येवती - म्हासोली प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईन आराखड्याला मंजुरी


येवती - म्हासोली प्रकल्पाच्या बंदिस्त पाईपलाईन आराखड्याला मंजुरी

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश; जलसंपदा विभागाकडून मंजुरीचा आदेश

कराड, दि. 27 -  आ. डॉ. अतुल भोसले यांनी वेळोवेळी केलेल्या प्रयत्नांमुळे, येवती - म्हासोली मध्यम प्रकल्प लाभक्षेत्राच्या सिंचनांतर्गत पाणी देण्यासाठी, करावयाच्या मुख्य बंदिस्त नलिका व वितरण व्यवस्था कामाच्या आराखड्याला जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या बंदिस्त पाईपलाईन योजनेचे काम सुरू होणार असून, या योजनेच्या लाभक्षेत्रातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षम पद्धतीने पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध होणार आहे. 

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत १९९४ मध्ये येवती– म्हासोली मध्यम प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या अंतर्गत दक्षिण मांड नदीच्या तिरावरील येवती येथील धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे वितरण केले जाते. हा डावा कालवा आणि त्याच्या लघुवितरिका बहुतांश डोंगराळ भागातून जातात. शिवाय या कालव्याच्या कामाला सुमारे ३० वर्षे उलटल्याने अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होते. ज्यामुळे शेवटच्या गावापर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने पोहोचत नाही. वास्तविक या धरणातून वर्षातून केवळ २- ३ वेळाच पाणी सोडले जाते. त्यातही अनेक ठिकाणी पाणी पाझरते व त्याचा अपव्यय होत असल्याने पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध न झाल्याने या भागातील शेतीसमोर गंभीर संकट उभे राहते. 

अशावेळी धरणातून होणाऱ्या पाण्याचा पुरवठा बंदिस्त पाइपलाइनद्वारे केल्यास शेवटच्या ठिकाणापर्यंत पाणी, थेट अपव्यव न होता पूर्ण क्षमतेने पोहोचू शकते. त्यामुळे या ठिकाणी बंदिस्त पाइपलाइन करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांमधून होत होती. ही मागणी डॉ. अतुल भोसले यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेट घेऊन केली होती. त्यावेळी त्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनास कार्यवाहीचे आदेश दिले होते.

त्यानुसार आ डॉ. भोसले यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे येवती - म्हासोली मध्यम प्रकल्प लाभक्षेत्राच्या सिंचनांतर्गत पाणी देण्यासाठी करावयाच्या मुख्य बंदिस्त नलिका व वितरण व्यवस्था कामाच्या आराखड्याला जलसंपदा विभागाने मंजुरी दिली आहे. लवकरच या कामाला प्रारंभ होणार असून, या बंदिस्त पाइपलाइनमुळे कमीतकमी पाण्याचा अपव्यय होईल, अशा पद्धतीने अधिकाधिक क्षेत्राला सिंचन सेवा प्रदान केली जाणार आहे. तसेच पाणी वितरण कार्यक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर, सिंचनाखालील क्षेत्रात वाढ, स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ आणि जलसंधारणास चालना मिळणार आहे. तसेच ओंड, तुळसण, सवादे, म्हासोली, शेळकेवाडी यासह आसपासच्या गावांमधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक