कराड नजीक एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न...
कराड नजीक एटीएम फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न
कराड, दि.10 (वार्ताहर) - विमानतळ-मुंढे, ता. कराड येथे चोरट्याने एटीएम मशीन फोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याबाबत इंडिया वन पेमेंट सर्विस लिमिटेडचे कस्टोडियन शशिकांत पाटील यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड पाटण रोडवरील विमानतळ-मुंढे येथे इंडिया वन पेमेंट सर्व्हीसचे एटीएम आहे. या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम कस्टोडियन शशिकांत पाटील हे करत असतात. पाटील यांनी दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता विमानतळ-मुंढे येथील मशीनमध्ये पैसे लोड केले व ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी पाटील इस्लामपूर येथे बँकेच्या कामासाठी गेलेले असताना पोलिसांनी त्यांना फोन करून विमानतळ-मुंढे येथील एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे पाटील यांनी त्याठिकाणी जाऊन पाहिले असता एटीएम मशीनचा समोरचा दरवाजा व सेफ्टी लॉकचा डायलर तोडल्याचे त्यांना दिसून आले.
यावेळी एकंदरीत पहाणी केली असता चोरीच्या उद्देशाने एटीएमचा दरवाजा आणि सेफ्टी लॉकचा डायलर फोडून मशीनचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शशिकांत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सूर्यकांत खिलारे तपास करीत आहेत.

Comments
Post a Comment