मुख्यमंत्री म्हणून पुन:श्च भाग्य लाभावे यासाठी आमचा पाठिंबा; संत भूमी संरक्षक संघर्ष समिती...
मुख्यमंत्री म्हणून पुन:श्च भाग्य लाभावे यासाठी आमचा पाठिंबा; संत भूमी संरक्षक संघर्ष समिती...
कराड दि.12 (प्रतिनिधी) : संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. श्री क्षेत्र देहू येथील तपोभूमीतील या समितीचे संस्थापक तुकोबाभक्त मधुसूदन पाटील व त्यांच्या शिष्टमंडळाने आ. चव्हाण यांच्या निवासस्थानी भेटून पाठिंबा जाहीर करीत चव्हाण दाम्पत्याचा वारकरी शाल व तुळशीमाळाचा हार घालून सत्कार केला.
मधुसूदन पाटील म्हणाले की, आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना संतभूमीसाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यामधील अत्यंत महत्वाचे कार्य म्हणजे श्री क्षेत्र देहू जवळील संत तुकोबारायांची ध्यान साधना तपोभूमी भंडारा भामचंद्र डोंगर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून सन २०११ ला शासनाने घोषित केले. व त्यासाठी शासनाच्या सांस्कृतिक, पुरातत्व विभागाद्वारे अधिसूचनाही जारी केली. त्यामुळे या संपूर्ण पवित्र क्षेत्राला आज सुरक्षितता प्रदान झाली आहे. त्यामुळे आम्ही तुमचे कायम ऋणी आहोत याच भावनेतून आज आम्ही आपणास पाठिंबा देत आहोत.
पाटील पुढे म्हणाले की, वारकरी धर्माचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संतभूमी संरक्षक संघर्ष समितीने सदर न्याय्य अधिसूचनांचे कायदेशीर पालन होण्यासाठी त्वरीत अद्यादेश काढावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा व संघर्ष केला. परंतु आपल्यानंतर कोणत्याच सरकारने संवेदनशीलपणे दखल घेतली नाही. त्यामुळे डाऊप्रमाणे पुन्हा वारकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे. आम्हा वारकऱ्यांस विश्वास वाटतो की, हे पवित्र काम आपणच पूर्ण करू शकाल. त्यासाठी आपणास मुख्यमंत्री म्हणून पुन:श्च भाग्य लाभावे व हे ऐतिहासिक कार्य पार पाडावे. यासाठी राज्यातील तमाम जनता जनार्दन, वारकरी, फडकरी दिंडीच्यावतीने शुभेच्छा, आशीर्वाद व जाहीर पाठिंबा दिला जात आहे.

Comments
Post a Comment