वाठार येथे अल्पवयीन मुलीकडून चिमुरडीचा गळा आवळून खून
वाठार येथे अल्पवयीन मुलीकडून चिमुरडीचा गळा आवळून खून
कारण अस्पष्ट; पोलिसांकडून अनेकाकडे चौकशी सुरू
कराड दि. 11 (प्रतिनिधी) - वाठार ता. कराड येथून गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झालेल्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिली. संस्कृती रामचंद्र जाधव (वय 5) असे या मुलीचे नाव असून तिचा 14 वर्षाच्या मुलीने गळा दाबून खून केल्याची कबुली दिली असली तरी खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
संस्कृती ही गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झाली होती. गुरुवारी व शुक्रवारी पहाटेपर्यंत या घटनेचा तपास सुरू होता. रात्रभर ड्रोनच्या साह्याने त्याचबरोबर परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध मोहीम राबवल्या नंतर शुक्रवारी पहाटे शेतात मुलीचा मृतदेह आढळला. या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी अल्पवयीन 14 वर्षीय मुलीला ताब्यात घेतले असून सात ते आठ जणांकडे चौकशी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
वाठार येथील संस्कृती जाधव ही पाच वर्षे मुलगी गुरुवारी सायंकाळी घरासमोरील अंगणात खेळत होती. तेथून ती अचानक बेपत्ता झाली. रात्री मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी गावात शोध घेतला तेव्हा ती सापडली नाही. याबाबत कराड तालुका ग्रामीण पोलीस याची माहिती देण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी गावातील नागरिकांच्या मदतीने परिसरात शोध मोहीम राबवली. या कामात श्वानपथक व ड्रोन कॅमेराचाही वापर करण्यात आला. पोलीस अधीक्षक समीर शेख व अपार पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दलाच्या विविध शाखांकडून बेपत्ता मुलीच्या शोधासाठी रात्रभर सर्च ऑपरेशन करण्यात आले.
गावच्या शिवारात शोध मोहीम सुरू असताना पहाटे साडे आर वाजण्याच्या सुमारास घरापासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर उसाच्या शेतात त्या मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर कुटुंबियाकडे मृतदेह सोपवून अंत्यसंस्कार ही करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्हीही मुलींची घरे आमने-समने
या घटनेतील पाच वर्षीय मुलगी व 14 वर्षीय मुलगी यांचे कुटुंबीय वाठार येथे समोरासमोर राहत आहेत. या मुलींचे एकमेकांच्या घरात खेळण्याच्या निमित्ताने रोजच ये जा असायची. 14 वर्षीय मुलीचे कुटुंब गेल्या दहा वर्षापासून पर जिल्ह्यातून या ठिकाणी मोल मजुरी करण्याच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. या दोन्ही कुटुंबात कोणत्याही प्रकारचा कसलाही वाद विवाद नसल्याचे समोर आले आहे.
14 वर्षीय मुलीकडून खुनाची वेगवेगळी कारणे
खेळत असताना भांडण, रागाच्या भरात, किरकोळ शिवीगाळ, तिची आई मला चोर म्हणते अशी विविध कारणे सदरची मुलगी पोलिसांच्या चौकशीत सांगत असल्याने पोलिसांना नेमके कारण स्पष्ट होत नाही. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनीही सदर मुलीकडे वारंवार विचारणा केली आहे. त्याचप्रमाणे सदर मुलीला मदत करणारे कोणी अन्य आहे का याचा तपास पोलीस काही जणांकडे सध्या करत आहेत.
वाठार ग्रामस्थांचे पोलिसांना मोठं सहकार्य
घटना घडल्यापासून ते सदर चिमुरडीच्या अंत्यसंस्कारापर्यंत गावात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कराड तालुका ग्रामीण पोलिसांनी विशेष खबरदारी घेत बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर सदर मुलगी बेपत्ता झाल्यानंतर गावातील सुमारे 200 ते 300 नागरिकांनी पोलिसांच्या सोबत सदर मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले. या शोध मोहिमेत 14 वर्षीय मुलीचे कुटुंबे ही सहभागी झाले होते.

Comments
Post a Comment