कराडच्या उड्डाण पुलाचे 85 टक्के काम पूर्ण....
कराडच्या उड्डाण पुलाचे 85 टक्के काम पूर्ण; फक्त 20 पिलर वरील काम बाकी
72 पिलरवर 959 सेगमेंटस् बसवण्यात आल्याने 2 हजार 710 मीटरचा उड्डाणपूल तयार
कराड, दि. 28 (प्रतिनिधी) - पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सिंगल पिलर वरील महाराष्ट्रातील पहिला सहापदरी (29.5 मीटर रुंद व 3.5 कि.मी. लांब व दोन्ही बाजूंच्या भरावासह 4.6 कि.मी) युनिक उड्डाणपुलाचे काम गतीने सुरू आहे. आत्तापर्यंत या पुलाचे 85 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती डी पी जैन कंपनीच्या कडून देण्यात आली. या पुलासाठी 1 हजार 226 सेगमेंटस् लागणार आहेत. आत्तापर्यंत यापैकी 959 सेगमेंट 72 पिलर वर बसवून पूर्ण झाले आहेत.
दोन ऑक्टोंबर 2023 पासून आज पर्यंत या पुलावर सेगमेंटस् बसवण्याचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या महामार्गावर या पुलाचे दोन ठिकाणी काम सुरू आहे. दोन्ही ठिकाणी 72 पिलरवर 959 सेगमेंट बसवून पूर्ण झाले आहेत. त्यामूळे 70 गळे पूर्ण झाले असून 2 हजार 710 मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे.
हॉटेल ग्रीन पार्क ते कोयना वसाहत दरम्यान 41 पिलरवर 557 सेगमेंट बसवण्यात आले असून या ठिकाणी 40 गाळे पूर्ण झाल्याने 1 हजार 565 मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे. ढेबेवाडी फाटा ते बोराटे पेट्रोल पंप दरम्यान 31 पिलरवर 402 सेगमेंट बसवण्यात आल्याने या ठिकाणी 30 गाळे तयार झाले असून या दरम्यान 1 हजार 144 मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे.
साडेतीन किलोमीटरच्या उड्डाणपुलाचे दोन भागात काम सुरू आहे. नांदलापूर (हॉटेल ग्रीन पार्क) ते ढेबेवाडी फाटा व ढेबेवाडी फाटा ते कोल्हापूर नाका सध्या काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे सेगमेंट केबल रोपसह फिक्स करण्याबरोबर सेगमेंटला बेरिंग बसवण्याचे काम अत्याधुनिक मशीनच्या माध्यमातून सध्या सुरू आहेत. मूळ 92 पिलरची पुलाची लांबी 3.5 किलोमीटर असली तरी पुलाच्या दोन्ही बाजूला होणारा भराव सहित हा सहापदरी उड्डाणपूल पूल 4.6 किलोमीटरचा होणार आहे.
या पुलासाठी दोन पिलर मधील अंतर 40 मीटरचे आहे. 5 ठिकाणी 31 मीटरचे तर 11 ठिकाणी 30 मीटरचे अंतर आहे. दोन पिलरच्या मध्ये 14 सेगमेंट बसवले जातात. यामध्ये दोन लहान व बारा मोठे सेगमेंटस् बसवण्यात येत आहेत. 31 व 30 मीटरचे ज्या ठिकाणी अंतर आहे त्या ठिकाणी 11 सेगमेंटस् बसवण्यात येत आहेत. बोराटे पेट्रोल पंप ते पंकज नजीक जाधव आर्केड दरम्यान वळण असल्याने या ठिकाणच्या दोन पिलरच्या मधील अंतर 31 व 30 मीटरचे ठेवण्यात आले आहे त्यामुळे या ठिकाणी दोन पिलर दरम्यान 11 सेगमेंटस् बसवण्यात येणार असल्याने सध्या या ठिकाणी काम संत गतीने सुरू आहे.
नांदलापूर पासून मागे मलकापूर पर्यंत पिलर क्रमांक 1 ते पिलर क्रमांक 40 पर्यंत सध्या उड्डाणपूलासाठी सेगमेंटस् बसले आहेत. तर ढेबेवाडी फाटा येथील पिलर क्रमांक 52 ते पिलर क्रमांक 82 दरम्यान सेगमेंटस् बसवण्यात आले आहेत.
दरम्यान हॉटेल ग्रीन पार्क पासून उड्डाण पुलाच्या पुढे नांदलापूर बाजूस पुलाच्या भरावाच्या कामास सुरुवात झाली असून भरावाची संरक्षक भिंत उभारण्यासाठी दोन्ही बाजूला सध्या गतीने काम सुरू आहे. तर याच ठिकाणी तयार झालेल्या उड्डाण पुलावर संरक्षक कटडे बांधण्याचे कामही सुरू झाली आहे.
कोयना पूल ते हॉटेल ग्रीन पार्क दरम्यान 92 पिलरवर हा उड्डाणपूल उभा राहणार आहे. जून 2025 रोजी या उड्डाणपुला वरून वाहने धावतील तर सहा पदरीकरणाचे काम ही पूर्ण होईल असे डी पी जैन कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. डी पी जैन कंपनीचे प्रेसिडेंट प्रदीप कुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्रकुमार वर्मा व उड्डाणपुलाची इन्चार्ज सौरभ घोष व त्यांची टीम या उड्डाणपुलाच्या कामात सध्या व्यस्त आहे.

Comments
Post a Comment