कराडात अभिरुची संस्थेतर्फे कला महोत्सवाचे आयोजन....
कराडात अभिरुची संस्थेतर्फे कला महोत्सवाचे आयोजन...
कराड दि. 26 (प्रतिनिधी) - स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेला कराडचा 'अभिरुची' फिल्म क्लब गेली काही वर्षे कऱ्हाडसारख्या लहान गावासाठी दुर्मीळ अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनात अग्रेसर राहिला आहे. या 'अभिरुची' संस्थेतर्फे १०, ११, १२ जानेवारी २०२५ या काळात कलामहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती 'अभिरुची'चे अध्यक्ष डॉ अजय ब्रह्मनाळकर यांनी दिली आहे.
अभिरुचीने आयोजित केलेले अनेक उत्तमोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटांबरोबरच व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांच्या चित्रांचे प्रदर्शन, २०२० सालातला कलामहोत्सव, ‘किमया’ हा अतुल पेठेकृत अनोखा प्रयोग तसेच पं. मालिनी राजुरकर, पं. कैवल्यकुमार गुरव अशा श्रेष्ठ कलाकारांचे कार्यक्रम रसिकांच्या स्मरणात आज ही आहेत.
या महोत्सवाचे उद्घाटन स्व. वेणूताई चव्हाण सभागृहात शुक्रवार १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. महोत्सवाबरोबरच 'चिंटू तुमच्या भेटीला' या चित्रप्रदर्शनाचेही उद्घाटन होणार आहे. या महोत्सवात पहिल्या दिवशी, शुक्रवार १० जानेवारी रोजी, सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक उमेश विनायक कुलकर्णी यांच्या 'मर्डर इन अ कोर्टरूम' या वेबमालिकेचे सादरीकरण होणार आहे. नागपूरच्या अक्कू यादव खून खटल्याच्या सत्यघटनेवर ही मालिका आधारित आहे. या वेळी स्वतः उमेश विनायक कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत आणि रसिकांबरोबर संवाद साधणार आहेत.
शनिवार ११ जानेवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता 'मन' या नाटकाचा प्रयोग होणार आहे. नाटककार चं. प्र. देशपांडे आणि दिग्दर्शक अभिजित झुंजारराव दिग्दर्शित 'मन' हे एकपात्री नाटक आहे. नातेसंबंध, त्यातील अनेक तात्त्विक प्रश्न, उलटसुलट वागणे, प्रस्थापित जगण्याला तपासणे हे चं. प्र. देशपांडे यांचे लेखनवैशिष्ट्य आहे. तर आपल्या भोवती नाटकवाली मुले जमवून वेगळे नाटक करण्याची धडपड करणारे काही लोक असतात, त्यातला कल्याणचा अभिजित झुंजारराव सातत्याने काही नवे करू पाहात आहे. विजय चौगुले निर्मित या नाटकात प्रसिद्ध अभिनेते रमेश वाणी यांनी व्यक्तिरेखा साकार केली आहे.
रविवार १२ जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता 'चिंटू' या प्रसिद्ध मराठी चित्रमालिकेचे हास्यचित्रकार चारुहास पंडित यांची मुलाखत व त्यांच्या हास्यचित्र प्रात्यक्षिकाच्या 'रेषांची भाषा' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चित्रप्रदर्शनाप्रमाणे हा कार्यक्रमही सर्वांसाठी खुला आहे.
रविवार १२ जानेवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला व त्यांच्याच नृत्यदिग्दर्शनातला कथ्थक नृत्यपरंपरेचा आजपर्यन्तचा प्रवास उलगडणारा 'स्पंदन' हा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये शर्वरी जमेनीस यांच्याबरोबरच जुई सगदेव, वैष्णवी देशपांडे, अनुष्का जोशी, आर्या फणसळकर यांचा सहभाग असणार आहे.
अलीकडच्या दोन-तीन पिढ्यांना बालवयातच नव्हे तर मोठेपणीही मोहवून टाकणाऱ्या 'चिंटू' या खोडकर, खट्याळ आणि सातासमुद्रापार पोचलेल्या अस्सल मराठी चित्ररेखेचे निर्माते हास्यचित्रकार चारुहास पंडित यांनी रेखाटलेल्या चित्रांचे हे प्रदर्शन. ते तिन्ही दिवस पूर्ण दिवसभर सर्वांसाठी खुले आहे.
कऱ्हाड व परिसरातील रसिकांनी, शालेय विद्यार्थ्यांनी या महोत्सवात आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन 'अभिरुची'चे अध्यक्ष डॉ अजय ब्रह्मनाळकर यांनी केले आहे.
या महोत्सवाच्या सशुल्क प्रवेशिका मर्यादित संख्येत 'अभिरुची'चे सुमन हॉस्पिटल, मंगळवार पेठ येथील कार्यालय (०२१६४-२२३३७४/ ९४०४४ ७३६८५) येथे तसेच इतर सभासदांकडे उपलब्ध आहेत. बैठक व्यवस्थेनुसार रु. २,५००, रु १,५०० आणि रु १,००० तिन्ही दिवसांकरता अशा दरात प्रवेशिका मिळतील.

Comments
Post a Comment