महामार्गावरील सहा पदरीकरणासह उड्डाणपुलाच्या कामाबाबत शिवसेनेचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पत्र
सहा पदरीकरणासह उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेनेचे (उबाठा) केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना पत्र
महामार्गासह उड्डाणपुलचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी
कराड, दि. 26 - पुणे बेंगलोर महामार्गावर सुरू असलेल्या सहा पदरीकरणाचे काम अत्यंत संत गतीने सुरू असल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. अनेक अपघात ही होत आहेत. अजूनही सहा पदरीकरणासह कराडच्या उड्डाणपुलाचे काम बाकी आहे ते तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सातारा उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद- पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
नितीन गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सन 2022 पासून (पेठ नाका) सांगली जिल्हा ते (शेंद्रे) सातारा जिल्हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना ४ चे सहा पदरीकरणाचे विकास काम चालू करण्यात आले आहे. सदर काम अदानी समूहाच्या मार्गदर्शनाखाली डी पी जैन इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या माध्यमातून चालू आहे. सदर विकास काम २०२३/२४ या आर्थिक वर्षात वेगवान गतीने झाले परंतु एप्रिल 25 पासून सदर विकास काम रखडले आहे यात प्रामुख्याने कराड शहरातून जाणाऱ्या सहा पदरी उड्डाण पुलाचे काम अजूनही 40% बाकी असून सर्विस रोड व ड्रेनेज याचे काम झालेले नाही. यामुळे कराड शहरानजीक ट्राफिक व्यवस्थेचा बोजबारा उडाला असून स्थानिक नागरिकांना प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सदर ठिकाणी आदानी व डीपी जैन कंपनीने पर्याप्त सुरक्षिततेची उपाययोजना न केल्यामुळे अनेक निष्पाप स्थानिक नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे. अपघाताचे प्रमाण वाढत आहे. महामार्ग लगतच्या शेतकरी वर्ग, छोट्या मोठ्या व्यवसायिकांना, अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या याबाबत स्थानिक आ. अतुल भोसले यांनीही विधानसभेत लक्षवेधी मांडून राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे तरी या महत्वपूर्ण व गंभीर बाबी बाबत आपणही स्वतः लक्ष घालून सदर काम वेगाने पूर्ण करणे करता योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी सदर कंपनीस आदेश निर्देश द्यावेत .
जून २५ पासून डी पी जैन कंपनीने कामगार वर्गाचे पगार न केल्यामुळे कराड शहरानजीकचे सहा पदरी युनिक उड्डाणपुलाचे काम बंद आहे. डी पी जैन कंपनी सध्या आर्थिक अडचणीत असून सदर पॅकेज मधील काम अत्यंत मंद गतीने चालू आहे. याचा परिणाम सातारा ते कोल्हापूर या वाहतुकीवर पडला असून सरासरी दोन तास प्रवासास जादा वेळ लागत आहे.
सबब गेल्या जुन २०२५ सदर महत्वकांक्षी विकास प्रकल्प रखडला असून तो वाढीव वेळेत वेगाने पूर्ण होणे गरजेचे आहे तरी या कामी आपले स्तरावरून योग्य उपाय योजना करण्याचेआदेश निर्देश अदानी , डी पी जैन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व प्रोजेक्ट मॅनेजर महामार्ग राष्ट्रीय प्राधिकरण कोल्हापूर यांना देण्यात यावेत ही विनंती. या पत्रावर नितीन विष्णुपंत काशीद पाटील उपजिल्हाप्रमुख, शशिकांत हापसे, दिलीप यादव, तालुकाप्रमुख मधुकर शेलार, शशिराज करपे शहर प्रमुख यांंच्या सह्या आहेत.
--------------------------------
कराड नजीक ढेबेवाडी फाट्यावरील उड्डाणपुलावर हेच ते सेगमेंट लॉन्चर मशीन उतरवण्याचे आहे.ढेबेवाडी फाट्यावरील सेगमेंट लॉन्चर मशीन उतरवणे बाबत वस्तूस्थिती....
कराड नजीक महामार्गावर साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल उभारणीस दोन ऑक्टोंबर 2023 रोजी सुरुवात करण्यात आली. यासाठी हॉटेल ग्रीन पार्क नजीक असणाऱ्या पहिल्या पिलर वर लॉन्चर मशीनच्या माध्यमातून सेगमेंट बसवण्यास प्रारंभ करण्यात आला. याच लॉन्चरच्या मदतीने ढेबेवाडी फाट्यापर्यंत उभारण्यात आलेल्या 52 पिलर वर सेगमेंट बसवण्यात आले. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्यापर्यंत दुसऱ्या टप्प्यातील सेगमेंट बसवण्यासाठी 7 नोव्हेंबर 2023 रोजी ढेबेवाडी फाट्यावर दुसरे सेगमेंट लॉन्चर मशीन बसवण्यात आले ते मशीन सध्या कोल्हापूर नाक्यापर्यंत आले आहे. ढेबेवाडी फाट्यावरील काम पूर्ण झाल्यामुळे उड्डाण पुलावरील लॉन्चर मशीन सध्या खाली घेण्यात येणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. अद्यापही या उड्डाणपुलाचे पूर्ण काम झालेले नाही. सदरचा उड्डाणपूल यावर्षी सुद्धा वाहतुकीला खुला होणार नाही.
व्हायरल झालेला संबंधित चुकीचा मेसेज....
सर्वांना कळवण्यात येते की कराड च्या नवीन उड्डान पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून दिनांक 25/07/25 पासून पुलावरील अवजड क्रेन खाली उतरवण्याचे काम सुरु होणार आहे... ते किमान 20 ते 25 दिवस चालेल... सध्या येण्या जाण्या साठी दुहेरी वाहतूक सुरु होती ती उद्या पासून एकाच लेन मधून येणारे आणि जाणारे साठी सुरु करणार आहेत... त्या मुळे प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे... तेव्हा सर्वांनी कराड मधून जाण्या येण्या साठी पर्यायी मार्ग वापरावेत
नेमकी वस्तुस्थिती काय...
ढेबेवाडी फाट्यावर पहिला टप्प्यातील सेगमेंट बसवण्याची काम गत आठवड्यात पूर्ण झाले आहे. आता उड्डाण पुलावरील असलेले सेगमेंट लॉन्चर मशीन खाली उतरवण्यात येणार आहे. त्यासाठी अजूनही कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आलेले नाही. गेल्या काही दिवसापासून या मशीनसह सेगमेंटला लावण्यात आलेले काही पार्ट छोट्या क्रेनच्या मदतीने काढण्याचे काम सुरू आहे. मोठ्या जम्बो क्रेनच्या माध्यमातून लॉन्चर मशीनचे पार्ट खाली घेण्यात येणार आहेत. त्यासाठी वाहतुकीत कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. वाहतूक नेहमीप्रमाणे आहे त्या लेन वरून सेवा रस्त्यासह उड्डाणपूला खालून दोन्ही बाजूने सुरू राहील. ढेबेवाडी फाट्यावरील महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या समोर क्रेन लावण्यात येऊन लॉन्चर मशीनचे छोटे छोटे भाग खाली उतरवण्यात येणार आहेत. लॉन्चर मशीनची उभारणी खालील फोटोत पाहू शकता.
हा फोटो आहे सप्टेंबर 2023 रोजीचा. महामार्गावर नांदलापूर नजीक सेगमेंट बसवण्यासाठी लॉन्चर मशीनची उभारणी करताना. हेच लॉन्चर मशीन पुढे ढेबेवाडी फाट्यापर्यंत आले आहे.वरील फोटोमध्ये आपण पाहू शकता सप्टेंबर 2023 मध्ये हॉटेल ग्रीन पार्क- लोटस फर्निचर नजीक पिलर वरती सेगमेंट बसवण्यासाठी लॉन्चर मशीन पायाडे तयार करून त्यावरती बसवण्यात आले. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2023 पासून सेगमेंट बसवण्यास प्रारंभ करण्यात आला. हेच सेगमेंट लॉन्चर मशीन आता याच पद्धतीने ढेबेवाडी फाट्यावर उतरवण्यात येणार आहे. एका भव्य मोठ्या क्रेनच्या मदतीने या लॉन्चर मशीनचे पार्ट खाली घेण्यात येणार आहेत, हे काम करत असताना उड्डाणपूला खालील वाहतूक दोन्ही बाजूने सुरळीतपणे सुरू राहणार आहे. लवकरच याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती डी पी जैन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुरेंद्र आपटे व पुलाचे इन्चार्ज सौरभ घोष यांनी दिली.
दरम्यान वायरल झालेल्या तथाकथित चुकीच्या मेसेजमुळे पुणे बेंगलोर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. मात्र सदरील मेसेज अधिकृतपणे कंपनी, ठेकेदार अथवा जिल्हा प्रशासन यांच्याकडून पाठवण्यात आला नव्हता. तरीही या वायरल झालेल्या मेसेजची खात्री न करता काही जणांनी तो पुढे फॉरवर्ड केला तर काही माध्यमांनी चमको अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेऊन त्यावरून वृत्त प्रसिद्ध करून वाहनधारकांच्या मध्ये संभ्रम निर्माण केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उड्डाणपूलाची सद्यस्थिती काय आहे.
कराड नजीक साडेतीन किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. गेली दोन वर्ष हे काम सुरू आहे. या पुलासाठी एकूण 92 पिलर वरती 91 गळ्यामध्ये 1223 सेगमेंट बसणार आहेत, त्यापैकी 1212 सेगमेंट बसवण्यात आले आहेत. यामुळे पुलाचे 90 गाळे तयार झाले आहेत. आता केवळ एका गाळ्यात 11 सेगमेंट बसवण्याचे काम बाकी आहे. त्याचबरोबर सेगमेंट पिलरला फिट करण्याबरोबर उड्डाण पुलावरती दोन्ही बाजूला संरक्षक कटडे व मध्यभागी दुभाजक करण्याचे कामही सुरू झालेले आहे. नांदलापूर नजीक उड्डाणपूलाला जोडणाऱ्या भराव पुलाचे कामही 50% हून अधिक झाले आहे. तर कोल्हापूर नाक्यावरील भराव पुलाचे काम रखडले आहे.



Comments
Post a Comment