कराड तालुका पोलीस स्टेशन मध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची धाव
'रायझिंग डे' हा सप्ताह निमित्त शाळकरी विद्यार्थ्यांनी कराड तालुका पोलीस स्टेशनला भेट देत घेतली माहिती
पोलीस स्टेशन मधील कामकाज पाहून विद्यार्थी भारावले
कराड, दि. 8 - 'रायझिंग डे' हा सप्ताह निमित्त कराड तालुक्यातील श्री. केदार हायस्कूल सुपने व तारांगण इंग्लिश मीडियम स्कूल विंग माध्यमिक विभाग या शाळेतील विद्यार्थ्यांनी कराड तालुका पोलीस स्टेशनमध्ये भेट देऊन पोलीस स्टेशन मधील कामकाज कसे चालते याबद्दल माहिती घेतली. तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व विविध विभागातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी आपआपल्या विभागातील माहिती या आलेल्या विद्यार्थ्यांना सविस्तरपणे दिली.
जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडू, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी समाजात वाढणारी बालगुन्हेगारी, सोशल मीडियाचा दुष्परिणाम, सायबर क्राईम, फसवणूक , बालक व स्त्रियांवर होणारे वाढते अत्याचार, मोबाईल गेमिंग, अल्पवयीन वयातील रिलेशनशिप यांचा वास्तविक जीवनात मुलांवर होणारा दुष्परिणाम आणि या दुष्परिणाम पासून विद्यार्थ्यांनी सावधानता कशी बाळगावी यासाठी महत्त्वपूर्ण वैचारिक मार्गदर्शन केले.
यावेळी कराड तालुका ठाणे अमलदार अर्जुन पाचुपते, हेड कॉन्स्टेबल धनंजय कोळी, महिला हेड कॉन्स्टेबल हसीना मुजावर, पोलीस हवालदार प्रशांत जाधव, पोलीस हवालदार तानाजी बागल, पोलीस कॉन्स्टेबल आशिष पाटील, अनिल चव्हाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्मिता जाधव पूजा पाटील यांनी मुख्य कक्ष, संगणक लॅब, गंभीर गुन्हे व गोपनीय कक्ष, गुन्हे प्रकटीकरण, आवक जावक बारनिशी ,गार्डरूम, संशोध गुन्हेगारांचे लॉकअप, गुन्हे वाचक कक्ष, गुन्हे अभिलेख कक्ष, मुद्देमाल कक्ष, दप्तरी कक्ष, हजेरी मेजर कक्ष, वाचक कक्ष, रायफल प्रकार, गॅस गन, पिस्तुल, हातकडी,(बेडी), लाठी, हेल्मेट या प्रत्येक विभागाची माहिती संबंधित अधिकार्यांनी विध्यार्थ्यांना अत्यंत चांगल्या व सोप्या भाषेत समजावून सांगितली.
पोलीस स्टेशनमध्ये बालकांना उपरोक्त माहिती दिल्याने शिक्षक वर्ग यांनी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप व इतर पोलीस अंमलदार सर्वांचे आभार मानले व विद्यार्थी त्यांचे भवितव्यावर नक्कीच याचा चांगला सकारात्मक परिणाम होईल अशी प्रतिक्रिया दिली.
पोलीस स्टेशन मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना माहिती देताना कराड तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महिंद्र जगताप.










Comments
Post a Comment