डॉ. सुरेशबाबांनी लोकांच्या जीवनात समृद्धी आणली;माजी खा. श्रीनिवास पाटील
डॉ. सुरेशबाबांनी लोकांच्या जीवनात समृद्धी आणली;माजी खा. श्रीनिवास पाटील
कराड , दि. 31 - कृष्णाकाठचे शांत, संयमी नेतृत्व आणि कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश भोसले यांचा ७० वा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मलकापूर येथे आयोजित भव्य सोहळ्यात सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या शुभ हस्ते डॉ. भोसले यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे माजी क्रीडा मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात श्री. पाटील यांच्या हस्ते डॉ. भोसले यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले, आपल्या पूर्वजांचा देदीप्यमान वारसा डॉ. सुरेश भोसले पुढे नेत आहेत. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पांनी कृष्णा कारखान्याचे रोप लावले. डॉ. सुरेशबाबांनी याचा विस्तार करत लोकांच्या जीवनात समृद्धी आणली. आज शेती, सहकार, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात डॉ. सुरेशबाबा करत असलेले काम अतुल्य आहे. वैद्यकीय क्षेत्राला त्यांच्यासारखा निष्णात सर्जन लाभला आहे. स्मित हास्याने प्रत्येकाला जवळचा वाटणारा हा आपला माणूस आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात पत्नी सौ. उत्तराताईंची भक्कम साथ असून, त्यांची दोन्ही मुले आमदार डॉ. अतुलबाबा आणि विनूबाबा हे दोघेही त्यांचा समाजकार्याचा वारसा पुढे नेत आहेत. डॉ. सुरेशबाबांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून लोकसेवेची आणखी अधिकाधिक कामे व्हावी, याच माझ्याकडून या वाढदिनी शुभेच्छा आहेत.
यावेळी डॉ. सुरेश भोसले यांनी उपस्थितांच्या सदिच्छा स्वीकारत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते, पृथ्वीराज भोसले, सौ. उत्तरा भोसले, सुवर्णादेवी देशमुख, डॉ. सविता मोहिते, श्री. विनायक भोसले, सुदन मोहिते, डॉ. अशोक गुजर, सी. बी. पाटील, सारंग पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष पैलवान भगवानराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे यांच्यासह कृष्णा परिवारातील सर्व संस्थांचे संचालक, पदाधिकारी, तसेच कराड, मलकापूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुरेशबाबा शतायुषी व्हा!
आपल्या भाषणात बोलताना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, की डॉ. सुरेश भोसले यांचा ७० वा वाढदिवस आहे. आणि तारीख ३० आहे. त्यामुळे ७० आणि ३० मिळून १०० होतात. त्यामुळे डॉ. सुरेशबाबा शतायुषी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद देत डॉ. सुरेशबाबांना वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले.

Comments
Post a Comment