अडीच टन ई-कचऱ्याचे कराडमध्ये संकलन
प्रजासत्ताक दिनानिमित्त गांधी फाउंडेशन, कराड नगरपालिका व अन्य संस्थांचा उपक्रम
कराड, दि. 27 (प्रतिनिधी) - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत कराड शहर व परिसरात ई-कचरा संकलन (इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वेस्ट) अभियान राबवण्यात आले. ३१ केंद्रांच्या माध्यमातून सुमारे अडीच टन ई-कचरा संकलनाचे काम करण्यात आले. गांधी फाउंडेशन, कराड नगरपालिका, पूर्णम एकोव्हिजन - पुणे, एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, सुखायू फाउंडेशन, तसेच शासकीय अभियांत्रिकी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
छत्रपती शिवाजी हाऊसिंग सोसायटी गार्डनमधील ई-कचरा संकलन केंद्राचे उद्घाटन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात, शहरामध्ये आगामी काळात ई-कचऱ्याच्या समस्येबाबत आणखी समाजसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा व नगरपालिकेने त्यांना मदत करावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी मुख्याधिकारी शंकर खंदारे, गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी, माजी नगरसेवक सौरभ पाटील, विजय वाटेगावकर, फारुख पटवेकर, पूर्णम फाउंडेशनचे भरत दामले, सुखायू फाउंडेशनचे डॉ. मिहीर वाचासुंदर, पर्यावरण अभ्यासक ए. आर. पवार, उद्योजक सलीम मुजावर, संदीप पवार, छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपचे चंद्रकांत जाधव, शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
९ ते १ या वेळेत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात नियोजित विविध ३१ केंद्रावर नागरिकांनी जुने टीव्ही, रेडिओ, मिक्सर, पंखे, एसी, जुने मोबाईल, वॉशिंग मशिन आदी वस्तू जमा केल्या.
या सर्व केंद्रांवर नेमलेल्या कराड पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या ई-कचऱ्याचे संकलन केले. नगरपालिकेनेही या उपक्रमास प्रतिसाद देत आपल्या कार्यालयातील खराब ई-कचरा ऱ्याचे या अभियानात दिला. नागरिकांनी या उपक्रमास प्रतिसाद दिल्याबद्दल
धीरज गांधी यांनी सर्वांचे आभार मानले.
ई-कचऱ्यावर पूर्णम इकोव्हिजन करणार प्रक्रिया
या अभियानात जमा झालेला ई-कचरा पूर्णम इकोव्हिजनला देण्यात आला. इकोव्हिजनकडून यातील खराब संगणक, टीव्ही व इतर वस्तू दुरूस्त करण्यात येणार असून त्या ग्रामीण भागातील शाळा, स्वयंसेवी संस्थांना मोफत देण्यात येणार आहेत. उर्वरित दुरूस्त न होणाऱ्या वस्तू शासनाच्या संस्थेस शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी देण्यात येणार आहेत
_______________________________________

कृष्णा विश्व विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजराकराड, दि.27 : मलकापूर येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या प्रांगणात कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहाच्यावतीने ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील सिक्युरिटी फोर्सचे जवान आणि विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले.
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला. यानंतर कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा व उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांनी सुरक्षारक्षक आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) कॅडेटस् कडून मानवंदना स्वीकारली.
याप्रसंगी सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, विद्यापीठाचे कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, मेडिकल अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. जी. व्ही. रामदास, कृष्णा कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजवंदनानंतर कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील विविध सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी सुरक्षा अधिकारी दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली शानदार ध्वजसंचलन केले. तसेच यावेळी कृष्णा शैक्षणिक समूहातील विविध शाळा – महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळविली.
याप्रसंगी कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागाच्या अधिष्ठाता डॉ. युगंतरा कदम, दंतविज्ञानचे अधिष्ठाता डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉ. जी. वरदराजूलु, नर्सिंग विज्ञानच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, अलाईड सायन्सचे अधिष्ठाता डॉ. गिरीश पठाडे, फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव, फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी पाटील आदींसह प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment