सहकार क्षेत्रात मुळापासून सुधारणा आवश्यक -अशोकराव थोरात


 

सहकार क्षेत्रात मुळापासून सुधारणा आवश्यक -अशोकराव थोरात

कराड येथे 19 रोजी राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन

कराड, दि. 16 (वार्ताहर) - महाराष्ट्रातील सहकाराची अधोगती थोपवण्यासाठी सहकार क्षेत्राबाबत प्रबोधन करणे गरजेचे असून या सहकार क्षेत्रात मुळापासून सुधारणा करणे आवश्यक असल्याचे मत मळाई ग्रुपचे प्रमुख शेती मित्र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले. 

कराड येथे 19 जानेवारी रोजी एक दिवसीय राज्यस्तरीय तिसरी सहकार परिषद आयोजित केली आहे त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

थोरात म्हणाले, गत दोन वर्षापासून मळाई ग्रुप मलकापूर कराड मधील सहकारी संस्था व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्यविचार मंच यांनी संयुक्तपणे एक दिवसीय सहकार परिषद आयोजित करत आहे. याही वर्षी रविवार दिनांक 19 रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत, कराड अर्बन को ऑप.बँकेच्या शताब्दी सभागृहात या परिषदेचे आयोजन केले असून परिषदेस अर्बन ग्रुप व कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक प्रायोजक आहे. 

भारतातील शेतकऱ्याला पतपुरवठा सहज व्हावा व ग्रामीण भागाचा व शेती क्षेत्राचा विकास करण्याच्या उद्देशाने सन १९०४ मध्ये ब्रिटीशांनी केलेल्या सहकार कायद्याच्या माध्यमातून सहकार चळवळ सुरु झाली. महाराष्ट्रात तर १९६० च्या सहकार कायद्यामुळे शेती, उद्योग, रोजगार क्षेत्राच्या वाढीस व विकासास चालना मिळाली व ग्रामीण व शहरी भागाचा विकास झाला, हे मान्य असले तरी स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळात या चळवळीचा सर्वत्र पुरेसा सारखा विकास होऊ शकला नाही. लोकशाही कारभाराचे तत्व असणारा सहकार जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात पुरेसा रुजला नाही. भांडवलशाहीतील शोषण पिळवणूकीच्या विरोधात उभी राहिलेली ही चळवळ १९९१ च्या नवीन आर्थिक धोरणातील खाजगीकरणामुळे गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. सहकारात घुसकोरी केलेल्या राजकारण, घराणेशाही व स्वार्थी वृत्तीने सहकारात एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. सहकारात वाढत चाललेल्या अपप्रवृत्ती, गैरव्यवहार व भ्रष्टचार यामुळे सहकाराचे लचके तोडण्यास सुरुवात केली आहे. सहकार क्षेत्रातील ९७ व्या घटना दुरुस्ती नंतर ही केंद्र सरकारने सहकार खाते सुरू केल्याने संपूर्ण देशातील सहकार चळवळीत कोणते परिवर्तन होणार याबाबतही संभ्रम असल्याचेही अशोकराव थोरात यांनी सांगितले.

गेल्या पंधरा ते वीस वर्षात महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र सर्व अर्थाने मागे पडत चालले असून अधोगतीकडे चालले आहे. अशा सहकार क्षेत्राची वास्तव वस्तुस्थिती व भविष्याबाबत परखड विचार विनिमय करून सहकार क्षेत्राला एक नवीन दिशा देण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन केले केले असल्याचे सांगून त्यांनी या सहकार परिषदेचा उद्देश सांगताना ते म्हणाले, केंद्राचा सहकार कायदा व त्याचा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीवरील परिणाम अभ्यासणे, सहकार क्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीची चर्चा करणे, सहकार क्षेत्रापुढील आव्हानांचा विचार विनिमय करणे, सहकार वृध्दिंगत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपायांवर चर्चा करणे असे उद्देश या सहकार परिषदेचे आहेत.

सहकार वृध्दिंगत करण्यासाठी दीपस्तंभासारखे कार्य करणारे सहकार क्षेत्रातील सभासद व पदाधिकारी, सहकार वृध्दिंगत करण्यासाठी प्रामाणिकपणे भविष्यात कार्य करू इच्छिणारे सहकार व अर्थशास्त्राचे विद्यार्थी व तरुण, सहकाराचे अध्यापन करणारे प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक, सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे शासकीय अधिकारी, सहकार समाजसेवा घटक असल्याने समाजातील सर्व घटक यांच्यासाठी ही सहकार परिषद असल्याचे थोरात यांनी सांगितले.

सध्या सहकार क्षेत्र व कायदा यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून यामुळे सहकारी संस्थांपुढे निर्माण होणाऱ्या आव्हानावर चर्चा करणे, सहकारातील बदलाबाबत प्रबोधन करणे, जागृती निर्माण करणे बदललेल्या कायद्यांची माहिती देवून चर्चा करणे, सहकार क्षेत्रासाठी तज्ञ मनुष्यबळ व कार्यकर्ते निर्माण करण्याचे काम कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर अर्थशास्त्र व सहकार या विषयाचे प्राध्यापक करीत असतात यासाठी ही परिषद प्राध्यापक व अर्थशास्त्र व सहकार विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असल्याचे सांगून मळाई ग्रुप मधील सर्व सहकारी संस्था व दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक कराडचे सर्व पदाधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत. ही परिषद नक्कीच सहकार क्षेत्राला उभारी देईल असा विश्वास अशोकराव थोरात यांनी व्यक्त केला.

राजकारण विरहित सहकार परिषद २०२५ 

महाराष्ट्रातील सहकार चळवळीकडे गंभीरपणे पाहिले तर आजची सहकार क्षेत्राची झालेली दशा व पुढील दिशा निराशा जनक वाटते. सामान्य माणसाचा आर्थिक क्षेत्रातील सहकार हा आधार आहे परंतु सहकार क्षेत्राकडे केंद्र सरकार,राज्य सरकार,स्थानिक स्वराज्य संस्था,आमदार, खासदार, भांडवलदार,बुद्धिवादी व सामाजिक कार्यकर्ते यांचा दृष्टिकोन नकारात्मक होत चालला आहे. सहकार क्षेत्राची माहिती व महत्त्व पुन्हा एकदा नव्या पिढीला पटवून देणे गरजेचे आहे.त्या दृष्टीने मळाई ग्रुपमलकापूर कराडमधील सहकारी संस्था व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्यविचार मंच यांनी संयुक्तपणे गेली दोन वर्षे संपूर्ण एक दिवसीय सहकार परिषद आयोजित केली होती. आणि आता “पश्चिम महाराष्ट्र स्तरीय तिसरीसहकार परिषद २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेचे उद्घाटन आयुक्त राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणेचे अनिल कवडे यांचे शुभहस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी अर्बन कुटुंब प्रमुख कराड बँकेचे मा.श्री सुभाषराव जोशी आहेत. मळाई ग्रुप प्रमुख अशोकराव थोरात, कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंचचे अध्यक्ष प्रा.डॉ.शरद शेटे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था साताराचे संजय कुमार सुद्रिक, सहाय्यक उपनिबंधक सहकारी संस्था, कराडच्या श्रीमती अपर्णा यादव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या परिषदेत सत्र पहिले सकाळी १२ ते १ वक्ते डॉ.श्री एस.एम.भोसले,प्राचार्य श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी जिल्हा सांगली हे  विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ग्रामीण विकास या विषयावर बोलणार आहेत.

सत्र दुसरे सकाळी १ ते २ वक्ते मा.डॉ. श्री संतोष यादव,देवचंद कॉलेज अर्जुननगर जि.कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी संस्थांची सद्यस्थिती याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत

तिसऱ्या सत्रात दुपारी २.३० ते ३.३० वक्ते डॉ. श्री. विजय पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य बापूजी साळुंखे कॉलेज, कराड हे केद्रातील नवीन सहकार कायदा व धोरण यशापयश या विषयावर बोलणार आहेत. या परिषदेचा समारोप  समारंभ दुपारी ३.३० ते ४.००  अशोकराव थोरात मळाई ग्रुप,मलकापूर यांचे व्याख्यानाने होणार आहे.

या परिषदेतून कोणावरही वैयक्तिक टीका टिपणी करावयाचे नसून सहकार क्षेत्रात शिरलेल्या अपप्रवृत्ती व दोषांना पायबंध घालण्याचा आहे. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना सहकार व अर्थशास्त्र शिकविणारे प्राध्यापक व निवडक विद्यार्थी, सातारा, सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काम करणारे प्रतिभावंत कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

या सहकार परिषदेस नोंदणी व इतर कोणतेही शुल्क नाही.तरी सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी, पदाधिकारी, अभ्यासकांनी, व सहकार क्षेत्रातील संबधीतानी या सहकार परिषदेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सहकार परिषदेचे आयोजक मळाई ग्रुप प्रमुख अशोकराव थोरात यांनी केले.

Comments

Karad Today News

कराड शहरातील दोन गुन्हेगाराकडून चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस प्रारंभ

वारुंजी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचा झेंडा फडकवा – पृथ्वीराज चव्हाण

मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे नगराध्यक्ष पदासह 18 नगरसेवक विजयी

सुपने जिल्हा परिषद गट काँग्रेसने ताकदीने लढावा –कार्यकर्त्यांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आग्रह

कराडमध्ये रविवारी रंगणार ‘कृष्णा मॅरेथॉन’चा थरार

मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्याच्या कामविरोधात बाधित शेतकरी आक्रमक