अहिल्यादेवी होळकर शिवरायांचा वैचारिक वारसा जपणाऱ्या शासक - प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे

कराड : स्व. वेणूताई चव्हाण सभागृहात अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील व्याख्यानात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे, समवेत सौ. डॉ. सुचेता हुद्देदार.

अहिल्यादेवी होळकर शिवरायांचा वैचारिक वारसा जपणाऱ्या शासक - प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे

"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - एक प्रेरक व्यक्तिमत्व" विषयावर व्याख्यान

कराड, दि. 12 (प्रतिनिधी) : - छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगासाठी एक आदर्शवत राजे होते. त्यांची युद्धनीती, राजनीति, नीतिमूल्ये, वैचारिक प्रगल्भता आजही जगासाठी प्रेरक आहे. अनेक राजे, महाराजे, युगपुरुषांनी त्यांच्या विचारांनुसार वाटचाल केली. त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा अग्रक्रमाने समावेश असून त्या खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा वैचारिक वारसा जपणाऱ्या शासक होत्या, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाच्या प्रमुख प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे यांनी केले.

येथील स्व. वेणूताई चव्हाण सभागृहात मंगळवार (दि. ११) मार्च रोजी जागतिक महिलादिन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त महिला समन्वय समिती आणि लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - एक प्रेरक व्यक्तिमत्व" या विषयावरील व्याख्यानात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी नगरसेविका विद्याताई पावसकर, अपर्णा पाटील, राजश्री शेंडे, लोककल्याण मंडळ ट्रस्टचे विजय जोशी, सौ. डॉ. सुचेता हुद्देदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह वैभव डुबल, राष्ट्र सेविका समितीच्या सौ. सुषमा काळे, महिला समन्वय (सातारा) सौ. डॉ वृंदा शिवदे, महिला समन्वय (पुणे) सौ. अॅड. अपर्णा महाशब्दे-पाटील आदींची प्रमुख उपस्थित होती.

भारतातील कर्तृत्ववान स्त्रियांचा अगदी ऋग्वेदापासून ते दोन-तीनशे वर्षांपूर्वीपर्यंतचा दाखला देताना प्रा. डॉ. घोणसे म्हणाल्या, अखंड हिंदुस्तानात आतापर्यंत अनेक कर्तृत्ववान, प्रतिभावान, चारित्र्यसंपन्न, बुद्धिमान आणि पराक्रमी स्त्रिया होऊन गेल्या. त्यापैकीच असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. परंतु, आतापर्यंत अहिल्यादेवींचे कार्यकर्तृत्व नेमकेपणाने जगासमोर आले नव्हते. मात्र, महाराष्ट्राच्या माहेरवाशीण असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे कार्यकर्तुत्व जगभरात पोहोचवण्याचे काम महाराष्ट्रातील लोकच करत आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. अहिल्यादेवी या निगर्वी, प्रजाहितदक्ष, धर्माचा खरा अर्थ लावणाऱ्या, प्रजेवर योग्य तितकाच अंमल दाखवणाऱ्या, कर्तुत्ववान, कनवाळू, मायाळू, मात्र तितक्याच कठोर शासकही होत्या. 'रयतेच्या गवताच्या काडीला आणि भाजीच्या देठालाही हात लावू नये' हे शिवरायांचे वचन त्यांनी राबवले. कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. प्रसंगी, कुटुंबीय व आप्तेष्टांबाबतही अहिल्यादेवी होळकर यांनी कठोर भूमिका घेतली. पानिपतच्या युद्धावेळी वेळेत कुमक का पावली नाही, असा जाब सासरे मल्हारराव होळकर यांना विचारणाऱ्या अहिल्यादेवी यांची प्रजाहितदक्षता यातून दिसून येते. शिवरायांच्या पाऊलखुणांवर त्या वाटचाल करत होत्या. त्यांनी खऱ्या अर्थाने शिवरायांचे राजशासन अंमलात आणले. शिवराय आणि मराठा साम्राज्याप्रति अहिल्यादेवींची कमालीची निष्ठा होती.

त्या म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर ह्या जितक्या शूर, कनवाळू, कठोर शासक, तितक्याच त्या श्रद्धाळूही होत्या. शिव महादेव हे त्यांचे आराध्य दैवत होते. पती व सासऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्यासमोर अनेक संकटी उभा ठाकली. त्यांचे आयुष्य एकप्रकारे दुःखाने भारलेलेच होते. अशावेळी शिवपूजेन त्यांना मनस्वी आधार, प्रेरणा आणि शक्ती दिली. सासू गौतमाबाई यांनी त्यांना खंबीर साथ दिली. 'जे घडवले ते जिवापाड, प्रसंगी जीवाचे मोल देऊन ते वाचवले पाहिजे', हे त्यांचे तत्व होते, ते त्यांनी शेवटपर्यंत पाळले.

अहिल्यादेवी होळकर या गंगेप्रमाणे निर्मळ होत्या, असे सांगताना प्रा. डॉ. श्यामाताई घोणसे म्हणाल्या, अहिल्यादेवी यांनी मोठ्या प्रमाणावर जल व्यवस्थापन केले. बारवा, विहिरी, नद्यांवर अनेक घाट बांधले, पाण्याचे प्रदूषण रोखले, देवळांचा जीर्णोद्धार केला, काशी विश्वेश्वर मंदिराची पुनर्बांधणी केली, धर्म रक्षण केले, राष्ट्रीय एकात्मता जपली, इंदोर ते कलकत्ता रस्ता बांधला, धर्मशाळांची निर्मिती केली. त्याचबरोबर अहिल्यादेवींनी अनेक पर्यावरण पूरक प्रयोगही केले. तसेच त्यांनी सती प्रथेला विरोध केला. राजदरबारात "शास्त्रोक्त" भरवून सती प्रथेवर चर्चा घडवून आणली. ही प्रथा अंधश्रद्धा असल्याचे सांगितले. हुंडाबळीचा कायदा केला. विधवा विवाह घडवून आणला. यांसह अन्य कार्यातून त्यांचे मोठेपण अधोरेखित होते.

तसेच जागतिक महिला दिनावर बोलताना त्या म्हणाल्या, महिला दिनाचे कौतुक केलेच पाहिजे. परंतु, आजही सर्व महिलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मिळतेच असे नाही. अगदी वेदकाळापासून आजपर्यंतचे स्त्रियांचे कर्तुत्व स्त्री आणि पुरुषांनीही समजून घ्यायला हवे. तसेच आपल्या भावी पिढ्यांना कर्तुत्ववान स्त्री-पुरुषांच्या कथा, गोष्टी सांगा. विधवा स्त्रियांना सन्मान आणि स्वाभिमान शिकवण्यासाठी त्यांना अहिल्यादेवी होळकर समजावून सांगा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

प्रास्ताविकात सौ.डॉ. सुचेता हुद्देदार यांनी वेद, पुराणांपासून ते अगदी दोनशे वर्षांपूर्वीपर्यंत स्त्रिया किती कर्तुत्ववान होत्या, यावर प्रकाशझोप टाकला. पूर्वीच्या महिला सबला होत्या, हे सांगत अहिल्यादेवी होळकर यांचे चौण्डी हे अहिल्यानगर जिल्ह्यातील जन्मगाव असून त्या महाराष्ट्राच्या माहेरवाशीण आहेत. त्यामुळे त्यांचे कार्य, कर्तृत्व आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी स्वप्ना कुलकर्णी यांनी सुमधुर आवाजात अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कुलकर्णी, तर डॉ. अंजली शहा यांनी आभार मानले. कुमारी शांभवी ढवळीकर यांनी सादर केलेल्या संपूर्ण वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक