कराडच्या यशवंत बँकेची सीबीआयतर्फे चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन

कराडच्या यशवंत बँकेची सीबीआयतर्फे चौकशी करण्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन 

यशवंत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकरांकडून कोट्यावधीचा घोटाळा

यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेविरोधात ठेवीदार, कर्जदारांचा न्यायालय, पोलीस व अन्य पातळ्यांवर लढा सुरू 

कराड, दि. 5 (प्रतिनिधी) - कराड येथील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळांनी बँकेत दीडशे कोटी रुपये हुन अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड होत असून यासंबंधी ठेवीदार, कर्जदार व तक्रारदारांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या घोटाळ्याची सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली केली असल्याची माहिती ठेवीदार कर्जदार यांच्या वतीने लढा देणाऱ्या एड. निलेश जाधव व पिडीतानी पत्रकार परिषदेत दिली आहे. केंद्रीय मंत्री शहा यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आश्वासन दिली आहे.

यशवंत बँकेच्या विरोधात ठेवीदार, कर्जदार न्यायालयासहित पोलीस व अन्य पातळ्यांवर लढा देत आहेत. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. जाधव व तक्रारदारांनी दिली. याप्रसंगी फसवणूक झालेले ठेवीदार, कर्जदार उपस्थित होते. 

सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेले कराडचे शेखर चरेगावकर यांनी या पदाचा उत्तम व चातुर्याने वापर करून जिल्ह्याला माहीत नसणाऱ्या एका पतसंस्थेचे पुनर्जीवन करण्यासाठी कराड शहरात शाखा ओपन करून यशवंत विचारांचे ज्ञान पाजळत सहकार भारतीच्या नावाखाली उपदेशाचे डोस देत यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून सुमारे दीडशे कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनीच 90% रक्कम हडप केल्याचे स्पष्ट होत असल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

सहकार परिषद परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर शेखर चरेगावकर यांनी सहकार भारतीच्या माध्यमातून सहकार परिषदेच्या अधिपत्याखाली असणाऱ्या संस्थांना मार्गदर्शन देण्याचे काम सुरू केले आणि याचाच फायदा घेऊन त्यांनी ठीक ठिकाणी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केल्या त्या ठिकाणीही फी च्या नावाखाली लाखो रुपये उकळले. (फी 1500 व त्यातील 1 हजार स्वतःच्या खिश्यात व 500 इतरांना) यामध्ये सरकारी अधिकारी, उपनिबंधक यांचाही सहभाग होता मात्र ते आता मूग गिळून गप्प आहेत.

यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदार, कर्जदार, कर्मचारी, संचालक यांच्या नावे बोगस कर्ज वितरण करून स्वतःचे खिसे भरून चरेगावकर यांनी स्वतःच्या कुटुंबीयांच्या नावावर सातारा जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातही मालमत्ता खरेदी केल्याचे उघड होत आहे. ठेवीदार कर्जदार संचालक यांच्या नावे परस्पर कर्ज उचलून ते कुटुंबीयांच्या व अन्य बोगस संस्थांच्या नावे वर्ग करून चरेगावकर कुटुंबीयांनी हा घोटाळा केला असून यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचेही समोर येत आहे.

शेखर चरेगावकराना सहकार परिषदेचा लाल दिवा मिळाल्यानंतर त्यांचा तोरा वाढला होता. यातच निवडणुकी दरम्यान शहरातील एका केंद्रावर त्यांचा व एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा वादही चर्चेचा विषय ठरला होता. त्यावेळीही त्यांची मस्ती व मग्रूरी सोशल मीडिया द्वारे व काहीजणांनी प्रत्यक्ष पाहिली होती.

यशवंत सहकारी बँकेच्या १४० कोटींपैकी १२७ कोटींचे कर्ज बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या कुटूबियांसह त्यांनी स्थापन केलेल्या बनावट संस्थांच्या नावावर आहेत. त्या संबधितांच्या नावावर व्यवहार झाल्याचे ऑडिट रिपोर्टही आहेत. त्यामुळे बँकेत आर्थिक घोटाळा झाला आहे, त्याची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय सहकारी मंत्री अमित शाह यांना भेटून केली आहे. यात राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांचे महत्वाचे सहकार्य मिळाले आहे. गृहमंत्री शाह यांनीही दोन महिन्यांत सीबीआयतर्फे त्या सगळ्याची चौकशी करू, असे आश्वासन दिले असल्याची माहिती ठेवीदार संघटनेचे अॅड. निलेश जाधव, एस. डी. कुलकर्णी यांनी दिली. 

बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना आमिष दाखवून संस्थेत सहभागी करून घेतले यामध्ये संस्थेत कुलकर्णी बाईंचा मोठा वाटा होता, त्याही आता या प्रकरणात अडकणार आहेत.

अॅड. जाधव म्हणाले, सुमारे दीड वर्षांपासून सातत्याने यशवंत बँकेचे सभासद, ठेवीदार व कर्जदार बँकेतील घोटाळ्याबाबत पाठपुरावा करीत आहोत. त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांची राज्यसभेच्या खासदार डॉ. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने दोन दिवसांपूर्वी भेट झाली. त्यांच्याशी झालेल्या बैठकीत खासदार डॉ. कुलकर्णी, मी स्वतः व बँकेचे सभासद संजीव कुलकर्णी उपस्थित होतो. यावेळी गृहमंत्री शाह यांच्याबरोबर बँकेत झालेल्या प्रकाराबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. बँकेच्या आर्थिक व्यवहारांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही यावेळी त्यांच्याकडे केली. त्यावरही गृहमंत्री शाह सकारात्मक आहेत. येत्या दोन महिन्यांत त्या सगळ्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. 

यशवंत को-ऑपरेटिव बँकेत तत्कालीन चेअरमन शेखर चरेगावकर यांनी ठेवीदर, कर्जदार, कर्मचारी व जवळचे ओळखीचे व अन्य त्यांच्या सोयीने व मिळेल त्या व्यक्तीच्या नावे कर्ज घेऊन ते स्वतःच्या बोगस कंपन्याकडे वळवून आपल्या खिशात भरले. हे करत असताना सहकारातील अक्कल असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केला असल्याचे समोर येत आहे. मात्र यामध्ये नाहक अडचणीत आलेले ठेवीदर, कर्जदार, संचालक, कर्मचारी, ओळखीचे यांनी फारसा बोभाटा केला नाही. मात्र ज्यांना याची चांगलीच झळ बसली आहे अशा काही जणांनी आत्महत्या केल्याचेही समोर आले आहे.

अॅड. जाधव पुढे म्हणाले, यशवंत बँकेच्या घोटाळ्याची पद्धत वेगळी आहे. त्यासाठी त्यांनी गरजू व ओळखीच्या लोकांना फसवले आहे. विठ्ठल कुलकर्णी व शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर व तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर अशा तिघा बंधूंनी बनावट कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्याव्दारे कोट्यावधी रुपयांची बेनामी कर्ज प्रकरणे वितरीत केली आहेत. त्या कर्जांना कोणतेही पुरेसे तारण घेतलेले नाही, तसेच कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे ती कर्जे घाईघाईने वितरीत केली आहेत. त्याच्या रक्कमा कर्जदारांच्या कर्ज खात्यांवरून त्यांच्या बनावट कंपनांच्या खात्यांवर वर्ग केल्या आहेत. त्या सगळ्याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये त्या बाबी अनियमितता दर्शवून येथील यंत्रणाही त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्या यंत्रणेवरही आमची तक्रार असून त्यांचीही चौकशी व्हावी, असा आमचा आग्रह आहे. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून त्यात अन्य बँकाही अडकल्या आहेत. यशवंत बँकेमध्ये सुमारे १२५ कोटींची कर्जे बेनामी आहेत. ती कर्जे ज्या कंपन्यांना वाटली आहेत, त्या कंपन्या अस्तित्वात नाहीत. ती कर्जे त्यांनी नातेवाईकांना वाटली. जे कर्जदार फसले आहेत, त्यांच्या नावाने ती कर्जे वितरीत केली आहेत. 

शेखर चरेगावकर यांनी तीन ते चार जिल्ह्यात यशवंत बँकेच्या माध्यमातून हडप केलेल्या पैशाच्या जोरावर मालमत्ता खरेदी करून त्या ठिकाणी इमारती, गृहनिर्माण संस्था उभ्या केल्या आहेत. मात्र या ठिकाणी सद्यस्थिती सर्व कामे अर्धवट स्थितीत आहेत. सध्या चरेगावकर विंग चचेगाव परिसरात त्यांच्या फेमस कृष्णा व्हॅली येथे ध्यानस्थ असल्याचे समजते.

यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चिखली अर्बन बँक, वाई येथील वाई अर्बन बँक, यवतमाळ येथील यवतमाळ अर्बन बँक, वारणा सहकारी बँक, डोंबिवली येथील कांचन गौरी पतसंस्था, कोपरगांव येथील समता पतसंस्था, पुणे सरस्वती महिला पतसंस्था यांच्यासह आणखीही काही संस्थांचा त्यात समावेश आहे. त्यांच्याकडून कर्ज घेतली आहेत, ती खोटी आहेत. त्यामुळे त्या संस्थांही अडचणीत आल्या आहेत. या संस्थेच्या कर्ज प्रकरणांचा वापर करून दापोली तालुक्यातील बुरुंडी येथे चरेगावकरांनी मोठी जमीन खरेदी केली. त्यासह इंदापूर, करमाळा, खेड शिवापूर, भिगवण, विंग आणि कराडच्या रुक्मिणीनगर येथेही स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे.

एकूणच या बँकेच्या सर्व प्रकरणात ऑडिटर म्हणून भूमिका बजावणाऱ्या पुण्याच्या देशपांडे अँड देशपांडे असोसिएटच्या वतीने या यशवंत बँकेचे ऑडिट करण्यात आले आहे. या ऑडिटर व संस्थेचे सल्लागार, लेखापरीक्षक, सनदी अधिकारी यांची ही चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

बोगस दस्ताऐवज तयार करून संस्थेच्या माध्यमातून यशवंत प्रतिष्ठान, स्वयंसिद्धा पतसंस्था, यशवंत महिला स्वयंरोजगार प्रतिष्ठान आदी संस्थांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे गैरव्यवहार झाले आहेत. यशवंत महिला स्वयंरोजगार प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो महिलांच्या नांवावर कोट्यावधींची कर्जाची उचलून त्यांनी त्या रक्कमेचा अपहार केला आहे. प्रत्यक्षात  या संस्था अस्तित्वातच नाहीत. 

संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे बंधू व भावी नगरसेवक मुकुंद चरेगावकर यांनी शासकीय विश्रामगृहाचा ठेका घेतला आहे, तो कोणत्या संस्थेच्या, कंपनीच्या नावाखाली घेतला आहे, याचीही चौकशी होणार असून सध्या या ठिकाणी काही महिला उद्योजकांचा घूटमळ ही सुरू आहे. त्या उद्योजिका कोण? हे सगळं लवकरच बाहेर पडणार आहे.

यशवंत सहकारी बँकेचा सध्यस्थितीत मागील वर्षाच्या अहवालानुसार एनपीए ५० टक्क्यांवर गेला आहे. बँकेचा तोटा ६० कोटींहून पुढे गेला आहे. ऑडिट रिपोर्टनुसार बँकेची आर्थिक स्थिती भयावह आहे. असे असतानाही बँकेचे संचालक व कर्मचारी जबरदस्तीने कर्ज वसुलीसाठी दबावतंत्राचा वापर करीत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून शासनाने सीबीआय व आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे योग्य चौकशी करायला हवी. त्यासाठी ठेवीदार, सभासद व फसलेले कर्जदार प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याचा फारसा प्रभाव पडताना दिसत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

(सदरची माहिती बाधित ठेवीदार, कर्जदार व त्यांच्या वतीने एड. जाधव यांनी हॉटेल अलंकार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेली आहे.)

राजू सनदी, कराड 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक