कराड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना अटक; कराड कोर्टात केले हजार...
कराड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना अटक; कराड कोर्टात केले हजार...
कराड, दि. 24 - कराड नगर परिषदेत झालेल्या लाच प्रकरणात तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना अखेर चार महिन्या नंतर अटक करण्यात आली आहे. खंदारे यांना अटक केल्यानंतर कराड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतरही बांधकाम परवानगीसाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी खंदारे यांच्यासह चौघांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती, त्यामध्ये तिघांना अटक करण्यात यश आले होते, मात्र खंदारे हे फरार होते.
आज गुरुवार, दि. 24 रोजी सकाळी साताऱ्यात स्थानिक गुन्हे विशेष शाखेने त्यांना अटक करून लाच लुचपत विभागाकडे सोपवले होते. त्यानंतर संबंधित विभागाने खंदारे यांना आज कराड येथील अतिरिक्त जिल्हा कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
25 मार्च 2025 रोजी कराड नगरपालिकेत लाचलुचपत विभागाने धाड टाकून कारवाई केली होती. यामध्ये दोघांना रंगे हात पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर फरार शंकर खंदारे फरार झाले होते. त्यांनी 1 एप्रिल 2025 रोजी कराड येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयांना त्यांचा अर्ज फेटाळला होता तेव्हापासून खंदारे गेली चार महिने फरार होते.
याबाबतची माहिती अशी की, कराड शहर पो स्टे अंतर्गत पोलीस उप अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी केलेल्या सापळा कारवाईत यातील तक्रारदार हर्षद दत्तात्रय बदामी बांधकाम व्यवसाईक यांचे मालकीचे कराड शहरातील सि. स. क. ७९, सोमवार पेठ, कराड येथील जागेत पार्किंग अधिक पाच मजली इमारतीचे पुनर्विकास बांधकामाचे प्रस्तावित काम मंजुर करून देणेसाठी आरोपी लोकसेवक शंकर खंदारे तत्कालीन मुख्याधिकारी, नगरपरिषद, कराड वर्ग १ यांना दि. दि. २०/०३/२०२५ रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद कराड या पदावरून कार्यमुक्त केले असताना देखील आरोपी क. २ लोकसेवक स्वानंद शिरगुप्पे सहा. नगररचनाकार, कराड नगरपरिषद यांच्याशी संर्पक करून श्री. शंकर खंदारे यांनी सुधारीत बांधकाम परवाना करीता आवश्यक असलेल्या चलनावर दि. २४/०३/२०२५ रोजी स्वाक्षरी करून आरोपी क. २ लोकसेवक स्वानंद शिरगुप्पे सहा. नगररचनाकार, कराड नगरपरिषद यांना व्हॉटस्अॅप ट्वारे पाटविले. त्यानंतर लोकसेवक तौफिक शेख याने चलन व नोटीसीवर दि. ०६/०३/२०२५ रोजीचे कार्यालयीन जावक केले असल्याचे दाखवुन पदाचा गैरवापर करून लाच मागणीस प्रोत्साहन दिले.
यातील आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडे १०,००,०००/- रूपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता ५,००,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारून त्यांनी वैध परिश्रमीकाशिवाय अन्य परितोषण, प्रलोभन, बक्षिस म्हणुन आर्थिक फायदा मिळविलेला आहे. म्हणुन तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी शंकर खंदारे मुख्याधिकारी, नगरपरिषद कराड, आरोपी स्वानंद शिरगुप्पे सहा. नगररचनाकार नगरपरिषद, कराड आरोपी तौफिक कयुम शेख कनिष्ठ लिपीक बांधकाम विभाग नगरपरिषद कराड, आरोपी खाजगी इसम अजिंक्य देव यांचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७, ७अ, १२ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपी लोकसेवक शंकर खंदारे तत्कालीन मुख्याधिकारी नगरपरिषद कराड हे मुख्य सुत्रधार होते.
सदर आरोपी हे दि. २४/०३/२०२५ रोजी मुख्याधिकारी, कराड नगरपरिषद कराड या पदावर कार्यरत नाही हे त्यांना माहित असुनही त्यांनी गुन्हयातील इतर आरोपींशी संगनमताने सदरचा गंभीर गुन्हा करून बेजबाबदारपणे गैरवर्तन केल्याचे गुन्हयाच्या तपासात निष्पन्न झाले होते.
सदर आरोपी लोकसेवक शंकर खंदारे तत्कालीन मुख्याधिकारी नगरपरिषद कराड हे गुन्हा घडले पासून फरारी होते. सदर आरोपी यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश. डी. बी पतंगे कराड यांचे न्यायलयात जामीन मिळणेबाबत अटकपूर्व जामीन अर्ज सादर केलेला होता सदर गुन्हयाचा तपास राजेश वसंत वाघमारे पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांचेकडे असुन ते स्वतः युक्तीवादासाठी न्यायालयात हजर होते. त्यांनी दिलेले म्हणणे व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आर डी परमाज यांनी त्यावर युक्तीवाद केला होता. सदर आरोपी हे दि. २४/०३/२०२५ रोजी पासून परागंदा झाले असुन अदयाप पर्यंत ते समक्ष चौकशी कामी हजर झालेले नव्हते.
सदर गुन्हयामध्ये लोकसेवक शंकर खंदारे तत्कालीन मुख्याधिकारी नगरपरिषद कराड यांचे मोबाईल चे व्हॉटस्अॅप वर ०९.५६ वाजता ४ मिनीटे व्हॉटस्अॅप व्हॉईस कॉल वरून संभाषण करून १०.२७ वाजता व्हॉटस्अॅपवर वीना सहीचे व विना जावक कमांकाचे चलन व धोकादायक नोटीस पाठविले असल्याचे निष्पन्न झालेले आहे. व त्याप्रमाणे खंदारे यांनी सदर चलनावर व धोकादायक नोटीशीवर त्यांची स्वतःची स्वाक्षरी करून ती पुन्हा परत दि. २४/०३/२०२५ रोजी १०.५३ वाजता पाठविल्याचे निष्पन्न झालेले होते.
सदर आरोपी यांचेकडील मोबाईल हॅन्डसेट तपासकामी जप्त करून मोबाईल मधील डाटा रिकव्हर करणे आवश्यक आहे. सदर गुन्हयाचे अनुषंगाने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. असा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आर डी परमाज यांनी केला होता. त्यावर मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश. डी. बी पतंगे यांनी आरोपी लोकसेवक शंकर खंदारे तत्कालीन मुख्याधिकारी नगरपरिषद कराड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला होता तेव्हापासून खंदारे फरार होते.
आज गुरुवारी सकाळी त्यांना साताऱ्यात अटक करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी कराड येथील फौजदारी न्यायालयात त्यांना न्यायाधीश डी. बी. पतंगे यांच्या समोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे अॅड. आर. सी. शाह यांनी बाजू मांडली. पोलिस उपाधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पाच दिवसांची पोलिस कोठडी मागितली असताना, न्यायालयाने त्यांना २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Comments
Post a Comment