कराड नगरपालिकेकडून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू
कराड नगरपालिकेकडून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू; प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई
कराड, दि. 4 - कराड नगरपालिकेने शहरामध्ये प्लास्टिक विरोधी मोहीम पुन्हा सक्रिय केली असून 'मी प्लास्टिक वापरणार नाही, दुसऱ्याला वापरू देणार नाही' या ब्रिदवाक्याखाली शहरातील व्यापारी, दुकानदार यांच्याकडे बंदी असणाऱ्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत बसस्थानक परिसरात रस्त्यावर फुले विक्रेत्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत पाच हजाराचा दंड करून 15 किलो प्लास्टिक जप्त केले आहे.
प्लास्टिक कारवाई संदर्भात नगरपालिकेत नुकतीच बैठक घेण्यात आली. शासनाने सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली असतानाही अनेक व्यापारी, दुकानदार प्लास्टिकची विक्री व वापर करत आहेत. त्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सातारा यांनी दर शुक्रवारी कारवाई करणेचे आदेश दिले आहेत. कराड नगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने गेली अनेक वर्ष कराड शहरात प्लास्टिक विरोधी भूमिका घेत वेळोवेळी दंडात्मक कारवाया केल्याने शहरातील प्लास्टिक वापर व विक्री कमी झाली होती. प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानदार, व्यापारी, हातगाडे, फिरते विक्रेते यांचेवर कारवाई करून पालिकेने दंड केला होता. मात्र पुन्हा प्लास्टिक पिशवीचा वापर व विक्री दुकानदार, व्यापारी, नागरिकांकडून सुरू झाल्याचे दिसत आहेत. त्यानुसार कराड नगरपरिषदेने कराड एस टी स्टॅन्ड परिसरामध्ये फुल विक्री करणारे व्यवसायाकडून जवळ जवळ 15 किलो प्लास्टिक जप्त करून त्यांना पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
या पुढे बंदी असलेले सिंगल (एकल) युज प्लास्टिक बाळगळयास (वापरल्यास) 10,000/-रुपये व त्यानंतर सापडल्यास 25,000/- रुपये दंड आकरण्यात येणार आहे. तरी 25,000/- रुपये दंड होवून ही एखादया व्यापाराने सिंगल युज प्लास्टिक वापरल्यास सदर दुकानाचा परवाना रदद करण्यात येणार आहे. त्यामुळे कराड शहरातील व्यापारांनी नोंद घ्यावी अश्या सुचना मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अभियंता गिरीश काकडे, आरोग्य निरिक्षक मुकेश अहिवळे व प्रभारी आरोग्य निरिक्षक देवानंद जगताप यांनी दिल्या आहेत.


Comments
Post a Comment