कराडात सोमवारी ईदगाह मैदानावर होणार सामुदायिक नमाज पठण
कराड संग्रहित छायाचित्र
कराडात सोमवारी ईदगाह मैदानावर होणार सामुदायिक नमाज पठण
कराड, दि. 30 (प्रतिनिधी) देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी चंद्र दर्शन झाल्याने उद्या सोमवारी 31 मार्च रोजी देशभरात रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी केली जाणार आहे. कराड शहर व परिसरात रमजान ईद विविध उपक्रमाने साजरी होणार असून शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता सामूहिक नमाज पठण (प्रार्थना) होणार आहे. अशी माहिती शाही ईदगाह कब्रस्तान ट्रस्टचे ट्रस्टी व सामाजिक कार्यकर्ते साबीरमिया मुल्ला यांनी दिली.
रमजान ईद निमित्त आज रविवारी शहरातील बाजारपेठेत ईदच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी देशातील विविध महत्त्वाच्या शहरांमध्ये चंद्र दर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या मध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्वत्र ईद साजरी केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार कराड शहरातील ऐतिहासिक मनोरे मज्जिद येथून सकाळी आठ वाजता जुलूस (मिरवणूक) निघणार आहे. त्यानंतर ऐतिहासिक ईदगाह मैदानावर नऊ वाजता सामूहिक नमाज पठण (प्रार्थना) होणार आहे.
कराड शहरातील इतरही मस्जिद मध्ये नमाज पठण होणार असून सकाळी साडेनऊ वाजता मक्का मज्जिद येथे एक वेळची नमाज पठण होईल. तत्पूर्वी दर्गा मज्जिद येथे साडेआठ वाजता व नऊ वाजता अशा दोन वेळची नमाज होणार आहे.
दरम्यान उद्याच्या ईदगाह मैदानावरील सामूहिक नमाज पठणची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती शाही ईदगाह कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.

Comments
Post a Comment