'सुरों का उत्सव’ संगीत रजनीला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद
'सुरों का उत्सव’ संगीत रजनीला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद
कराड, दि. 31 : कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश भोसले यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त मलकापूर येथे आयोजित ‘सुरों का उत्सव’ संगीत रजनीला उपस्थित रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या संगीत रजनीत सहभागी झालेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या युवा गायक – गायिकांनी आपल्या जादुई सुरांनी उपस्थित रसिक श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध पार्श्वगायक अमेय दाते, ऋषिकेश रानडे, सागर केंदूरकर आणि सुप्रसिद्ध पार्श्वगायिका कोमल कृष्णा व संपदा गोस्वामी यांनी पारंपरिक भावगीतांपासून ते आधुनिक संगीतातील गाण्यांपर्यंत केलेल्या प्रत्येक सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले.
डॉ. सुरेश भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर येथे कोमल कृष्णा प्रस्तुत ‘सुरों का उत्सव’ या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या संगीत रजनीचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे माजी क्रीडा मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, सौ. उत्तरा भोसले, सौ. सुवर्णादेवी देशमुख, श्री. विनायक भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सागर केंदूरकर यांच्या ‘श्री गणेश नमन’ सादरीकरणाने मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर त्याने सादर केलेल्या ‘दिल से रे’ या जोशपूर्ण गाण्याने संपूर्ण वातावरण ऊर्जामय झाले. गायिका कोमल कृष्णा यांनी सादर केलेल्या ‘मेरे ढोलना’ गाण्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर त्यांनी लता मंगेशर यांच्या एकाहून एक सरस गीतांचे सादरीकरण करत रसिकांना जुन्या काळात नेले. ऋषिकेश रानडे याने ‘कधी तू रिमझिम झरणारी बरसात’ या गीताने रसिकांन चिंब भिजविले. तर ‘मेरा रंग दे बसंती चोला’ गीताने देशप्रेमाची ऊर्मी जागवली. संपदा गोस्वामीने ‘कभी श्याम ढले’, ‘आता गं बया’ यासारख्या भावस्पर्शी गीतांनी उपस्थितांना भावविभोर केले.
गायक – गायिकांनी सादर केलेल्या युगल गीतांनाही रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ऋषिकेश रानडे आणि संपदा गोस्वामीच्या ‘बहरला हा मधुमास नवा’ या युगल गीताने मैफलीला वेगळाच रंग चढविला. तर कोमल कृष्णा व सागर केंदूरकरचे ‘जाने जा’ हे रोमँटिक गीत रसिकांना विशेष भावले. तसेच संपदा गोस्वामी व सागर केंदूरकरने ‘शौकियों में घोला जाए’ हे गाणे अतिशय नाजूकपणे सादर करत रसिकांची वाहवा मिळविली. अमेय दातेने सादर केलेल्या ‘आई भवानी’, ‘देवा श्री गणेशा’, ‘अबीर गुलाल’ आणि ऋषिकेश रानडेने ‘आई भवानी’ गोंधळ, ‘ललाटी भंडार’ या भक्तिगीतांच्या प्रभावी सादरीकरणालाही रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शेवटी सर्व कलाकारांनी एकत्र येत ‘जय हो’, ‘सुनो गौर से दुनिया वालो’ आणि ‘माँ तुझे सलाम’ ही गाणी सादर करत रसिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करत, कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाचे संगीत संयोजन मंदार राजपूत यांनी केले होते. तर आर.जे. गौरव यांनी आपल्या बहारदर सूत्रसंचालनातून प्रेक्षकांशी संवाद साधत, तसेच सिनेमांमधील गमतीशीर किस्से, पडद्यामागच्या कहाण्या आणि मिश्कील गंमत सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
या सर्व कलाकारांना आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला कृष्णा परिवारातील सर्व संस्थांचे संचालक, पदाधिकारी, तसेच कराड, मलकापूर नगरपालिकेचे माजी पदाधिकारी व नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments
Post a Comment