विकासाचे व्हिजन असलेल्या अतुलबाबांना विधानसभेत पाठवा;डॉ. प्रमोद सावंत
विकासाचे व्हिजन असलेल्या अतुलबाबांना विधानसभेत पाठवा;डॉ. प्रमोद सावंत
कराड दि. 14 (वार्ताहर) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात कोणते ही ठोस शाश्वत काम करता आले नाही. त्यांच्या काळातील एकही प्रकल्प आज पूर्णत्वास गेलेला नाही. त्यांचे आता वय झाले आहे. त्यामुळे त्यांना कराड दक्षिणच्या जनतेने रिटायर करून डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासारख्या तरुण, तडफदार, विकासाचे व्हिजन असलेल्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवा, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रचारार्थ डॉक्टरांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, डॉ. सारिका गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सावंत म्हणले, देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली या 60 वर्षांच्या काळात काँग्रेसने केवळ स्वतःसाठीच राज्य केले, देशाचा काय विकास केला? असा सवाल उपस्थित करत अटल बिहारी वाजपेयी आणि त्यानंतर 2014 ते 24 या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशाच्या खऱ्या अर्थाने विकास झाला. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपची तुलना केल्यास विकास म्हणजे काय, हे कळेल.
ते म्हणाले, काँग्रेसने गरीबी हटवण्यासाठी कोणता कार्यक्रम राबवला. त्यांच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या 100 रुपयांसाठी त्यांना चार वेळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. मात्र, त्यांच्या हातात केवळ 20 रुपयेच पडायचे. उरलेले 80 रुपये काँग्रेसचे दलाल खात होते. मोदींनी जनधन योजना, मोफत धान्य, किसान सन्मान योजना, आयुष्मान भारत, किसान डेबिट कार्ड, सॉईल हेल्थ कार्ड, उज्वल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, मुद्रा लोन आदींच्या माध्यमातून गरीब कल्याण, तसेच महिला सशक्तिकरण आणि युवकांसाठी उद्योग व रोजगार निर्मिती केली. याउलट काँग्रेसने आतापर्यंत सर्वांना हात दाखविण्याचेच काम केले. त्यांनी कोणाच्याही हाताला काम दिले नाही. मोदींनी स्वच्छ भारत अभियान राबवले. 'आयुष्यमान भारत'च्या माध्यमातून लोकांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले. 2014 पूर्वीपर्यंत काँग्रेसच्या काळात आपल्याला किती आरोग्य सुविधा मिळाल्या, याचाही लोकांनी विचार करावा.
ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची ताकद संपूर्ण जगाला दाखवली. जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटवून अखंड भारताचे स्वप्न पूर्ण केले. सर्जिकल स्ट्राइक केला. राम मंदिर उभारणी केली. तब्बल 180 देशात योग पोहोचवला. येत्या तीन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या नंबरवर असेल. काँग्रेसच्या काळात देशात 387 मेडिकल कॉलेजेस होती. मोदींच्या काळात ती 750 वर झाली असून अन्य मेडिकल शाखांचाही मोठा विस्तार झाला असून मोदींनी नवभारत निर्मिती करण्याचे काम केले आहे. त्यामुळे युवाशक्ती, नारीशक्ती, किसानशक्ती, गरीब कल्याणासाठी, तसेच विकसित भारत व विकसित महाराष्ट्र साकारण्यासाठी मोदींचे हात बळकट करणे गरजेचे आहे.
डॉ. सुरेश भोसले, माजी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची भाषणे झाली. या मेळाव्याला कराड दक्षिणमधील डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment