विरोधकांनी केवळ स्वार्थासाठी सह्याद्रीची निवडणूक लावली - डॉ. विश्वजीत कदम
विरोधकांनी केवळ स्वार्थासाठी सह्याद्रीची निवडणूक लावली - डॉ. विश्वजीत कदम
हिंगणगाव बुद्रुक मध्ये प्रचार सभेस उस्फुर्त प्रतिसाद
कडेगाव, दि. 30 (वार्ताहर) - विरोधकांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही केवळ राजकीय स्वार्थसाठी लावल्याची टिका माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केली. ते हिंगणगाव बुद्रुक (ता. कडेगाव ) येथे आयोजित सह्याद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी पॅनेल प्रमुख माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अरुण लाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, स्व. पी. डी. पाटील यांच्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालविला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कारखान्याने सभासदांना चांगला दर दिला आहे. वेळोवेळी कारखान्याच्या माध्यमातून सभासदांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. अशा चांगल्या चालणाऱ्या कारखान्याची निवडणूक लागणे ही खरी चूक आहे. या निवडणुकीत कडेगाव तालुक्यातून मोठे मताधिक्यक देण्याची ग्वाही देत सह्याद्रीच्या NOC मुळे डॉ.पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली, त्या माध्यमातून या तालुक्याचा आर्थिक कायापालट झाल्याचे ते म्हणाले.
आदर्श कार्यपद्धतीबद्दल सह्याद्रीचा राज्यात लौकिक आहे. या निवडणुकीत समोर विरोधात दोन पॅनल आहे मात्र त्यांचं खुर्द आणि बुद्रुक झालय त्यामुळे सभासदांनी त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, पी.डी.पाटील पॅनलच्या पाठीशी संपूर्ण कडेगांव तालुका खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही शेवटी आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, गेल्या गेल्या अनेक वर्षापासून कारखान्याच्या माध्यमातून सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु अपघाताने आमदार झालेल्यांनी या कारखान्याची निवडणूक लावली. परंतु अशा व्यक्तींना सभासद त्यांच्या भाषेत उत्तर देतील. सध्या ते माझ्यावर टीका करताना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन एकेरी भाषेत बोलत आहेत.विरोधकांत ताळमेळ नाही. केवळ विरोध करायचा म्हणून त्यांनी पॅनेल उभा केले आहे.त्यांना स्वाभिमानी व निष्ठावंत सभासद धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आमदार अरुण लाड म्हणाले की, सहकार क्षेत्र टिकणे काळाची गरज आहे. चांगल्या चालणाऱ्या संस्थेत राजकारण करणे सभासदांसाठी न परवडणारे आहे.तेव्हा सर्व सभासदांनी पी. डी. पाटील पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठया मताधिक्यानी निवडणूक देण्याचे आवाहन केले. स्वागत सरपंच महेश कदम यांनी केले. यावेळी कडेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रकाश जाधव, प्रा.आशिष घार्गे, नेताजी यादव,सुरेश शिंगटे, विठ्ठल मुळीक सुरेश यादव, संभाजी बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशांत यादव, जितेंद्र पवार,विलास यादव, महेंद्र करांडे, लक्ष्मण पोळ यांच्यासह शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्राध्यापक आशिष घार्गे यांनी मानले.





Comments
Post a Comment