कोल्हापूर नाक्यावर सेगमेंट बसवण्यापूर्वीच कोसळला; दोन कर्मचारी किरकोळ जखमी.



कोल्हापूर नाक्यावर सेगमेंट बसवण्यापूर्वीच कोसळला; दोन कर्मचारी किरकोळ जखमी.

17 महिन्यात 1 हजार 87 सेगमेंट बसवण्यात आले

कराड दि. 15 (प्रतिनिधी) - कोल्हापूर नाक्यावर हॉटेल संगम समोर तीव्र वळणावर असलेल्या शेवटच्या सहा पिलर वर सध्या सेगमेंट बसवण्याचे काम चालू असताना आज सेगमेंट उचलण्यापूर्वीच तो कोसळल्याने दुर्घटना घडली. यात नरेंद्र सिंग (वय 28) व दिनेश सिंग (वय 29) हे दोघे जखमी झाले आहेत. अशी माहिती या पुलाचे इन्चार्ज सौरभ घोष यांनी दिली.

आज शनिवारी सायंकाळी कोल्हापूर नाक्यावर पिलर क्रमांक 85 ते 86 दरम्यान सेगमेंट बसवण्याचे काम सुरू होते. त्यासाठी भव्य ट्रेलर वरून पहिला सेगमेंट साडेपाच वाजता कोल्हापूर नाक्यावर दाखल झाला. त्यानंतर सहा कर्मचारी संबंधित सेगमेंट गर्डर लॉन्चिंग मशीनच्या माध्यमातून पिलर वर सेगमेंट बसवण्यासाठीचे कामकाज सुरू केले. यासाठी अन्य दोन क्रेनची मदत ही घेण्यात आली होती. 

साडेसहा वाजता सेगमेंटचे लॉन्चिंगचे काम बऱ्यापैकी झाले होते. याचवेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या गाड्यांचा ताफा कोल्हापूर नाक्यावरून ढेबेवाडी फाट्याकडे रवाना झाला. त्यानंतर गर्डर लॉन्चर मशीनला सेगमेंट फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात आले होते, हे करत असताना 125 टनाचा सेगमेंट उचलण्यासाठी लॉन्चरला फिटिंग सुरू होते, त्यासाठी सेगमेंटवर दोन कर्मचारी तर खाली दोन कर्मचारी व सेगमेंट बसवलेल्या भागावर दोन कर्मचारी तैनात होते. 

लॉन्चरला सेगमेंट फिट झाल्यानंतर सेगमेंट आणणारा भव्य ट्रेलर काढण्यात आला. त्यावेळेला संबंधित सेगमेंट जमिनीवर ठेवण्यात आला. जमिनीवर सेगमेंटखाली समान अंतरावर सपोर्ट देण्यात आले. हे काम सुरू असताना लॉन्चर मशीन चालूच होते. याच दरम्यान लॉन्चरला अडकवलेला सेगमेंटचा जमिनीखालील सपोर्ट जमिनीत रुतल्याने बॅलन्स गेला. (सेगमेंट एका बाजूला कलला). त्यामुळे संबंधित सेगमेंट उचलण्यापूर्वीच एका बाजूला नकळत कोसळला. त्याच वेळेला या सेगमेंटवर उभे असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खाली उडी घेतली यात ते कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर तातडीने या दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. तोपर्यंत संगम हॉटेलच्या समोर सुरू असलेल्या या प्रकारामुळे महामार्गाच्या सर्विस रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बघायची गर्दी झाली व गोंधळ उडाला.

स्वयंघोषित समाजसेवकाची स्टंटबाजी...

घटना घडल्यानंतर कोल्हापूर नाक्यावर काही स्वयंघोषित समाजसेवकाने स्टंट करण्याचा प्रयत्न केला. त्याना माहिती नाही की सदर सेगमेंट 33 टनाचा आहे की 125 टनाचा आहे. कोणतीही माहिती न घेता त्या ठिकाणी स्टंट करून गोंधळ करण्याचा प्रयत्न केला गेला. हा सर्व प्रकार सर्विस रस्त्यावर उभे राहून नागरिक पाहत होते. सदरचा सेगमेंट सुरक्षित बॅरिगेटच्या आतच नकळत कोसळला होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीला कोणताही अडथळा झाला नाही. सेगमेंट जमिनीवर ठेवल्यानंतर अनबॅलेंसिंग झाल्यानंतर तो उचलण्यापूर्वीच कोसळला.

______________________________

कराडचा उड्डाणपूल तीन किलोमीटरचा झाला

पुणे बेंगलोर महामार्गावर कराड जवळ सध्या साडेतीन किलोमीटरचा युनिक सहा पदरी उड्डाणपूल उभारला जात आहे. आत्तापर्यंत एकूण 92 पिलर पैकी 82 पिलरवर 1 हजार 87 सेगमेंट बसवण्यात आल्याने 3 हजार 105 मीटरचा उड्डाणपूल तयार झाला असून 80 गाळे पूर्ण झाले आहेत. आता 10 पिलर वरील काम बाकी आहे. 

दोन पिलर च्या मध्ये काही ठिकाणी 14 तर काही ठिकाणी 11 सेगमेंट बसवले जात आहेत. एका सेगमेंटचे साधारण 125 ते 130 टन वजन आहे. हा सेगमेंट 29.5 मीटर लांब आहे तर साडेतीन मीटर उंच आहे. 

सद्यस्थितीला हॉटेल ग्रीन पार्क ते कोल्हापूर नाका दरम्यान 40 मीटरचे 79 गाळे पूर्ण झाले असून 31 मीटरचे 5 तर 30 मीटरचे 5 असे 80 गाळे तयार झाले आहेत.

या पुलाचे दोन आक्टोंबर 2023 पासून दोन भागात काम सुरू आहे. पहिल्या भागात हॉटेल ग्रीन पार्क ते मलकापूर दरम्यान 48 पिलरवर 655 सेगमेंट बसवण्यात आल्याने 47 गाळे (40 मीटरचे 46 तर 31 मीटरचा 1 गाळा) पूर्ण होऊन 1 हजार 871 मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे. याच्यापुढे 4 पिलर वरील काम बाकी आहे. 

उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम पिलर क्रमांक 52 म्हणजेच ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाका दरम्यान सुरू आहे. यामध्ये 34 पिलरवर 435 सेगमेंट बसवण्यात आले असून त्यामुळे 33 गाळे पूर्ण झाले आहेत (40 मीटरचे 24 तर 31 मीटरचे 4 व 30 मीटरचे 5) त्यामुळे या ठिकाणी 1 हजार 234 मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे. त्यापुढे पंकज हॉटेलपर्यंत केवळ 6 पिलर वरील काम बाकी आहे.

दरम्यान एप्रिल 2025 पर्यंत उर्वरित पिलर वरील सेगमेंट बसवण्याचे काम पूर्ण होईल असे डी पी जैन कंपनीचे अध्यक्ष प्रदीप कुमार जैन व पुलाचे इन्चार्ज सौरभ घोष यांनी सांगितले.

दरम्यान हॉटेल ग्रीन पार्क पासून नांदलापूर पर्यंत उड्डाणपुलासाठी भरावा टाकला जात आहे. हे काम सध्या गतीने सुरू आहे. साधारण 800 ते 900 मीटर लांब हा भराव असणार असून यामध्ये जखिनवाडी फाटा येथे भुयारी मार्ग आहे.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक