण जमिनीवर पडत नाहीत असे अत्यंत घनदाट जंगल, पाण्याने खळाळत वाहणारे ओढे, साप, जळू, खेकडे, विंचू, निसरडा रस्ता, गुडघ्याएवढे पाय आत जातील असा चिखलाचा रस्ता, काटेरी झाडे वेली, जंगलातील रस्त्यावरून वाहणारे पाणी, कुजलेला पालापाचोळा, दाट वेलींनी लगडलेली झाडे, डोंगरातील तीव्र चढ - उतार, सतत पडणारा पाऊस, दाट धुके, मसाई पठारावरील अंगाला बोचणारा थंड गार वारा आणि जंगली प्राणी वावर, तसेच शेताच्या बांधावरून प्रवास करत आश्चर्याने भारावून जात पन्हाळा ते पावनखिंड असा ऐतिहासिक राजमार्गावरून प्रवास दोन दिवसात पूर्ण केला. या संपूर्ण पदभ्रमंती मध्ये निसर्गाचा थरारक अनुभव घेत असताना, ‘आम्ही आज प्रत्यक्ष इतिहास जगत आहे’ अशी विद्यार्थ्यांनी भावना होती.     

या संपूर्ण ऐतिहासिक अभ्यास मोहिमेत इतिहास अभ्यासक स्वप्निल जिरगे यांनी केले.या संपूर्ण प्रवासात पन्हाळा ते पावनखिंड या राजमार्गावर इतिहासातील प्रसंगाची पुराव्यानिशी माहिती दिली. 

पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक घटना घडलेल्या मार्गावर विशेष असे दिशादर्शक व मार्गदर्शक दगड लावलेले आहेत. अवघड मार्गावर विद्यार्थी ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’, ‘धर्मवीर संभाजी महाराज कि जय’. ‘हर हर महादेव’ अशी घोषणा देत स्वतः मध्ये व इतरांमध्ये जोश निर्माण करत होते. 

याच बरोबर निसर्ग अभ्यास देखील करत होते. अनेक विद्यार्थ्यांच्या पायाला जळू लागले मात्र न घाबरता ते चिकटतात कसे ? ते रक्त कसे पितात? ते दिसतात कसे ?कसे काढायचे? जळू अंगाला चिकटली तर काय करायचे ? प्रथमोपचार कसे करतात? याचे ही प्रात्यक्षिक देवून पुढे जळू लागल्यावर विद्यार्थी न घाबरता ते हळदीचा वापर करून स्वत: काढत होते. 

सदर पायी प्रवास घनदाट जंगलातून असल्याने साप व जंगली प्राणी कोल्ह्याचे दर्शन सुद्धा झाले विद्यार्थ्यांनी प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा देखील अभ्यास केला. जंगलातील पाण्यामध्ये व ओढ्यामधून खेकडे दिसून येत होते. शिवम सकट या विद्यार्थ्याने खेकडा कसा पकडायचा याचेही प्रात्यक्षिक अन्य विद्यार्थ्यांना दाखवले. 

सलग ८ किमी सपाट पृष्ठभाग असणारे मसाई पठार, त्यावर निर्माण झालेले नैसर्गिक तलाव, मसाई देवीचे मंदिर, पठारावरून दिसणारा आजूबाजूचा हिरवागार निसर्गरम्य परिसर, वाड्या, वस्त्या, डोंगर - दर्या खोऱ्यात राहणारे लोकांचे राहणीमान, पर्जन्यमान अधिक असणाऱ्या घरांची रचना, भातशेती यांचेही विद्यार्थ्यांनी या मोहिमेत निरीक्षण केले. मसाई पठारावर वाहणारा वेगवान थंड गार वारा, दाट धुके आणि पाऊस झेलत विद्यार्त्यांनी ही पन्हाळा ते पावनखिंड अविस्मरणीय अशी ऐतिहासिक पदभ्रमंती मोहीम उत्साहाने पूर्ण केली. 

पदभ्रमंती अभ्यास मोहिमेच्या शेवटी पावनखिंड येथे पोहोचल्यावर तेथील वातावरण व पावनखिंड पाहून विद्यार्थी भारावून गेले. सर्व विद्यार्थ्यांनी पावनखिंडीचे दर्शन घेतले. या ठिकाणी सर्वांना घोडखिंड पावनखिंड कशी झाली ? तसेच या खिंडीची रचना व भौगोलिक स्थान लक्षात घेवून त्या दृष्टीने लढाईसाठी कसा वापर केला गेला ? त्या स्थानाचे ऐतिहासिक महत्व अशी प्रत्यक्ष त्या स्थानी जावून विद्यार्थ्यांनी माहिती घेतली. 

सरस्वती विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी इतिहास विषयाचा चोफेर व डोळसपणे अभ्यास व्हावा, इतिहासातील घडलेली घटना प्रत्यक्ष अनुभवण्यायासाठी हा आयोजित केलेला हा आगळावेगळा इतिहास विषयक उपक्रम ‘पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक अभ्यास पदभ्रमंती मोहीम’ या उपक्रमाबद्द्ल संस्थेचे संचालक श्रीकृष्ण ढगे, दीपक कुलकर्णी, नितीन गिजरे, सुनील मुंद्रावळे, गीतांजली तासे, श्रीपाद कुलकर्णी सर्व संचालक व पालकांनी कौतुक व आभार व्यक्त केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक