मंदिरातील चोरीचा सहा तासात गुन्हा उघड; तीन अल्पवयीन मुले ताब्यात
मंदिरातील चोरीचा सहा तासात गुन्हा उघड; तीन अल्पवयीन मुले ताब्यात
कराड, दि. १० (वार्ताहर) - येथील बैल बाजार मलकापूर रोडवर असणाऱ्या गणेश मंदिरातून दानपेटीतील रोख रक्कम व चांदीची गणेश मूर्ती चोरी प्रकरणी कराड शहर पोलिसांनी सहा तासात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या मुलांकडून 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री बैलबाजार रोड मलकापुर येथील गणेश मंदीरातुन रोख रक्क्रम व चांदीचे आवरण असलेली धातुची गणपतीची मुर्ती चोरी झाल्याची घटना घडली होती. याबाबत कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांची टीम या गुन्हयाचा तात्काळ तपास करीत होती. तपासा दरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांच्या आधारे सदर गुन्हयामधील 3 अल्पवयीन मुलांना (विधीसंघर्षित बालकांना) ताब्यात घेवुन अधिक तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयात चोरीस गेलेला माल रोख रक्कम व चांदीचे आवरण धातुची गणेश मुर्ती असा एकुण 14,000/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर विधीसंघर्ष बालक आणखी अशाच प्रकारच्या चो-या केल्याचा संशय निर्माण होत असल्याने मागील काही काळात कराड, पाटण, मसुर परिसरात मंदीरातील झालेल्या चो-या याबाबतचा तपास पोलीस कसोशीने करत आहेत.
सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार, पो.हवा विजय मुळे, सज्ज़न जगताप, पो.ना अनिल स्वामी, धिरज कोरडे, अमोल देशमुख, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली आहे.


Comments
Post a Comment