पोदारमध्ये प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा...
पोदारमध्ये प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
कराड, दि. 27 ( प्रतिनिधी) पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७६वा प्रजासत्ताक दिन मान्यवर, शिक्षक वर्ग, पालक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कमांडर कैलास डोंबे उपस्थित होते. यावेळेस स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान शाळेत सर्व उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. राष्ट्रगीत व ध्वजगीत याचे गायन करून भारत मातेचा जयघोष करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेत केलेली भाषणे, देशभक्तीपर गीते व काही सांस्कृतिक कार्यक्रम देखील शाळेच्या वतीने घेण्यात आले. यावेळेस सर्व शिक्षकांनीही आपल्या गीत मंचातून वाद्यवृंदांच्या साथीने अनेक बहारदार देशभक्तीपर गीते सादर केली.
शाळेचे प्रमुख अतिथी कमांडर कैलास डोंबे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शिस्त हा विद्यार्थी जीवनाचा पाया असून विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये आत्मसात केली पाहिजे, असे सांगितले. तसेच संरक्षण क्षेत्रातील असणाऱ्या करिअर संधीची चर्चा केली.
यावेळी शाळेमार्फत ‘रंगोत्सव’ या चित्रकला स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या स्पर्धेमध्ये एकूण 36 विद्यार्थ्यांना पारितोषिक व पदक देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच याच स्पर्धेतील 12 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात आली आहे. यावेळी शाळेच्या ‘इग्निस’ या कुलाला या वर्षीची जनरल चॅम्पियनशिप देऊन सन्मानित करण्यात आले.
शाळेचे प्राचार्य अन्वय चिकाटे यांनी ‘शिक्षण हाच प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ आहे. आपल्याला देशाच्या समृद्धीमध्ये योगदान देण्याची संधी मिळत असून आपले ज्ञान समाजाच्या भल्यासाठी वापरणे हेच आपले खरे कर्तव्य आहे,असे सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे प्राचार्य अन्वय चिकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या सौ. स्वाती नांगरे, शाळेचे प्रशाकीय व्यवस्थापक विशाल जाधव, कार्यक्रमाच्या समन्वयिका सौ. मेघा पवार सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments
Post a Comment