श्री मळाईदेवी पतसंस्थेचा 283 कोटींचा व्यवसाय; 10 टक्के लाभांश जाहीर ;


 श्री मळाईदेवी पतसंस्थेचा 283 कोटींचा व्यवसाय 

39 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 

कराड, दि. 13 - श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जखिणवाडी या संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. संस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेचे संस्थापक, शेतीमित्र अशोकराव थोरात यांचे मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अजित थोरात होते. या सभेस सभासदांनी मोठी गर्दी केली होती.

प्रारंभी, सर्जेराव शिंदे यांनी सभेचे नोटीस वाचन केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावर्षी संस्थेने आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२५ अखेर २८३ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय साध्य केल्याची माहिती चेअरमन अजित थोरात यांनी दिली. संस्थेला ४.१९ कोटी रुपयांचा तरतुदीपूर्वीचा नफा झाला असून, एनपीएसाठी १०० टक्के तरतूद करण्यात आली आहे. यंदाही संस्थेकडून १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे.

संस्थेच्या ठेवी १६१.९० कोटींवर पोहोचल्या असून, १२१.९२ कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. विविध बँकांमध्ये संस्थेने तरलतेच्या दृष्टीने ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. वसूल भाग भांडवल ११.९४ कोटी असून, राखीव व इतर निधी १२.१६ कोटींच्या वर आहे. संस्थेने सहकार कायद्यानुसार कामकाज करत २.६३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा संपादन केला आहे. 

१९८७ मध्ये सुरू झालेली ही संस्था आज २० शाखांद्वारे बँकिंग सेवा पुरवत असून, त्यापैकी १६ शाखा स्वमालकीच्या इमारतींमध्ये आहेत. ९ शाखांमध्ये लॉकर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ६४ प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत असून, संगणकीकरणाच्या माध्यमातून अद्ययावत सेवा दिल्या जात आहेत. संस्थेच्या ९०८१ सभासदांनी या प्रगतीचा फायदा घेतला आहे. 

संस्था केवळ आर्थिक नव्हे; तर सामाजिक जबाबदारीही लीलया पार पाडत आहे. शिक्षक सत्कार, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खेळाडूंना आर्थिक मदत, वैद्यकीय सहाय्य, शेतकरी मेळावे, वाचनालयांना ग्रंथदान, उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणासाठी सहकार्य, असे विविध उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात. 

आगामी काळात मल्हारपेठ (ता. पाटण) आणि कुसूर (ता. कराड) येथे नवीन शाखा सुरू करण्याचे नियोजन असून, अधिक शाखांमध्ये लॉकर सुविधा सुरू करण्याचा मानस संचालक मंडळाने व्यक्त केला आहे. सभासदांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक अशोकराव थोरात यांनी संस्थेच्या स्थापनेमागील सामाजिक उद्देश स्पष्ट केला. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या अभियानाचे महत्त्व अधोरेखित करत, जखिणवाडी परिसरात जलसंधारणासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच अधिकाधिक लोकांनी संस्थेचे सभासद होऊन सहकार चळवळीला चालना द्यावी, असेही आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

सभेत दादासाहेब कदम, शिवाजीराव धुमाळ, सौ. अरुणादेवी पाटील, भारत दंत्रे, सुभाष पाटील, गजेंद्र पाटील, सौ. शारदा वाघ, के. एल. सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ. शर्मिला श्रीखंडे यांनी, तर शामराव सखाराम पवार यांनी आभार मानले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक