आ. पृथ्वीराज चव्हाण सारख्या स्वाभिमानी नेत्याला निवडून द्या ; खा. सचिन पायलट
आ. पृथ्वीराज चव्हाण सारख्या स्वाभिमानी नेत्याला निवडून द्या ; खा. सचिन पायलट
कराड, दि.17 (प्रतिनिधी) : छत्रपतींच्या कराड या भूमीत आल्यानंतर माझी छाती अभिमानाने सतत फुगते. असे सांगून राजस्थानचे काँग्रेसचे नेते व खा. सचिन पायलट म्हणाले, भाजप व महायुतीच्या सरकारमध्ये पदाची लढाई सुरू आहे. हे पाहून जनतेचा विकास काय होणार, हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीराजबाबांना तुम्ही आजपर्यंत अनेकदा निवडून दिले आहे. कराडची जनता सौभाग्यशाली आहे, की असा सभ्य व अंगावर कोणताही डाग नसणारा हा नेता आहे. पृथ्वीराजबाबांनी मान, सन्मान आणि पदे मिळवली. व त्यातून तुमची मान कोणासमोर झुकू दिली नाही. अशा स्वाभिमानी नेत्याला विजयी करा. व जातीवादी नेत्यांना कडवे उत्तर द्या. असे आवाहन खा. सचिन पायलट यांनी कराड येथील शिवतीर्थ दत्त चौकात झालेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचाराच्या विराट सांगता सभेत केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके, काँग्रेसचे निरीक्षक प्रकाश नहाटा, कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पोपटराव साळुंखे, माजी नगरसेवक अरुण जाधव, माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले, अल्ताफ शिकलगार, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, अर्चना पाटील, कराड तालुका शिवसेना प्रमुख नितीन काशीद, जयेश मोहिते, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष ऋतुराज मोरे, फारूक पटवेकर, मझहर कागदी, रमेश वायदंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
खा. पायलट म्हणाले, स्वातंत्र्यापासून आजतागायत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात जनतेने काँग्रेसला विजयी केले आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या आई, वडिलांनी या मतदारसंघातील जनतेची सेवा केली आहे. राज्यातील विधानसभेची निवडणूक हे आव्हान आहे. आणि संधी पण आहे. या निवडणुकीत मतदारांना खूप अमिष दाखवली जात आहेत. मात्र कराड दक्षिणमधील जनता हाताच्या पंजालाच निवडून देणार आहेत. राज्यातील जनतेने भाजपचा लोकसभा निवडणुकीत चारशे पारच्या घोषणेला धडा शिकवला. ईडी, सीबीआयचा वापर करून राज्यातील अनेक नेत्यांना आपल्या बाजूला घेतले. या सर्व गोष्टींचा विचार करून जनतेने त्यांना लोकसभा निवडणुकीत कडवे उत्तर दिले. केंद्रातील सरकार दुसऱ्यांच्या कुबड्या घेवून उभे राहिले. जिकडे जावे तिकडे डबल इंजिन सरकार पहायला मिळते. महाराष्ट्रातील ट्रिपल इंजिन सरकार फक्त धूर सोडत आहे. आम्हाला काम करणारे सरकार हवे आहे. सर्वांना लोकशाही व लोकतंत्र हवे आहे.
खा. पायलट म्हणाले, देशात कोणीही महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यावर बोलताना दिसत नाही. तर हे जातीयवादी बटेंगे - कटेंगे म्हणत आहेत. त्यांना आपण पढोगे तो बढोगे हा नारा दिला पाहिजे. काँग्रेसच्या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी आहुती दिली. पण ज्यांना काहीच खरचटलेले नाही. ते सतत जातीभेद करून आपल्या सरकारचा नाकर्तेपणा झाकत आहेत. कारण त्यांच्याकडे विकासाचे रिपोर्ट कार्ड नाही.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपच्या कारभारावर महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत नापास हा शेरा मारला आहे. मी मुख्यमंत्री असताना नागपूरला दोन मोठे उद्योग आणले. ते या मंडळीनी सुरू केले नाहीत. हे देवेंद्र फडणवीस विसरत आहेत. कराडला जगातील दुसरे भूकंप संशोधन केंद्र आहे. अशी अनेक विकासकामे करून कराड हे जिल्हा पातळीवरचे गाव केले आहे, हा विकास न दिसणाऱ्या मंडळींना विकासाची व्याख्या समजलेली दिसत नाही.
ते म्हणाले, कराड शहर हे माझे घर आणि मतदारसंघ हे माझे कुटुंब आहे. तुमच्या आशीर्वादामुळे मला राजकीय उंची गाठता आली. हे विसरू शकत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी कराडला आल्यानंतर त्यांनी मला आंतरराष्ट्रीय नेत्याची पदवी दिली, याचे मी स्वागत केले. मी काय सडक छाप राजकारणी नाही. असे मिश्किलपणे सांगत यशवंतराव चव्हाण यांची शिकवण आम्ही कायम जपली आहे. पी. डी. पाटील यांनी कराडची जडणघडण केली. विलासकाकांनीही या मतदारसंघाची उंची वाढवली. याची जाणीव राखून मतदारसंघातील जनतेने कधीही जातीयवादी लोकांना थारा दिलेले नाही.
ते म्हणाले, विकासकामे व प्रकल्प लाईट वेट नेते आणू शकत नाहीत. त्यासाठी राजकीय वजन लागते. हे विरोधी उमेदवाराकडे आहे का, हे पहा. राज्याच्या हिताचे निर्णय मी पुन्हा घेईन. राज्य शिखर बँकेला वाचविण्याचा माझा हेतू स्वच्छ होता, त्याचा फायदाच झाला. ते म्हणाले, सद्या कराड दक्षिणमध्ये वेगळी संस्कृती रुजवली जात आहे. कराडचे राजकारण तुम्हाला आम्हाला बिघडू द्यायचे नाही. तुमच्या आशीर्वादातून मी उतराई होवू शकत नाही. इतके ऋण माझ्यावर आहे. कराड दक्षिण मध्ये पुन्हा इतिहास घडवूया.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, आ. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वांना बरोबर घेवून जाणारे नेते आहेत. त्यांनी आयुष्यभर काँग्रेसची विचारधारा घेवून मार्गक्रमण केले. त्यांच्या कार्याला तोड नाही. या विचाराला तुम्ही साथ करावी. राज्यात सत्ता परिवर्तन घडेल, हे नक्की आहे. पृथ्वीराज बाबांना साथ आणि सहकार्य आपण द्यावे.
माजी आ. रामहरी रुपनवर म्हणाले, महायुतीचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळेस अडीच लाख कोटी कर्ज होते. आता राज्यावर साडेनऊ लाख कोटी रुपये कर्ज आहे. हे सर्व कर्ज तुमच्या सर्वांच्या डोक्यावर आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना निवडून देवून तुमचा सन्मान वाढवा. प्रा. दिपक तडाखे व राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले यांनी आभार मानले.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी केंद्रात मंत्री असताना राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी संजय मिश्रा माझ्याबरोबर काम करत होते. त्यांच्याकडून मी कराड जवळचा उड्डाणपूल करण्यासाठी प्रयत्न केले. यातून ५४० कोटी रुपयांचा पुल उभारला जात आहे. सिंगल पिलर हि कल्पना मांडल्यामुळेच भविष्यात कराड उड्डाणं पुलाचे ट्राफिक कमी होणार आहे. व राष्ट्रीय महामार्गवरील वाहतूक सुरळीत होणार आहे. त्यावेळेस चौदापदरी मार्ग करण्यासाठी प्रयत्न झाले नसते, तर हे काम झालेच नसते. यामुळे पुढील तीस वर्षातील कराड आणि मलकापूर भागातील रहदारीचा प्रश्न सुटला आहे.
दत्त चौकात झालेल्या विराट सभेत आ. बाळासाहेब पाटील यांचे व्यासपीठावर आगमन होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ते भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यांच्या समवेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित जनसमुदायाला अभिवादन केले. या नेत्यांच्या एकत्रित अभिवादनामुळे कराड शहरात सकारात्मक मेसेज केल्याची चर्चा सुरु आहे.
Comments
Post a Comment