सह्याद्री कारखाना बाळासाहेब पाटलां कडेच; विरोधकांचा 21-0 ने धुव्वा.
सह्याद्री कारखाना बाळासाहेब पाटलां कडेच; विरोधकांचा 21-0 ने धुव्वा.
पी डी पाटील पॅनलच्या हजारो समर्थकांचा कराडात जल्लोष...भव्य मिरवणूक...बाळासाहेब पाटील यांनी मानले मतदारांचे आभार
कराड, दि. 6 (प्रतिनिधी) - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अखेर माजी मंत्री व विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पाटील पॅनलने बाजी मारत भाजपाचे कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, भाजपाचे स्थानिक पदाधिकारी रामकृष्ण वेताळ (ग्रामपंचायत सदस्य ही झाले नाहीत), भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम (मनोज घोरपडे आमदार झाल्याची सल), काँग्रेसचे सरचिटणीस एड. उदयसिंह पाटील उंडाळकर (हे प्रचारात नव्हते... मुद्दाम आले नाहीत?), काँग्रेसचे तालुका अध्यक्ष निवास थोरात (अति आत्मविश्वास...यांची उमेदवारी उडाली) अशा या अति महत्वकांक्षा बाळगणाऱ्या विरोधकांच्या पॅनेलचा 21- 0 शून्य असा धुव्वा उडाला.
या निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी डी पाटील पॅनलने विरोधकांचा सात ते आठ हजारांच्या मताधिक्याने पराभव करत सह्याद्रीवर वर्चस्व कायम ठेवले. या निवडणुकीत पहिल्या फेरीत 4 हजार हून अधिक मताधिक्य मिळवणाऱ्या पी डी पाटील पॅनलने दुसऱ्याही फेरीत ही डबल मताधिक्य कायम ठेवल्याने या निवडणुकीत पी डी पाटील पॅनलने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे काहींचे विमान भरकटले तर काहींचे काहींची छत्री उरपाटी झाली. या निवडणुकीत घोरपडे दोन नंबरला तर कदम तीन नंबरला फेकले गेले.
सह्याद्री कारखान्याची ही निवडणूक 25 वर्षानंतर झाली. त्यापूर्वी तीन निवडणुका झाल्या होत्या. स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर यांनी (1980 व 1987 साली) दोन वेळा विरोधात तर एक वेळा (1997 साली) पी डी पाटील यांना समर्थन देत निवडणूक लढली होती. त्यावेळी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वर्गीय पी डी पाटील यांच्या विरोधात (1997 साली) कारखान्याची निवडणूक लढवली होती, मात्र उंडाळकर व चव्हाण यांना सह्याद्री कारखान्यात शिरकावा करता आला नव्हता. 1997 नंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आजपर्यंत बिनविरोध होत होती का तर सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यात सर्वात मोठा असणारा व चांगला सुरू असलेला कारखाना होता. त्यामुळे स्वर्गीय पी डी पाटील यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने सर्वांना बरोबर घेऊन हा कारखाना चालवला होता. पुढे माजी मंत्री व विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याची धुरा आपल्या खांद्यावर घेत आजपर्यंत कारखाना उत्तमरीत्या चालवत सभासदांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. काही चुका झाल्या त्या आता ते दुरुस्त करतील याची त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना जाणीव झाली आहे.
2025 या वर्षात महाराष्ट्रात विधानसभाची निवडणूक लागली आणि या निवडणुकीत पहिल्यांदाच कराड दक्षिण व कराड उत्तर मध्ये अचंबित करणारे निकाल लावले लागले गेले. यामध्ये कराड उत्तर मध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांचा मोठा पराभव झाला. या पराभवातून सावरत असतानाच सहकार क्षेत्रातील संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली. आणि कराड उत्तर मधून विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होत तिसऱ्यांदा विजयी झालेल्या भाजपा आमदार मनोज घोरपडे यांनी निवडणुकीसाठी दंड थोपटले. तसेच त्यांचे साथीदार पराभूत झालेले धैर्यशील कदम ही जागे होऊन उठले. संपूर्ण तालुक्यात सह्याद्रीच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली. आता या निवडणुकीत किती पॅनेल होणार आणि या पॅनल मध्ये कोण कोण असणार याची उत्सुकता लागली होती.
एकंदरीत या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात विरोधकांनी प्रचंड मेहनत घेतली त्यासाठी त्यांनी कराड दक्षिणचे माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण तसेच विद्यमान आमदार अतुल भोसले, काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्याशी गाठीभेटी करून सह्याद्रीच्या निवडणुकीत पॅनेल उभे करण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली. मात्र अवघ्या एका उमेदवारीवरून पॅनलचे नियोजन फिस्कटले. त्यामुळे धैर्यशील कदम, निवास थोरात, रामकृष्ण वेताळ, विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी वेगवेगळी चूल मांडली. निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जावरूनही कोर्ट कचऱ्या सुनावण्या सुरू झाल्या. यामध्ये निवास थोरात यांच्यासह मानसिंगराव जगदाळे यांची विकेट पडली.
अखेर सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सुरू झाला. हा प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी सभासद नाही त्यामुळे या निवडणुकीत माझा हस्तक्षेप नसेल असे ते म्हणून गेले त्यांची री ओढत कराड दक्षिणचे विद्यमान आमदार अतुल भोसले ही म्हणाले मी सभासद नाही त्यामुळे मी सह्याद्रीच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोन्ही नेत्यांचे फोटो महिनाभर अनेक ठिकाणी फ्लेक्स वर झळकली होती व त्यानंतर या दोघांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यावरून ज्यांना काही समजायचे ते समजले. कराड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असो अगर पंचायत समितीची निवडणूक असो व जिल्हा मध्यवर्तीची ही झालेली निवडणूक असो कुणी कशी कुणाला मदत केली हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान आमदार अतुल भोसले व उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी काहीही म्हटले तरी त्याला लोकांनी काय समजून घ्यायचं ते घेतलेला आहे.
आमदार मनोज घोरपडे यांच्या वल्गना...
कराड उत्तर विधानसभा जिंकल्यानंतर आमदार मनोज घोरपडे हवेत वावरू लागले. त्यांनी सह्याद्रीच्या निवडणूक प्रचारात पाच ते सात हजाराने निवडणूक जिंकणार असून माजी आमदारांना माझी चेअरमन करणार असल्याचे डरकाळी फोडत निवडणूक जिंकल्यानंतर चेअरमन यांच्या दारात शड्डू ठोकणार असल्याची ग्वाही दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र त्यांची प्रतिक्रिया अजूनही कुठे उमटल्याचे दिसत नाही. मात्र प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्यांनी त्यांच्या नावाचा 'खतरनाक' जप कराडात केला.
सर्व सभासद शेतकरी यांचे आभार - बाळासाहेब पाटील
सह्याद्री सहकारी कारखान्याचे निवडणुकीत स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने पी डी पाटील पॅनलने यशाकडे वाटचाल सुरु केली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने स्वर्गीय पी डी पाटील यांनी या कारखान्यात फार मोठे योगदान दिले असून त्या योगदानातून हा कारखाना उभा राहिला आहे. सर्वसामान्य सभासद शेतकरी हितचिंतक यांचे मोलाचे सहकार्य व समर्थन चांगले मिळाल्याने आमची या निवडणुकीत यशाकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगून माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सर्व सभासद शेतकरी यांचे आभार मानले आहेत.
--------
राजू सनदी, कराड

Comments
Post a Comment