सोशल मीडियातील पोस्टवरून कराडात तरुणास बेदम मारहाण
सोशल मीडियातील पोस्टवरून कराडात तरुणास बेदम मारहाण
कराड, दि. 7 (प्रतिनिधी) सोशल मीडियावर पोस्ट केल्याच्या कारणातून कराडात एका तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना दुपारी घडली आहे. या घटनेनंतर संतप्त युवकांनी कोल्हापूर नाक्यावरील एका फेमस बारची तोडफोड केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 10 ते 12 जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी कराडला भेट दिली आहे.
दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या अबरार कोकणे (22) या तरुणास वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एका तरुणाने यापूर्वी खून झालेल्या एकावर व त्याच्याशी संबंधित एकाच्या फोटोवर पोस्ट केली होती. सदरची पोस्ट वायरल झाल्यानंतर पोस्टवरून चिडलेल्या शहरातील आठ ते दहा जणांच्या टोळक्याने पोस्ट करणाऱ्या सूर्यवंशी मळा मुजावर कॉलनी दरम्यान राहणाऱ्या त्या तरुणास आज्ञात स्थळी नेत काठी, पाईप व अन्य घातक शस्त्रांचा वापर करून बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर संबंधित तरुणास मुजावर कॉलनी नजीकच्या मोकळ्या मैदानात टाकून मारहाण करणाऱ्यांनी पलायन केले. या मारहाणीत तरुणाच्या एका पायावर मोठ्या प्रमाणात वर्मी घाव व जखमा झाल्या आहेत.
तरुणास मारहाण केल्याच्या घटनेची माहिती मिळताच परिसरातील काही तरुणांनी याचा राग मनात धरून कोल्हापूर नाक्यावर असणाऱ्या शासन बारवर दगडफेक करत बारची तोडफोड केली असल्याचे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विविध ठिकाणी बंदोबस्त ठेवत 10 ते 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तर तोडफोड झालेल्या त्या फेमस शासन बारची जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी पाहणी केली असून जखमी तरुणाची ही विचारपूस केली आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा झाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख 15 मिनिटे अंधारात....
या घटनेमुळे शहरात विविध चर्चांना उधान आले असून घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख हे कराड शहर पोलीस स्टेशनला आल्यानंतर रात्री साडेसात वाजता अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये एसपींना पंधरा मिनिटे अंधारात बसावे लागले. यावेळी पोलीस स्टेशन परिसरात काहीशी गर्दी झाली होती.

Comments
Post a Comment