सुभीत अकॅडमीतर्फे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचे काम;आ. डॉ. अतुलबाबा भोसले

सुभीत अकॅडमीची विद्यार्थिनी आंचल ओसवाल हिचा सत्कार करताना आ. डॉ. अतूल भोसले व इतर ...

सुभीत अकॅडमीतर्फे गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याचे काम;आ. डॉ. अतुलबाबा भोसले

सुभीतच्या नीट आणि जेईईमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

कराड, दि. 26 - कराडची माती मूळचीच गुणवत्तापूर्ण असून येथील विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. स्पर्धात्मक काळात बिहारमधून कराडमध्ये येत येथील विद्यार्थी यशस्वी करण्याचे काम सुभीत अकॅडमीतर्फे केले जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून या अकॅडमीच्या यशस्वी निकालाचा राहिलेला चढता आलेख कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले. 

येथील शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटीतील सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई परीक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल त्यांच्या आमदार अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल फासे, अकॅडमीचे संचालक सुभीत यादव, नायब तहसीलदार बी. डी. कुंभार, माजी नगरसेविका अंजली कुंभार, कै. काशिनाथ नारायण पालकर आदर्श विद्यालय, कराडच्या संचालिका वैशाली पालकर, समीर करमरळकर, वैभव पावसकर, प्रा. संजय कुमार, प्रा. वास्के मॅडम, रुक्मिणी पार्कचे (वाखाण) अध्यक्ष धनंजय कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आमदार भोसले म्हणाले, सध्याचे विद्यार्थी खूप ऍडव्हान्स आहेत. बारावीनंतर ते स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून यश मिळवतात. सुभीत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीही नीट आणि जेईई परीक्षेत मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. अकॅडमीचे संचालक सुभीत यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळेच त्यांना हे यश मिळवता आले. याप्रसंगी आमदार भोसले यांनी आपण मेडिकल कॉलेजला असताना केलेले अभ्यासाचे नियोजन, बाळगलेली जिज्ञासा वृत्ती सांगत आपण आमदार असलो तरी, पीएचडी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी अंगी जिज्ञासा वृत्ती बाळगून प्रत्येक संकल्पनेच्या मुळाशी जावे, असा कानमंत्र देत विद्यार्थ्यांनी आयुष्यभर विद्यार्थी राहून आपल्या ज्ञानात भर घातली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर आपणाकडून अकॅडमीस लागेल ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही आमदार भोसले यांनी यावेळी दिले. 

डॉ. राहुल फासे म्हणाले, कोविडमध्ये शाळा, कॉलेजेस बंद असताना सुभीत अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांवर मेहनत घेतली, हेच या अकॅडमीच्या यशाचे गमक असून विद्यार्थ्यांनीही शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या कष्टाचे चीज केल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच अकॅडमीचे सुभीत सर यांचा कराडात फिजिक्समध्ये कोणीही हात धरू शकत नसल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. 

प्रास्ताविकात सुभीत यादव म्हणाले, कराडमध्ये ॲकॅडमीची सुरुवात करताना मैदानावर बसवून विद्यार्थ्यांना शिकवले. पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांच्या यशामुळे अकॅडमी प्रकाश झोतात आली. 2017 ते आतापर्यंत कराडच्या शिक्षणाच्या बाबतीत आमूलाग्र बदल झाला आहे. तरीही स्पर्धेला तोंड देत पाच-सहा वर्षांत अकॅडमीच्या यशाचा आलेख चढता राहिला असून येत्या काळात सुभीत अकॅडमीचे विद्यार्थी देशपातळीवर मोठे यश मिळवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

यावेळी प्रा. संजीव कुमार व प्रा. वास्के मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून मनीषा यादव व पल्लवी हडबे यांनी आभार मानले. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

अकॅडमीचे गुणवंत विद्यार्थी 

सुभीत अकॅडमीची विद्यार्थिनी आंचल ओसवाल हिने नीट परीक्षेत 720 पैकी 557 गुण मिळवले. याबद्दल आमदार भोसले यांच्या हस्ते तिचा व अकॅडमीच्या अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सायली शेलार 508 गुण, अफान बागवानने 502 गुण, हर्षिता लखापती 444 गुण, कृष्णा राऊत 394 गुण, पायल शिंदे 340 गुण, तसेच जेईई ॲडव्हान्स परीक्षेत आर्यन पवार याने 111 गुण मिळवत संपूर्ण देशात 2097 वा क्रमांक मिळवला. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पालक व नागरिकांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्यासह अकॅडमीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक